विरभद्र मंदिर

सोनेवाडी, शहा डोंगर, ता. जि. अहमदनगर

अहमदनगर शहरापासून जवळच असलेल्या सोनेवाडी येथील शहा डोंगरावर ७०० वर्षे प्राचीन असे विरभद्र महाराज मंदिर आहे. देशात दक्षिणेकडे विरभद्र महाराजांची अनेक मंदिरे आहेत. अहमदनगरमधील प्रसिद्ध असलेल्या चांदबिबी महालाचे बांधकाम सुरू असतानाच या मंदिराची निर्मिती झाली. असे सांगितले जाते की या बांधकामासाठी कर्नाटकमधून आलेल्या कारागिरांच्या हाकेला धावून विरभद्र महाराजांची स्वयंभू मूर्ती येथे प्रकट झाली.

ऐतिहासिक संदर्भ आख्यायिकेनुसार, चांदबिबी ही अहमदनगरचा निजामशाह बादशाह हुसेन याची कन्या. चांदबिबी हिच्या नावाने महाल बनवण्यासाठी कर्नाटक राज्यातून कारागीर आणले गेले होते. हा महाल बनवण्यासाठी अनेक वर्षे लागणार होती. त्यासाठी कर्नाटकातील लिंगायत आणि जंगम समाजातील शेकडो कारागीर अहमदनगर येथे वास्तव्यास आले. विरभद्र महाराज हे त्यांचे मुख्य दैवत. त्या दैवताच्या उत्सवासाठी त्यांना कर्नाटकात जायचे होते, परंतु महालाच्या कामात खंड नको म्हणून त्यांना कर्नाटकात जाण्यास परवानगी मिळाली नाही. निराश झालेल्या या कारागिरांनी विरभद्र देवाला साद घातली. भक्तांची आर्त साद देवाने ऐकली येथील पाटलाला काही कारागिरांना आपण शहा डोंगरावर असल्याचा स्वप्नदृष्टांत दिला. दृष्टांताप्रमाणे मूर्ती सापडल्यावर कामगार आणि ग्रामस्थांनी देवाला गावात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथून देवाची मूर्ती काही केल्या पुढे सरकत नसल्याने अखेर या डोंगरावरच विरभद्र देवाचे मंदिर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. चांदबिबी महाल तयार होत असतानाच या कामगारांनी विरभद्र देवाचे मंदिरही उभारले.

स्कंद शिव पुराणातील संदर्भांनुसार, विरभद्रांचा जन्म श्रीशंकरांच्या जटातून झाला. श्रीशंकरांची पत्नी सती हिने आपल्या माहेरी पतीचा अपमान झाला म्हणून यज्ञकुंडात उडी घेऊन स्वतःचे जीवन संपवले. हे समजल्यावर संतापलेल्या श्रीशंकरांनी जटा आपटल्याने विरभद्र प्रकट झाले. विरभद्र हा श्रीशंकरांचा महाविनाशकारी अवतार समजला जातो. विरभद्रांनी सतीच्या माहेरी अनेकांना कापून काढले, तर अनेकांना भस्म केले. त्याला शांत करण्यासाठी श्रीविष्णू ब्रह्मदेवांनी पुढाकार घेतला. श्रीशंकर शांत झाल्यानंतर विरभद्रांनी पृथ्वीवरच वास्तव्य करण्याचे ठरविले

अहमदनगर शहराच्या वेशीवर असलेल्या सोनेवाडी गावाजवळ शहा डोंगरावरील विरभद्र मंदिर हे संपूर्ण दगडी बांधणीचे आहे. मंदिराभोवती सुमारे २५ ते ३० फूट उंचीची भव्य अशी तटबंदी आहे. जमिनीपासून ते १० पायऱ्या चढून गेल्यानंतर तटबंदीमध्ये मंदिराचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारावर दगडी बांधणीतील नगारखाना आहे. प्रवेशद्वारापासून आणखी १० पायऱ्या चढल्यावर मंदिर परिसरात प्रवेश होतो. नंदी मंडप, सभामंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. नंदी मंडपाच्या समोर श्रीगणेशाचे मंदिर आहे. गर्भगृहातील उंच चौथऱ्यावरील मखरात विरभद्रांची पाषाणी स्वयंभू मूर्ती आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूला विरभद्रांची पत्नी भद्रकाली दक्ष राजाचा विरभद्रांनी शिरच्छेद केल्यानंतर त्याला बकऱ्याचे तोंड लावले होते, ती लहान मूर्तीही आहे.

या मंदिराचे शिखर वैशिष्ट्यपूर्ण आहे. या शिखराच्या चारही बाजूने मिनार, तर मध्यभागी कळस आहे. या कळसामध्ये शेकडो देवड्यांची रचना असून त्यात अनेक देवदेवता विराजमान आहेत. परिसरात वरदाईनी माता दानम्मा माता यांची मंदिरे आहेत. याशिवाय भलीमोठी बारव आहे. मंदिर परिसर प्रशस्त असून येथे कार्तिक पौर्णिमा, महाशिवरात्र, विरभद्र देवाचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. गणपती, कार्तिक स्वामी आणि विरभद्र महाराज ही भावंडे मानली जातात. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामी आणि विरभद्र महाराज यांचे दर्शन घेतले जाते. हे भाऊ कार्तिक पौर्णिमेला येथे असलेल्या बारवेत एकमेकांना भेटतात, त्यावेळी त्यांचे दर्शन घेतल्याने पुण्यप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

येथील प्रत्येक उत्सवात धूप महोत्सवाला विशेष महत्त्व असते. यालाचगुगुळ कार्यअसेही संबोधले जाते. लिंगायत आणि जंगम समाजातील धार्मिक कार्य गुगुळाशिवाय अपूर्ण समजले जाते. त्यामुळे मंदिरातील प्रत्येक धार्मिक कार्यात गुगुळ कार्य पार पाडले जाते. यावेळी हजारो भाविक विरभद्र महाराजांच्या दर्शनाला उपस्थित असतात. या मंदिरात लिंगायत मल्लिकार्जुन महाराज यांची पुण्यतिथीही साजरी केली जाते.

उपयुक्त माहिती:

  • अहमदनगर शहरापासून ११ किमी अंतरावर
  • अहमदनगर, तिसगाव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा उपलब्ध नाही
Back To Home