रहाळकर राम मंदिर

सदाशिव पेठ, पुणे, ता. जि. पुणे

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठेत १८३८ मध्ये गणेशबाबा रहाळकर यांनी रहाळकर राम मंदिराची स्थापना केली. नागनाथ पाराकडून शनिपाराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील श्रीरामतीर्थ इमारतीत हे मंदिर आहे. पेशवेकालीन वास्तुरचनेचे हे मंदिर सुरुवातीला खासगी देवस्थान म्हणून ओळखले जात असे. या मंदिराचे वेगळेपण असे की येथे एकाच अखंड पांढऱ्या संगमरवरी पाषाणात पट्टाभिषिक्त राम पंचायतन मूर्ती कोरली आहे. एकाच शिळेतील ही मूर्ती एकोणिसाव्या शतकातील शिल्पशास्त्राचा दुर्मिळ नमुना मानली जाते.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठ ऐतिहासिक वास्तू व सांस्कृतिक परंपरांसाठी ओळखली जाते. पेशवे काळात सदाशिवराव भाऊ यांच्या नावाने वसलेली ही पेठ आजही जुन्या पुण्याची ओळख टिकवून आहे. या पेठेतील राम मंदिराच्या स्थापनेची आख्यायिका अशी की गणेशबाबा रहाळकर यांना श्रीरामाची एक मूर्ती आवडली होती. त्यावेळी ती एका सराफाकडे गहाण होती. आर्थिक अडचणींमुळे गणेशबाबांना ती मूर्ती खरेदी करणे शक्य नव्हते. दरम्यानच्या काळात त्या सराफाला पोटशूळ हा पोटाचा आजार झाला. अनेक उपचारांनंतरही त्याला गुण येत नव्हता. एका रात्री श्रीरामाने त्या सराफाला स्वप्नात दृष्टांत देऊन ती मूर्ती गणेशबाबा रहाळकर यांच्या स्वाधीन करण्याची आज्ञा दिली. या स्वप्नदृष्टांताचे पालन करत त्या सराफाने ती मूर्ती पालखीतून रहाळकर यांच्या घरी विनामूल्य पाठवली. मूर्ती सुपूर्द करताच सराफाचा आजार पूर्णपणे बरा झाला. या घटनेनंतर गणेशबाबांनी स्वतःच्या जागेत मंदिराची उभारणी केली.

मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पारंपरिक मराठी वाड्यांच्या धाटणीचे आहे. या प्रवेशद्वारातून एका लहान प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराच्या भिंती पूर्वी दगड व मातीचा वापर करून बांधल्या होत्या. काळाच्या ओघात या भिंतींची दुरवस्था झाल्यामुळे आता त्या ठिकाणी पक्क्या विटा तसेच सिमेंटच्या भिंती उभारल्या आहेत. मंदिरासमोरील मंडपात हात जोडून स्वागत करणारी हनुमानाची मूर्ती आहे. या मूर्तीचे दर्शन घेऊन मग गर्भगृहातील श्रीरामाचे दर्शन घेण्याची पद्धत येथे पाळली जाते. मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात असणारे गोलाकार स्तंभ एकमेकांशी महिरपी कलाकुसरीने जोडले आहेत. येथे दररोज सायंकाळी आरत्या व भजने आयोजित केली जातात. सभामंडपाच्या छतावर झुंबर तसेच भिंतींवर काही जुनी छायाचित्रे व धार्मिक संदेश लावले आहेत. येथे बसून रामनामाचा जप करणे ही अनेक पुणेकर भाविकांची दिनचर्या आहे.

सभामंडपापासून काहीशा उंचावर असलेल्या अंतराळाच्या कमानीकृती प्रवेशद्वाराच्या वरील भागात वानरसेनेची विविध मुद्रांमधील उठावशिल्पे आहेत. द्वारशाखेच्या दोन्ही बाजूंना भिंतीवर हत्ती, मोर व हंस अशा विविध प्राण्यांची चित्रे रंगवली आहेत. त्याच्या वरच्या भागात महर्षी विश्वामित्र तसेच वाल्मिकी या ऋषीमुनींची मोठी छायाचित्रे आहेत. त्यापुढील गर्भगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर विविध रंगांत केलेली कलाकुसर आहे. या प्रवेशद्वाराच्या लाकडी चौकटीला सुरक्षेसाठी पारदर्शक काच लावली आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपालांच्या प्रतिमा आहेत.

