पाताळेश्वर मंदिर

जंगली महाराज रस्ता, पुणे, ता. जि. पुणे

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजीनगर, म्हणजेच तत्कालीन भांबुर्डे परिसरातील जंगली महाराज रस्त्यावर ‘पाताळेश्वर लेणे’ आहे. आठव्या शतकातील राष्ट्रकूट राजवटीच्या कालखंडात अखंड काळ्या पाषाणात कोरलेल्या या लेण्यांमधील शिवमंदिर मुळा आणि मुठा या नद्यांच्या संगमाच्या पश्चिमेस असलेल्या एका खडकाळ टेकडीवर वसलेले आहे. भौगोलिकदृष्ट्या हा भाग ज्वालामुखीच्या लाव्हारसापासून निर्माण झालेल्या ‘डेक्कन ट्रॅप’ या खडकाच्या पट्ट्यात येतो व जमिनीच्या पातळीखाली खोदून तयार केल्यामुळे याला ‘पाताळेश्वर’ म्हणजेच पाताळातील ईश्वर असे नाव देण्यात आले. पेशवेकालीन नोंदींमध्ये या मंदिराचा उल्लेख ‘भुयारातील महादेव’ असा केलेला आढळतो.

या लेण्यांची निर्मिती इ.स. ७५३ ते ९८२ या दरम्यानच्या राष्ट्रकूट राजांच्या, विशेषतः प्रथम कृष्णराज याच्या कारकिर्दीत झाल्याचे मानले जाते. सहाव्या शतकापासून दहाव्या शतकादरम्यान भारतात प्रभावी असलेली ही राजवट जैन धर्मीय असली तरीही शैव, वैष्णव आणि शाक्त धर्माचाही ते आदर करत असत. त्यामुळे त्यांचे बहुतेक सर्व शिलालेख भगवान विष्णू किंवा भगवान शिव यांच्या आराधनेने सुरू झाल्याचे पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील वेरूळ आणि एलिफंटा लेण्यांसह भारताच्या दक्षिणेकडील अनेक प्रसिद्ध वास्तूंच्या बांधकामांमध्ये राष्ट्रकूट राजांचा महत्त्वाचा वाटा आहे. राष्ट्रकूट राजा कृष्ण याच्या ताम्रपटात ‘पुण्यविषय’, ‘पूनकविषय’ आणि तेथील पाताळेश्वर मंदिराचा उल्लेख आढळतो तसेच ‘पुण्यविषय’ आणि ‘पूनकविषय’ हे पुण्याला उल्लेखून केलेले शब्दप्रयोग आहेत, असे सांगितले जाते.

राष्ट्रकूटांशी एकनिष्ठ असलेल्या आणि आपल्या राज्याचा पुण्यापर्यंत विस्तार करणाऱ्या उत्तर कोकणच्या शिलाहार राजानेही हे मंदिर बांधले असण्याची शक्यता वर्तविण्यात येते. मात्र अजूनही ही वास्तू नेमकी कधी उभी राहिली, याचा ठोस पुरावा मिळालेला नाही. या लेण्यांची वास्तुकला, विशेषतः स्तंभांची रचना आणि अखंड पाषाणातील कोरीव काम हे जगप्रसिद्ध वेरूळ येथील कैलास मंदिराशी साधर्म्य दर्शवते. हे मंदिर ‘एकाष्म’ तंत्राचा वापर करून एकाच मोठ्या खडकातून वरून खाली खोदत नेले आहे. हे त्या काळातील प्रगत अभियांत्रिकी कौशल्याची साक्ष देते.

