वाघजाई माता मंदिर

भोर, ता. भोर. जि. पुणे

पुणे जिल्ह्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भोर हा सर्वात मोठा तालुका. या तालुक्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे श्री वाघजाई देवीचे मूळस्थान रोहिडेश्वर किल्ल्याच्या डोंगरमाथ्यावर आहे. या देवीला वरची वाघजाई म्हणून संबोधले जाते. असे सांगितले जाते की एका भाविकाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवी त्याच्यासोबत खाली गावात वास्तव्यास आली. त्यामुळे आपल्या गावात स्वतः चालून आलेली देवी म्हणून हे देवीचे मंदिर येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची सर्वत्र ख्याती आहे.

एका आख्यायिकेनुसार, येथून जवळच असलेल्या भेलकेवाडी भोर येथील वाघजाई देवीचा एक निस्सीम भक्त होता. दररोज तो रोहिडेश्वर किल्ल्यावर असणाऱ्या डोंगरावरील देवीच्या दर्शनासाठी दऱ्याखोऱ्यांतून जात असे. वृद्धत्वामुळे त्याला डोंगरावर येजा करणे शक्य होत नव्हते म्हणून तो निराश झाला. आता देवीचे दर्शन कसे होणार, असा विचार करीत असतानाच देवीने त्याला दृष्टांत देऊन सांगितले की तू फक्त एकदा डोंगरावर माझ्या दर्शनाला ये, यापुढे तुला डोंगरावर यावे लागणार नाही. मीच तुझ्याबरोबर तुझ्या गावात वास्तव्याला येईन; परंतु हे सांगताना देवीने त्याला गाव येईपर्यंत मागे वळून पाहण्याची अट घातली. त्यानुसार भक्त पुढे देवी मागे असा प्रवास सुरू झाला. डोंगराच्या पायथ्याशी आल्यानंतर भक्ताला देवीच्या पायातील घुंगरांचा आवाज येणे बंद झाल्याने त्याने मागे वळून पाहिले. तोच कडकडाट होऊन देवी तेथून अदृश्य झाली या जागेवर देवीची तांदळारूपी मूर्ती प्रकट झाली. या मूर्तीजवळून पाण्याचे झरेही वाहू लागले. त्याच जागेवर ग्रामस्थांनी वाघजाई देवीचे छोटे मंदिर बांधले. येथील पाण्याचे झरे आजही सुरू असल्याचे पाहायला मिळतात.

भोर शहराच्या दक्षिणेला वाघजाईनगर परिसरात वाघजाई देवीचे मंदिर आहे. एका सुंदर कमानीतून मंदिर परिसरात प्रवेश होतो. या परिसरात सर्वत्र फरसबंदी करण्यात आली असून सुंदर उद्यान विकसित करण्यात आले आहे. त्यातील शोभेच्या फुलझाडांमुळे हा परिसर रम्य शांत भासतो. दर्शन मंडप, सभामंडप गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. २०१३ मध्ये केलेल्या नूतनीकरणानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. सभामंडपात सर्वत्र संगमरवरी फरसबंदी करण्यात आली असून वितानावर (छत) वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. या प्रशस्त सभामंडपातच गर्भगृह असून त्यामधील मखरात वाघजाई काळेश्वरी या देवींच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाला सभामंडपातून प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला दीपमाळ पाण्याचे टाक आहेत. याशिवाय परिसरात गणपती मारुती यांची मंदिरे आहेत.

हा परिसर प्रशस्त असून येथे भाविकांसाठी अनेक सोयीसुविधा ट्रस्टतर्फे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान त्यात खेळणी बसविली आहेत. भाविकांसाठी बैठकीची व्यवस्था, ग्रामस्थांच्या धार्मिक इतर विधींसाठी येथे सांस्कृतिक भवन बांधण्यात आले आहे.

वाघजाई मंदिरात दैनंदिन कार्यक्रमांबरोबरच दरवर्षी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होतो. या वेळी घटस्थापना, महापूजा, अभिषेक, भजन, कीर्तन, होमहवन, पालखी प्रदक्षिणा, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. माघी पौर्णिमेला येथे भरणारी यात्रा ही भोरमधील मोठी यात्रा समजली जाते. यावेळी हजारो भाविक उपस्थित असतात. यावेळी पालखी मिरवणुकीत मानाच्या काठ्या नाचविल्या जातात भाविकांकडून नवसपूर्तीनिमित्त तोरणे (नारळ, फुले, मिठाई) दिली जातात. धार्मिक कार्यासोबतच ट्रस्टकडून गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि आर्थिक मदत केली जाते. शहरवासीयांसाठी आरोग्य शिबिरे, तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया केल्या जातात.

राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्राच्यादर्जाच्या यादीत या देवस्थानाचा समावेश झालेला आहे. (ज्या देवस्थानाच्या दर्शनासाठी वर्षातून एक लाखांहून अधिक चार लाखांपर्यंत भाविक येतात, अशा देवस्थानाला राज्य सरकारकडून तीर्थक्षेत्राचादर्जा प्राप्त होतो.)

या मंदिराशिवाय भोर शहरात भोरेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर शहराच्या बाजारपेठ परिसरात असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक प्रसिद्ध आहे. या भोर तालुक्याने हिंदवी स्वराज्यासाठी अनेक वीर रत्न दिले आहेत. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, येसाजी कंक, जिवा महाला, कान्होजी जेधे, संभाजी कावजी कोंढाळकर यांचा समावेश आहे.

उपयुक्त माहिती:

  • भोर बसस्थानकापासून किमी, तर स्वारगेटपासून ६० किमी अंतरावर
  • सातारा, पुणे, मुंबई येथून भोरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home