गर्भगृहात एका वज्रपिठावरील शुभ्र संगमरवरी मखरात ‘पट्टाभिषिक्त राम पंचायतन’ मूर्ती आहे. एकाच अखंड पांढऱ्या संगमरवरी दगडात कोरलेली ही पंचायतन मूर्ती शिल्पशास्त्राचा उत्तम नमुना मानली जाते. यामध्ये श्रीराम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्यासह हनुमान व इतर वानरसेनेचे कोरीव काम केले आहे. रामायणातील उत्तरकांडातील श्रीरामाच्या राज्याभिषेकाचे वर्णन या मूर्तीमध्ये दिसते. सिंहासनावर श्रीराम व सीता विराजमान आहेत. त्यांच्या बाजूला बंधू उभे आहेत. अशा प्रकारची एकाच दगडातील संपूर्ण पंचायतन मूर्ती महाराष्ट्रात दुर्मिळ मानली जाते. मूर्तीवरील भाव व कोरीव कामाचे बारकावे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या मूर्तीच्या मागे नक्षीदार प्रभावळ आहे. मंदिरावर असलेले शिखर मराठा व नागर शैलीच्या मिश्रणातून साकारले आहे. शिखराची उंची मध्यम आहे. त्यावर विविध देवदेवतांच्या लहान मूर्ती व नक्षीकाम केले आहे. वरच्या भागात सुवर्णवर्ख असलेला कळस आहे.

सांस्कृतिक व धार्मिक उत्सवांच्या बाबतीत रहाळकर राम मंदिर पुण्यात आघाडीवर आहे. चैत्र महिन्यात येणारा रामनवमीचा उत्सव येथे मोठ्या प्रमाणावर व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला जातो. गुढीपाडव्यापासून सुरू होणारा हा उत्सव सलग नऊ दिवस चालतो. यावेळी दररोज कीर्तने तसेच प्रवचने होतात. रामनवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा होतो. यावेळी पाळणा सजवून पारंपरिक पद्धतीने सुंठवडा हा प्रसाद वाटला जातो. या सोहळ्यासाठी सदाशिव पेठेतील व पुण्यातील इतर भागांतील अनेक भाविक उपस्थित राहतात. उत्सवाच्या काळात संपूर्ण मंदिर फुलांनी व दिवे लावून सजवले जाते.

या मंदिराचे एक वेगळे व महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अष्टमीला येथे होणारा ‘कौसल्येचा डोहाळे जेवण’ हा विधी होय. रामनवमीच्या आदल्या दिवशी एका गर्भवती स्त्रीला माता कौसल्येचे प्रतीक मानून तिचे डोहाळे जेवण केले जाते. या विधीसाठी मंदिराच्या गर्भगृहात विशेष सजावट केली जाते व पारंपरिक पक्वान्ने तयार केली जातात.

हा उपक्रम मातृत्वाचा सन्मान करणारा व रामायणातील प्रसंगांना मांडणारा आहे. या विधीमध्ये स्थानिक महिला मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. रामनवमीच्या काही दिवसांनंतर येणारी हनुमान जयंती सुद्धा या मंदिरात उत्साहात साजरी केली जाते.

हनुमान जन्माच्या वेळी मंदिरात विशेष पूजा व अभिषेक केला जातो. यासह श्रावण महिन्यात महिला मंडळाची भजने तसेच हळदीकुंकवाचे कार्यक्रम पार पडतात. मंदिराचे व्यवस्थापन सध्या रहाळकर कुटुंबाची सातवी पिढी पाहत आहे.

उपयुक्त माहिती

  • पुणे रेल्वे स्थानक व बस स्थानकापासून ३.५ किमी अंतरावर
  • स्वारगेट एसटी स्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • 
देशभररातील अनेक शहरांतून येथे येण्यासाठी विमान, रेल्वे व बस सेवा उपलब्ध
  • 
खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • पुण्यातील अनेक भागांतून पीएमपीएमएल बस सुविधा
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२०-२४४७७४९६
Back To Home