पाताळेश्वर लेण्यांमध्ये मंदिराचे प्रवेशद्वार, नंदी मंडप आणि सभामंडप पूर्ण झालेले असले तरीही भिंतींवरील कोरीव काम आणि परिक्रमा मार्गाचा काही भाग अर्धवट स्थितीत आहे. या अपूर्णतेमागे प्रामुख्याने दोन संभाव्य कारणे इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञांकडून वर्तवली जातात. पहिले तांत्रिक कारण म्हणजे खोदकाम सुरू असताना कारागिरांना खडकाच्या गाभाऱ्याच्या मागील बाजूस एक दोषपूर्ण रेषा आढळली असावी. त्यामुळे पुढील काम करणे संरचनेच्या दृष्टीने धोक्याचे ठरले असते. दुसरे कारण म्हणजे राष्ट्रकूट राजवटीतील राजकीय अस्थैर्य किंवा राजाश्रय संपुष्टात आल्यामुळे हे काम अर्ध्यावरच थांबले असण्याची दाट शक्यता आहे. तथापि हे अपूर्णत्व या वास्तूच्या सौंदर्यात किंवा गूढतेमध्ये कोणतीही कमतरता आणत नाही.

एका आख्यायिकेनुसार अज्ञातवासाच्या काळात पांडव या परिसरात आले होते व त्यांनी भगवान शंकराची पूजा करण्यासाठी हे मंदिर एका रात्रीत बांधण्याचा संकल्प केला होता. आपल्या दैवी शक्तीचा वापर करून त्यांनी अखंड खडक कोरून कामाला सुरुवात केली. मात्र काम पूर्ण होण्याआधीच पहाट झाली आणि आपली ओळख उघड होण्याच्या भयाने पांडवांना हे काम अर्ध्यावरच सोडून प्रस्थान करावे लागले. याशिवाय जुन्या कागदपत्रांत आणि लोकव्यवहारात आढळणाऱ्या ‘पांचाळेश्वर’ या नावाचा संबंध काही लोककथांनुसार पांडवांची पत्नी द्रौपदी, जिला ‘पांचाली’ या नावानेही ओळखले जाई, तिच्याशी जोडला जातो. पाच पांडव आणि पांचाली यांनी स्थापित केलेले लिंग म्हणून याला ‘पांचाळेश्वर’ म्हटले जाते, असाही एक समज प्रचलित आहे.

ऐतिहासिक आणि साहित्यिक साधनांमध्ये या लेण्यांचे अनेक उल्लेख आढळतात. ना. वि. जोशी यांनी १८६८ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘पुणे शहराचे वर्णन’ या मराठी ग्रंथात पुण्याच्या अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील स्थितीचे वर्णन करताना पाताळेश्वरचा उल्लेख ‘शहराच्या बाहेर असलेली शांत जागा’ आणि ‘पांडव लेणी’ असा केला आहे. रावबहादूर पारसनीस यांच्या ‘पूना इन बायगोन डेज’ या पुस्तकातील पेशवेकालीन नोंदीनुसार १८१० मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी पुण्यातील मंदिरांना दिलेल्या दक्षिणेच्या यादीत ‘भुयारातील महादेव’ या नावाने पाताळेश्वरला एक रुपयाची दक्षिणा दिल्याची नोंद आहे. तसेच १८८५ च्या ‘गॅझेटिअर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सी: पूना’ मध्ये ब्रिटिश शासनाने याला ‘पांचाळेश्वर लेणी’ किंवा ‘भांबुर्डे लेणी’ असे संबोधून त्याचे शास्त्रीय वर्णन केले आहे. डॉ. एम. एस. माटे यांच्या ‘मराठा आर्किटेक्चर’ या ग्रंथातही या वास्तूच्या रचनेचा अभ्यासपूर्ण संदर्भ येतो.

अखंड पाषाणात कोरलेल्या लेण्यांतील हे शिवालय जंगली महाराज रस्त्यालगत आहे. मंदिराला दुहेरी तटबंदी आणि त्यामधील प्रवेशद्वारासह रस्त्यापासून काहीशा उंचावर असलेल्या प्रांगणात येण्यासाठी पायऱ्या आहेत. येथील सुशोभित उद्यानामुळे हा परिसर सुंदर व स्वच्छ भासतो. पुढे लोखंडी जाळ्यांची दुसरी तटबंदी ओलांडल्यावर कातळात खोदलेल्या पायऱ्या उतरून खाली यावे लागते. या लेण्यांसमोरच एका अखंड पाषाणात कोरलेला नंदीमंडप आहे. एखाद्या मोठ्या छत्रीसारखे दिसणारे हे गोलाकार छत तोलून धरण्यासाठी बाहेरील बाजूस बारा आणि आतल्या बाजूस चार असे एकूण सोळा चौकोनी स्तंभ आहेत. या मंडपाच्या मध्यभागी एका चौथऱ्यावर नंदी विराजमान असून प्रांगणात नंदीमंडपाच्या शेजारीच एक प्राचीन जलकुंड आहे.

