वृद्धेश्वर मंदिर

घाटशिरस, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर

नाथ संप्रदायाचे आदिपीठ म्हणून पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र वृद्धेश्वर प्रसिद्ध आहे. गर्भगिरी डोंगराच्या पायथ्याशी निसर्गसमृद्ध परिसरात वसलेल्या ११ व्या शतकातील वृद्धेश्वर महादेव मंदिराच्या तिन्ही बाजुला डोंगर आहेत. असे सांगितले जाते की महादेवांनी येथे वृद्धाचे रूप घेऊन प्रसाद ग्रहण केला होता, तेव्हापासून या स्थानालावृद्धेश्वरवाम्हातारदेवअसे नाव पडले. हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून दर सोमवारी येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात.

मंदिराची आख्यायिका अशी की मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथांनी सुवर्ण सिद्ध मंत्राचा वापर करत येथील गर्भगिरी डोंगर सोन्याचा करून मच्छिंद्रनाथांच्या मनातील मोह दूर केला होता. हा सुवर्ण डोंगर मच्छिंद्रनाथांनी कुबेराला अर्पण करत या ठिकाणी ३३ कोटी देव, ऋषीमुनी यांना महाप्रसाद दिला. त्यासाठी येथील देवराईपर्यंत (देवराई हे पाथर्डी तालुक्यातील एक गाव, वृद्धेश्वर मंदिरापासून हे ठिकाण आठ किलोमीटर अंतरावर आहे) देवांची जेवणाची पंगत बसली होती. या पंगतीमध्ये महादेवांनी म्हाताऱ्याचे रूप घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. तेव्हा सर्व देवांनी महादेवांना विनंती केली की देवा आता हे रूप घेतले आहात, तर विश्व कल्याणासाठी याच रूपात येथे वास करावा. सर्व देवांच्या विनंतीवरून महादेव वृद्ध रूपात येथे राहिले म्हणून हे क्षेत्र म्हातारदेव (वृद्धेश्वर) म्हणून प्रसिद्ध झाले. यज्ञाच्या वेळी मच्छिंद्रनाथांनी पेटविलेली धुनी आजही मंदिराच्या दाराजवळ तेवत असते.

वृद्धेश्वर देवस्थान हे नाथपंथाचे उगमस्थान समजले जाते. त्यामुळे वृद्धेश्वरालाआदिनाथअसेही म्हणतात. या मंदिरासभोवती भक्कम तटबंदी आहे. तटबंदीतून मंदिरात जाण्यासाठी प्रशस्त प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारावर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर केलेली दिसते. मंदिराच्या प्रशस्त आवारात मध्यभागी वृद्धेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराच्या शिखरावर सुंदर नक्षीकाम असून तेथे विविध देवदेवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराचे बांधकाम दगडांत केलेले आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबत असे सांगितले जाते की घाटशिरस, कान्होबावाडी, पारेवाडी या गावांमध्ये अनेक जुने वाडे होते. १०० वर्षांपूर्वीच्या जुन्या पडलेल्या वाड्यांच्या दगडांचा वापर मंदिराच्या बांधकामासाठी करण्यात आला. त्यामुळे नवीन बांधणीचे हे मंदिर असले तरी या दगडांमुळे त्याची बांधणी प्राचीन वाटते. मंदिर परिसरात नाथपंथी धुनीसोबतच गणपती, मारुती, कपिलमुनी, काशी विश्वेश्वर यांची मंदिरे आहेत. मंदिराच्या मागे ओढ्यामध्ये असलेली ज्ञानावापी विहीर नाथांच्या काळातील असल्याचे सांगितले जाते

सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपातील भिंती वितानावर (शिखराकडील भाग) कोरीव काम आहे. मध्यभागी भलीमोठी घंटा टांगलेली आहे. १२व्या शतकात श्रवणदेव राजाने ती अर्पण केली होती, असे सांगण्यात येते. गर्भगृहात स्वयंभू शिवपिंडी आहे. येथील शाळुंका वैशिष्ट्यपूर्ण असून ती नैसर्गिकरित्या तयार झालेली आहे. शिवपिंडीवर असलेले अनेक गोलाकार दगड हेच येथील शिवलिंगे आहेत. पश्चिमाभिमुख मंदिराच्या प्रवेशद्वारांतील गवाक्षांतून वर्षातील काही दिवस सूर्यकिरणे थेट वृद्धेश्वराच्या पिंडीवर पडतात. हे जागृत शिवलिंग असून दरवर्षी महाशिवरात्रीला ते गव्हाच्या आकाराएवढे वाढते, म्हणजेच वृद्धिंगत होते, म्हणूनही यालावृद्धेश्वरनावाने ओळखले जाते, अशीही भाविकांची धारणा आहे. गर्भगृहात शिवपिंडीच्या समोरील बाजूला पार्वती मातेची मूर्ती आहे

महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी येथे उत्सव असतो. या दोन्ही दिवशी पैठणहून कावडीने वृद्धेश्वरासाठी गंगातीर्थ आणण्यात येते. श्रावण महिन्यात दररोज रात्री ते या वेळेत येथे बेलआरती करण्यात येते. यावेळी भाविकांकडून शिवपिंडीवर हजारो बेलपत्र वाहिली जातात. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक हजर असतात. देवस्थान ट्रस्टतर्फे दर रविवारी भाविकांना आमटीभाकरीचा प्रसाद दिला जातो. पुण्यातील धनकवडी येथील सद्‌गुरू शंकर महाराज यांनी मंदिर परिसरात १९३२ ते १९३६ अशी वर्षे वास्तव्य करून साधना केली होती, असे ग्रामस्थ सांगतात

उपयुक्त माहिती:

  • पाथर्डीपासून २६ किमी, तर अहिल्यानगरपासून ४५ किमी अंतरावर
  • पाथर्डीपासून गावात येण्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा उपलब्ध
Back To Home