शिरगावची प्रतिशिर्डी

शिरगाव, ता. मावळ, जि. पुणे


श्रद्धा आणि सबुरी हा मोलाचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांचे महाराष्ट्रासोबतच देशभरात लाखो भक्त आहेत. बाबांच्या चरणावर लीन होण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविक शिर्डीला जातात. परंतु, सर्वांनाच शिर्डीला जाणे शक्य होत नसल्याने पुणे परिसरातील अनेक भाविकांची पावले मावळ तालुक्यातील शिरगावमधील प्रतिशिर्डी मंदिराकडे वळतात.

पुणे-मुंबई महामार्गावरील सोमटणे फाट्यावरून शिरगावला जाण्यासाठी मार्ग आहे. साधारणतः तीन किमी अंतरावर हे प्रतिशिर्डी मंदिर आहे. पुण्यातील माजी आमदार प्रकाश देवळे यांच्या पुढाकारातून २००९ साली ते उभे राहिले. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील बांधकाम शिर्डीच्या मंदिरासारखे तर आहेच; पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे या परिसरातील संपूर्ण वातावरणच शिर्डीसारखे आहे. मंदिर परिसरात गेल्यावर शिर्डीतच उभे असल्याचा भास व्हावा इतके साम्य येथे जाणवते. केवळ नऊ महिन्यांच्या कालावधीत हे मंदिर उभे राहिले आहे.

शिर्डीप्रमाणे या मंदिर परिसरात समाधी मंदिर, अजानवृक्ष, द्वारकामाई व त्यासमोर सतत पेटत असलेली बाबांची धुनी या सर्व वास्तू येथे आहेत. मंदिरात प्रशस्त सभामंडप आहे. त्यातील भिंतींवरील नक्षीकाम सुंदर आहे. सभामंडपाच्या भिंतींवर साईभक्तांची छायाचित्रे आहेत. सभामंडपाच्या पुढील भागातील सोनेरी गाभाऱ्यात विराजमान असलेली शुभ्र संगमरवरी सिंहासनाधिष्ठ साईंच्या मूर्तीवर नजर खिळून राहते. शिर्डीतील मूळ मूर्तीप्रमाणेच ही मूर्ती आहे. त्याशिवाय शिर्डीत होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांप्रमाणेच येथील सर्व कार्यक्रम केले जातात.

मंदिर परिसरातील आणखी एक महत्त्वाची वास्तू म्हणजे येथील भव्य प्रसादालय. अन्नछत्राची ही वास्तू राजवाडा भासावी अशी भव्य बनविण्यात आली आहे. त्यामुळे या इमारतीची ओळखच राजवाडा म्हणून झाली आहे. या तीन मजली राजवाड्याच्या तळमजल्यावर एकाच वेळी एक हजार भाविक प्रसाद ग्रहण करू शकतात. त्याशिवाय येथे भक्त निवासाची सुविधा आहे. मंदिराचा संपूर्ण परिसर स्वच्छ व टापटीप आहे.

शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी पुणे व मुंबई परिसरातील शेकडो भाविक येथे दर्शनाला येतात. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे भाविक व पर्यटकांसाठी ‘दर्शन बस’ सुरू आहे. या बसद्वारे दाखविण्यात येणाऱ्या पर्यटनस्थळांमध्ये प्रतिशिर्डी मंदिराचाही समावेश आहे. येथे प्रतिष्ठापना दिवस, गुरुपौर्णिमा, रामनवमी व दसरा हे उत्सव साजरे होतात. मंदिरात सकाळी ५, दुपारी १२, सायंकाळी ६ व रात्री १० वाजता आरती होते. भाविकांना सकाळी ५ ते रात्री १० पर्यंत देवदर्शन करता येते.

 

उपयुक्त माहिती:

  • जुन्या पुणे-मुंबई मार्गावरून तीन किमी अंतरावर
  • पुणे रेल्वेस्थानकापासून ३८ किमी
  • प्रसादालय व भक्त निवासाची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतील, अशी व्यवस्था
Back To Home