अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात गोदावरीच्या तीरावर वसलेल्या पुणतांबे या गावास धार्मिक, पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गोदावरीच्या उगमापासूनच्या प्रवासात ती केवळ पुणतांबा येथे दक्षिणवाहिनी होते. पूर्व–पश्चिम वाहणारी नदी ज्या ठिकाणी दक्षिणवाहिनी होते ते स्थान धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र समजले जाते. पुणतांब्यात १६ मारुती मंदिरे, ६ महादेव मंदिरे, ३ विठ्ठल मंदिरे, २ दत्त मंदिरे, लक्ष्मी–नारायण मंदिर आणि चांगदेव महाराज मंदिर अशी धार्मिक स्थळे असल्यामुळे या गावास मंदिरांचे गाव असे म्हटले जाते. या मंदिरांच्या गावात ४०० वर्षांपूर्वीचे यज्ञसेनी देवीचे मंदिर व दुर्मिळ असे हेमाडपंती रचनेचे कार्तिक स्वामी मंदिर ही मंदिरे प्रसिद्ध आहेत.
ऐतिहासिक उल्लेखांनुसार, प्राचीन काळी पुण्यस्तंभ वा ताम्रनगरी (आताचे पुणतांबा) ही राजा विक्रमादित्याची राजधानी होती. हे गाव गोदावरी तीरावर वसलेले असल्यामुळे आणि येथील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांमुळे या गावाला दक्षिणकाशी असेही संबोधले जाते. या गोदावरीच्या काठी यज्ञसेनी देवीचे मंदिर आहे. यज्ञसेनी देवी मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील देवीच्या व्युत्पत्तीबाबत आख्यायिका अशी की प्राचीन काळी येथे चंद्रसेन राजा राज्य करीत होता, त्याच्या मुलास एक गंभीर आजार होता. अनेक उपचार करूनही तो बरा होत नव्हता. त्यावेळी राजास एका रात्री स्वप्न पडले की गोदावरीच्या काठावर यज्ञ करून त्यात १२ वर्षांखालील मुलाचा बळी दिल्यास त्याचा मुलगा रोगमुक्त होईल.
या स्वप्नदृष्टांतानुसार राज्यात दवंडी पिटवली गेली, ‘जो कोणी ब्राह्मण आपल्या मुलाला राजाकडे यज्ञात बळी देण्यासाठी देईल, त्याला मुलाच्या वजनाइतके सोने दान करण्यात येईल.’ येथून जवळ असलेल्या पुरणगावात गोऱ्हे आडनावाचे गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होते. त्यांना पाच मुले होती. त्यापैकी मुद्गल नावाच्या मुलाने राजाची ही दवंडी ऐकली व विचार केला की माझ्या बळी जाण्याने आपल्या कुटुंबाचे कल्याण होत असेल तर मी बळी जाण्यास तयार आहे. त्याने बळी जाण्याचे ठरवले व तसे राजाला कळविण्यात आले. राजाने मुद्गलच्या वजनाइतके सोने गोऱ्हे कुटुंबाला देऊन मुद्गलची संपूर्ण राज्यातून मिरवणूक काढली व त्यास बळी देण्यासाठी यज्ञकुंडाजवळ बसविले. मुद्गलची पूजा करून त्यास बळी देण्यासाठी यज्ञात टाकताच यज्ञातून देवी प्रकट झाली व तिने मुद्गल यास वरचेवर झेलून यज्ञकुडांबाहेर सोडले. यज्ञातून निघालेली देवी म्हणून ही देवी पुढे यज्ञसेनी नावाने प्रसिद्ध झाली. श्री यज्ञसेनी देवीचे मंदिर गावाच्या पश्चिमेला गोदावरीच्या तीरावर स्थित आहे.
त्यानंतर मुद्गल यांनी येथेच राहून देवीची अनेक वर्षे सेवा केली. त्यांना १४० वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. या ठिकाणी त्यांनी मुद्गल पुराण हा ग्रंथही लिहिला. मंदिरात देवीची पाषाणातील मूर्ती आहे. ही देवी अहमदनगर जिल्ह्यासोबतच खानदेशातील हजारो भाविकांची कुलदेवता मानली जाते. देवी मंदिरापासून काही अंतरावर मुद्गलेश्वर यांनी समाधी घेतली. हे समाधी मंदिर मुद्गलेश्वर (मुंजाचे) मंदिर म्हणून आज प्रसिद्ध आहे.
गोदावरी तीरावरील यज्ञसेनी देवीच्या मंदिराला सर्व बाजूंनी उंच तटबंदी आहे. त्यामुळे नदीला वारंवार येणाऱ्या पुरामुळे मंदिराचे नुकसान झालेले नाही. तटबंदीच्या प्रवेशद्वाराजवळ उंच प्राचीन दीपमाळ असून या दीपमाळेच्या आतून अरुंद जिन्यातून वर टोकावर जाता येते. तटबंदीत असलेल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मंदिर परिसरात प्रवेश होतो. जुन्या वाड्याप्रमाणे येथील रचना आहे. सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात ४०० वर्षांपूर्वीचा शिलालेख असून त्यावर पुरातन व जीर्ण झालेल्या मंदिराचा शके १६८१ रोजी हरबाजी बिडवाई यांनी नूतनीकरण केल्याचा उल्लेख आहे.
गोदावरीच्या एका किनाऱ्यावर यज्ञसेनी देवी, तर दुसऱ्या किनाऱ्यावर कार्तिक स्वामींचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार १६६४ मध्ये झालेला आहे. असे सांगितले जाते की या मंदिराजवळ आदिलशाही व निजामशाही यांची सीमा निश्चित करणारे ठिकाण होते. श्री कार्तिक स्वामींची महाराष्ट्रात ४ मंदिरे आहेत. त्या सर्व मंदिरांमध्ये एकमुखी मूर्ती असून पुणतांबा येथील मंदिरामध्ये कार्तिक स्वामींची सहामुखी (षष्टमुखी) मूर्ती आहे. वर्षभर या मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश नसला तरी कार्तिक पौर्णिमेच्या (त्रिपुरारी पौर्णिमा) दिवशी गाभाऱ्यात जाऊन स्त्रियांना कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येते. कार्तिक स्वामींच्या दर्शनाने आरोग्य, धनसंपत्ती, महिलांना सौभाग्याची प्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. कार्तिक पौर्णिमेला येथे मोठी जत्रा भरते. त्या एकाच दिवशी महिलांना कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याची अनुमती असल्यामुळे या जत्रेत महिलांची उपस्थिती लक्षणीय असते.
मंदिरांचे गाव यासोबतच पुणतांबा हे गाव प्रसिद्ध आहे ते ऐतिहासिक शेतकरी संपासाठी. २०१७ साली झालेल्या शेतकरी संपाची सुरुवात पुणतांबा गावापासून झाली. ग्रामसभेत ठराव करून १ जून २०१७ पासून येथील शेतकरी संपावर गेले. त्यांनी शहराकडे जाणारा भाजीपाला, अन्नधान्य व दूध पुरवठा रोखला व पेरणीही न करण्याचे ठरविले. येथून सुरू झालेल्या संपाचे रूपांतर नंतर राज्यव्यापी आंदोलनात झाले होते. त्यावेळी महाराष्ट्र सरकारला शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करावी लागली होती.