पांडेश्वर मंदिर

पांडेश्वर, ता. पुरंदर, जि. पुणे


पुरंदर तालुक्यात जेजुरी-मोरगाव रस्त्यावर मोरगावपासून १३ किलोमीटर अंतरावर पांडेश्वर हे प्राचीन शिवमंदिर आहे. हेमाडपंथी रचनेच्या या मंदिरातील भव्य शिवपिंडी सिंहासनावर स्थानापन्न आहे. ही पिंडी पांडवांनी दान केल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या आवारात कुंती, धर्म, भीम, नकुल, सहदेव यांची छोटी मंदिरे आहेत. अर्जुनाचे मंदिर येथे नाही. मात्र, एक धनुर्धारी वीराची मूर्ती असलेला दगड येथे कोरलेला आहे, तीच अर्जुनाची मूर्ती असल्याची मान्यता आहे.

मंदिरासंदर्भात आख्यायिका अशी, महाराज पंडू यांचे श्राद्ध करण्यासाठी पांडवांना पाण्याची गरज होती. भीमाने कृष्णाकडे याबाबत तोडगा विचारला. कृष्णाने सांगितल्यानुसार पश्चिमेकडील चतुर्मुख डोंगरावर ब्रह्मदेव तपश्चर्या करीत होते. त्यांच्या कमंडलूमध्ये १०८ नद्यांचे तीर्थ होते. भीमाने तो कमंडलू उलटविला आणि पांडेश्वरकडे धावत सुटला. त्याचवेळी ब्रह्मदेव भीमाचा पाठलाग करू लागले. भीम पुढे व त्याच्या मागे कमंडलूतील पाणी नदीच्या रुपाने वाहत येत होते.

कृष्णाने आधीच सांगितल्यानुसार भीमाने पांडेश्वरकडे परत येताना अनेक ठिकाणी बेल आणि तांदूळ ठेवले. ब्रह्मदेव बेल व तांदूळ असलेल्या जागेवर वाळूच्या शिवलिंगाची स्थापना करून पूजा करण्यासाठी थांबत. अशी अनेक शिवलिंग स्थापन करून त्यांनी पूजा केली. तोपर्यंत भीम पांडेश्वरपर्यंत पोचला आणि त्यासोबत नदीही पांडेश्वरला आली. भीमाचा पाठलाग करता करता ब्रह्मदेव पांडेश्वरला आले व त्यांनी या धार्मिक विधीत सहभाग घेतला. त्यांच्या या कमंडलूला ‘कर’ असे म्हटले जायचे. त्यावरून या नदीला ‘कऱ्हा’ हे नाव पडले. ब्रह्मदेवाने जिथे जिथे शिवलिंगाची स्थापना केली ते चांगावटेश्वर, संगमेश्वर, नागेश्वर ही भव्य मंदिरे आजही कऱ्हेच्या काठावर उभी आहेत.

असे सांगितले जाते की, संपूर्ण भारतात पांडेश्वर नावाची केवळ दोन मंदिरे आहेत. त्यातील एक आंध्र प्रदेशात, तर दुसरे पुरंदर तालुक्यातील हे मंदिर. पांडव वनवासात असताना कऱ्हा नदीच्या काठावर त्यांनी एका रात्रीत हे शिवमंदिर बांधले, अशी येथे मान्यता आहे.

नदीच्या बाजूने मंदिराभोवती उंच तटबंदी आहे. त्यावर आतील बाजूच्या भिंतीवर मूर्ती कोरलेल्या आहेत. तटात खालच्या बाजूने कमानीची रचना असलेली ओसरी आहे. येथूनच तटावर जाण्यासाठी दोन ठिकाणी पायऱ्या आहेत. मंदिराचा काही भाग हेमाडपंथी पद्धतीचा, तर वरच्या भागाचा जीर्णोद्धार नागरी शैलीत झाल्याचे जाणवते.

मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर नंदीमंडप आहे. प्रवेशद्वारावरील जय-विजय हे द्वारपाल कुशलतेने दगडात कोरलेले आहेत. मूर्तीभंजनाच्या तडाख्यात सापडूनही त्यांचे सौंदर्य अबाधित आहे. पायांत तोडे, कमरपट्टा, गळ्यात माळ, छातीवर पदक, बाहूंभोवती बाजूबंद, कर्णकुंडले, दाक्षिणात्य शैलीचा निमुळता मुकुट, डोक्यावर दगडी छत्र्या अशी कलाकुसर त्यात दिसते. द्वारपालांच्या बाजूच्या भिंतीवर गवाक्षे, फळाफुलांचे कोरलेले सुबक नक्षीकाम आहे. भिंतींमधील कोनाड्यांत काही ठिकाणी सरस्वती, लक्ष्मी व पार्वतीच्या मूर्ती आहेत.

सभामंडपात नक्षीदार खांब आहेत. त्यावर फणा काढलेले नाग व वेलबुट्टीदार नक्षी कोरलेली आहे. अनेक देवकोष्टके असून ती सर्व रिकामी आहेत, पूर्वी तेथे देवी-देवतांच्या मूर्ती असाव्यात. छतावरही सुंदर नक्षीकाम आहे. सभामंडपाच्या अर्धवर्तुळाकार बोगद्यासारख्या मार्गातून गाभाऱ्याकडे जाता येते. गाभाऱ्यातील शिवपिंडी आकाराने भव्य व सिंहासनावर स्थानापन्न आहे. अशी शिवपिंडी इतरत्र क्वचितच पाहायला मिळते.

प्रत्येक श्रावणी सोमवारी येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. महाशिवरात्रीलाही येथे मोठा उत्सव असतो. सकाळी ६ ते सायंकाळी ७ पर्यंत या मंदिरात देवदर्शन करता येते.

उपयुक्त माहिती:

  • जेजुरीपासून १५ तर मोरगावपासून १३ किमी अंतरावर
  • खासगी वाहनांनी मंदिरापर्यंत जाता येते
  • मंदिर परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home