महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय व कर्नाटकातील हरिदास संप्रदाय यांचे विठ्ठल हे प्रमुख दैवत. विष्णूचा अवतार आणि कृष्णाचे रूप असलेले विठ्ठल हे विठोबा, पांडुरंग, पंढरीनाथ या व अशा अनेक नावांनी प्रसिद्ध आहेत. विठ्ठल वा पांडुरंग म्हटले की डोळ्यांसमोर येते ती कटेवर दोन हात ठेवलेली व विटेवर उभी असलेली सावळी, सुंदर व गोजिरी मूर्ती; परंतु अहमदनगर जिल्ह्यातील टाकळीभान येथील मंदिरातील विठ्ठल मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून या मूर्तीला चक्क मिशी व चार हात आहेत. त्यातील दोन हात हे कटेवर, तर एका हातात शंख व दुसऱ्या हातात चक्र आहे. ही मूर्ती सुमारे १६०० वर्षांपूर्वीची असून अशा प्रकारची महाराष्ट्रातील ही एकमेव मूर्ती असल्याचे सांगितले जाते.
नेवासा ते श्रीरामपूर रस्त्यावर असलेले टाकळीभान हे गाव प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते ते येथील पुरातन विठ्ठल–रुख्मिणी मंदिरामुळे. यादवकालीन असलेले हे मंदिर येथील वैशिष्ट्यपूर्ण विठ्ठलाच्या मूर्तीमुळे प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की यादवकाळात भान (भानू) नावाचा राजा पांडुरंगाचा भक्त होता. या गावाचे तेव्हाचे नाव टाकळी असावे. भान राजाच्या वास्तव्यानंतर ‘टाकळीभान’ हे नाव पडले. त्यावेळी येथे विठ्ठलाची चतुर्भुज मूर्ती होती. या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग व ओठावर मिशी होती. इतिहास संशोधकांच्या मते, यादवकाळाच्या आधीपासून ही मूर्ती येथे आहे. याबाबतची माहिती पंढरपुरात सापडलेल्या एका शिलालेखात आहे. महाद्वार रस्त्यावर विठ्ठल मंदिराकडून चंद्रभागेकडे जाताना डावीकडे असलेल्या पोलिस चौकीच्या इमारतीत एक लेखशिला आहे.
त्यातील लेख देवगिरीच्या यादव घराण्यातील महादेवराव यादव यांच्या कारकिर्दीतील असून लेखाचा काळ ज्येष्ठ शु. ११, शके ११९२ (इ.स. १२७०) असा आहे. पंढरपुरात भीमेच्या काठी, सितवाहक कुळातील काश्यपगोत्री केशवपुत्र भानूने आप्तोर्याम यज्ञ केल्याची नोंद या शिलालेखात आहे. हा ब्राह्मणकुलीन भानू म्हणजेच भान यादवांचा सामंत असल्याचे सांगितले जाते.
अनेक संशोधकांनी या मूर्तीचा निर्माण कालावधी १६०० वर्षांपूर्वीचा असल्याचे दाखले दिलेले आहेत. यादवकालीन भानू राजाची टाकळी ही राजधानी असल्याचेही संशोधकांच्या शोध निष्कर्षातून सिद्ध झाले आहे. पंढरपूरप्रमाणे येथील आषाढी उत्सव आषाढ प्रतिपदा ते पौर्णिमा या दरम्यान साजरा केला जातो. पंढरपूर येथील विठ्ठल मूर्ती व ही मूर्ती एकाच काळात घडविलेल्या असाव्यात, असा अंदाजही व्यक्त करण्यात येतो. इतिहास संशोधक रा. चिं. ढेरे यांनीही येथील विठ्ठल मूर्तीवर संशोधन करून मूर्तीचे महात्म्य विषद केले आहे. महानुभव साहित्य स्थानपोथी व लीळाचरित्र यामध्ये या मंदिराचा उल्लेख १३व्या शतकातील यादव काळाशी जोडलेला आहे.
गावाच्या मध्यभागी एका लहानशा टेकडीवजा उंचवट्यावर हे मंदिर स्थित आहे. १९७७ मध्ये केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. मंदिर हेमाडपंती रचनेचे असून संपूर्ण दगडी बांधकाम व त्यावर कोरीव नक्षीकाम असे त्याचे रूप आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपाच्या भिंतींवरील देवड्यांमध्ये श्रीगणेश, संत नामदेव महाराज, संत जनाबाई, पांडुरंग, संत गोरोबा काका, संत चोखामेळा, संत नरहरी सोनार, संत सावता माळी, संत कैकाडी महाराज, गंगागिरी महाराज, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, संत सेना महाराज, संत रोहिदास, महामुनी मातंगऋषी, संत जगनाडे महाराज या देवतांच्या व थोर संतांच्या संगमरवरी मूर्ती आहेत.
अंतराळात असलेल्या दोन कोरीव खांबांना लागून हनुमंत व गरुडदेव यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम केलेले आहे. गर्भगृहातील चौथऱ्यावर विठ्ठल व रुख्मिणी यांच्या मूर्ती आहेत. चतुर्भुज, ओठावर मिशी, मस्तकावर शिवपिंडी आहे व छातीवर कौस्तुभमणी अशी विठ्ठल मूर्ती असून त्याशेजारी रुख्मिणी मातेची मूर्ती आहे.
चतुर्भुज मूर्ति लावण्य रुपड़े । पाहतां आवडे जीवा बहू ॥१॥
वैंजयंती माळा कीरीट कुंडलें । भुषण मिरवलें मकराकार ॥२॥
कासे सोनसळा पितांबर पिवळा । कस्तुरीचा टिळा शोभे माथे ॥३॥
शंख चक्र हातीं पद्म तें शोभलें । भानुदासें वंदिलें चरणकमळ ॥४॥
संत भानुदास यांचा हा अभंग टाकळीभान येथील विठ्ठलाच्या मूर्तीला तंतोतंत लागू पडतो.
आषाढ शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमा या दरम्यान येथील आषाढी उत्सव साजरा होतो. या उत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई केली जाते. यावेळी दररोज ग्रामस्थांकडून अन्नदान केले जाते. दररोज सायंकाळी ५ वाजता विठ्ठल–रुख्मिणीची दिंडी काढली जाते. गावात प्रदक्षिणा करून दिंडी मंदिरात आल्यावर आरती होऊन महाप्रसाद दिला जातो. चतुर्दशीच्या दिवशी येथे भंडारा असतो. या दिवशी टाकळीभान व पंचक्रोशीतील भजनी मंडळे टाळ, मृदंग व वीणा यांसह दिंड्या घेऊन विठ्ठलाच्या दरबारात हजेरी लावतात. पौर्णिमेच्या दिवशी दहीहंडीच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होते.