नंदीमंडपाच्या पुढे डाव्या बाजूला कातळात कोरलेल्या एका ओसरीत लेण्यांचे मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारासमोर कातळात खोदलेल्या चार पायऱ्या आहेत. या प्रवेशद्वाराजवळ देवनागरी लिपीतील एक शिलालेख आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर अखंड खडकात कोरलेल्या प्रशस्त सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपातील डाव्या व उजव्या भिंतीवर पल्लव आणि पुष्पांची नक्षी असलेल्या पट्ट्या आहेत. या सभामंडपात एकूण तीस विशाल दगडी स्तंभ आहेत. हे स्तंभ साधे आणि चौकोनी आहेत. सभामंडपात चार स्तंभांच्या मध्येच जमिनीवर नंदीची मूर्ती आहे. सभामंडपात डाव्या बाजूच्या गर्भगृहासमोर असलेल्या वज्रपीठावरील काळ्या पाषाणातील मारुतीच्या मूर्तीसह दुसऱ्या वज्रपीठावर श्रीराम, लक्ष्मण व जानकी यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. या चारही मूर्तींची स्थापना अलीकडील काळात केली असल्याचे सांगितले जाते. सभामंडपाच्या भिंतींवर सप्तमात्रिका, गजलक्ष्मी, त्रिपुरांतक शिव आणि लिंगोद्भव शिवाची अस्पष्ट शिल्पे शैव आणि शाक्त संप्रदायाचा प्रभाव दर्शवतात. सन १८८५ च्या ब्रिटिश गॅझेटियरमधील नोंदीनुसार एकोणिव्या शतकाच्या उत्तरार्धात या सभामंडपाच्या भिंतींवर महाभारत आणि महादेवाची चित्रे होती.

मुख्य गुहेत तीन गर्भगृहे आहेत. मध्यभागी असलेल्या गर्भगृहात पितळी कवचाने मढविलेली पाताळेश्वराची स्वयंभू शिवपिंडी आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात डाव्या बाजूला गणपती तर उजव्या बाजूला पार्वतीचे मंदिर आहे. मूळ त्रिमूर्ती संकल्पनेनुसार येथे ब्रह्मा आणि विष्णूच्या मूर्ती असाव्यात, असा तर्क मांडला जातो. या गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी खडकातच मार्ग कोरलेला आहे. या अंधाऱ्या मार्गावरून प्रदक्षिणा घालताना गुहेच्या गूढतेचा अनुभव येतो. जमिनीच्या खाली उतरून या मंदिरात जावे लागत असल्यामुळे या लेण्याला ‘पाताळेश्वर’ असे नाव पडले असावे.

मंदिरातील उत्सवांमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेचा ‘दीपोत्सव’ महत्त्वाचा असतो. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी संपूर्ण मंदिर परिसर हजारो पणत्यांच्या पिवळ्या प्रकाशाने उजळून निघतो. या दिवशी मंदिरात अन्नकूट आणि महाआरतीचे आयोजन केले जाते. तसेच श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला येथे भक्तांची मोठी गर्दी असते. येथील शिवलिंगावर दूध, दही, तूप, मध आणि साखरेच्या पंचामृताने रुद्राभिषेक केला जातो. श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे जत्रा भरल्यासारखे वातावरण असते.

उपयुक्त माहिती

  • पुणे रेल्वे स्थानक व बस स्थानकापासून १.५ किमी अंतरावर
  • स्वारगेट एसटी स्थानकापासून ४.५ किमी अंतरावर
  • देशभरातील अनेक शहरांतून येथे येण्यासाठी विमान, रेल्वे व बस सेवा उपब्लध
  • शहरातील अनेक भागांतून येथे येण्यासाठी महापालिका परिवहन बसची सुवधा
  • खासगी वाहने सारसबागेच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
Back To Home