वीरभद्र महाराज मंदिर

राहाता, ता. राहाता, जि. अहमदनगर

वीरभद्र हे महादेवांचे एक रूप मानले जाते. देशभरात वीरभद्र महाराजांची अनेक मंदिरे आहेत; परंतु अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहराचे ग्रामदैवत असलेले वीरभद्र महाराज देवस्थान प्रसिद्ध आहे ते येथील बगाड यात्रेमुळे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या यात्रोत्सवात नवसपूर्तीसाठी सुमारे २००० महिला ४०० ते ५०० पुरुष बगाडाला गळी लागतात. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही येथे मोठ्या उत्साहाने पाळली जाते.

वीरभद्र मंदिराची आख्यायिका अशी की कासार समाजातील एक महिला वीरभद्र महाराजांची निस्सीम भक्त होती. ब्रह्ममुहूर्तावर (साधारणतः पहाटे ते .३० ही वेळ) देवाची पूजा करता यावी यासाठी ही महिला मध्यरात्री आपल्या घरातून निघत असे. सुमारे दोन तास जंगलातून पायपीट करून ती पहाटेच्या वेळी वीरभद्राचे जेथे मूळ स्थान होते (आताच्या शिर्डी शहराच्या सीमेलगत एका डोंगरात) तेथे देवाच्या दर्शनाला जात असे मनोभावे देवाची पूजा करीत असे. अनेक दिवस हा प्रकार सुरू असल्याने तिच्या सासऱ्याला तिचा संशय आला. इतक्या रात्री सून कोठे जाते, याचा छडा लावण्याचा निश्चय त्याने केला एके दिवशी सून घरातून निघाल्याबरोबर सासराही तिच्या नकळत मागे मागे जाऊ लागला. वीरभद्र महाराजांची पूजा सुरू असताना सासऱ्यांनी आपल्याला पाहिल्याचे लक्षात येताच ती घाबरली तिने देवाकडे स्वतःला वाचविण्यासाठी धावा केला. देवानेही तिचा धावा ऐकून त्वरित तिला आपल्या तांदळ्यात (हात, पाय नसणारी मुखवटावजा मूर्ती) विलीन करून घेतली.

हा सर्व प्रकार तिचा सासरा पाहत होता. या घटनेमुळे तोही वीरभद्र महाराजांचा भक्त झाला आणि नित्यनेमाने देवाची उपासना करू लागला. अनेक वर्षे देवाची सेवा केल्यानंतर त्याला आता जंगलातील प्रवास करणे कठीण होऊ लागले. तेव्हा त्याने देवाकडे विनंती केली की देवा तुझ्या उपासनेत खंड पडू नये असे मला मनोमन वाटते; परंतु वयोमानामुळे आता मला तुझ्या भेटीला रोज येणे शक्य नाही. तेव्हा तूच माझ्या गावात ये, जेणेकरून मला तुझी रोज सेवा करता येईल. भक्ताची ही इच्छा वीरभद्र महाराजांनी मान्य केली. त्यानुसार आज जेथे मंदिर आहे त्या जागेवर मूर्तीरूपात देव प्रकट झाले. सुमारे ७०० वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी त्या मूर्तीची तेथेच असलेल्या एका जुन्या वाड्यात प्रतिष्ठापना केली होती. तेव्हापासून वीरभद्र महाराज राहाता ग्रामस्थांचे ग्रामदैवत श्रद्धास्थान आहेत.

शिर्डी शहरापासून जवळ असलेल्या राहाता शहराच्या मध्यवर्ती भागात वीरभद्र महाराजांचे दाक्षिणात्य पद्धतीचे भव्य सुंदर मंदिर आहे. अतिशय जागृत नवसाला पावणारा देव, अशी या देवस्थानाची ख्याती आहे. पूर्वी एका वाड्यात असलेल्या या प्राचीन मंदिराचा आतापर्यंत अनेकदा जीर्णोद्धार झाला आहे. २० वर्षांपूर्वी झालेल्या नूतनीकरणानंतर मंदिराला आताचे स्वरूप आले आहे. मंदिराच्या भव्य प्रांगणात एका उंच चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आहे. त्याच्या बाजूलाच सुमारे ५० फूट उंचीचा ध्वजस्तंभ आहे

मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून त्यामध्ये एका बाजूला नागाचे वेटोळे घातलेले भव्य शिल्प असून त्या वेटोळ्यावर देवी विराजमान आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे येथील एका खांबावर उभे असलेले दत्त मंदिर. खालच्या बाजूला खांब, मध्यभागी कमळपुष्प त्यात वरील छतापर्यंत श्रीदत्ताचे मंदिर, अशी सुंदर रचना येथे केलेली दिसते. पायरी मार्गाने या दत्त मंदिरात जाता येते. या लहानशा मंदिरात प्रदक्षिणा मार्गही आहे. भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या नियोजनासाठी सभामंडपात दर्शन मार्ग करण्यात आला आहे. गर्भगृहाच्या उजव्या बाजूच्या भिंतीला लागून साईबाबांचे स्थान आहे. असे सांगितले जाते की वीरभद्र मंदिराच्या सभामंडपातील या स्थानावर उपासनेसाठी साईबाबा येत असत. सभामंडपातून पुढे गेल्यावर गर्भगृहात चांदीच्या मखरात वीरभद्र महाराजांची मूर्ती स्थानापन्न आहे.

वीरभद्र महाराजांचा यात्रोत्सव हा अहमदनगर जिल्ह्यातील मोठ्या उत्सवांपैकी एक समजला जातो. ‘बगाड यात्राम्हणून परिचित असलेला हा यात्रोत्सव गुढीपाडव्यापासून पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो. ढोलताशांच्या निनादात, डफांच्या तालावर देवाच्या मुखवट्याची मानाच्या काठ्यांची मिरवणूक निघते. यात्रेचा खास मान हा माळी, धनगर मराठा समाजाला दिला जातो. या मंदिरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या मायंबा मंदिरात ही मिरवणूक जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावात प्रदक्षिणा करून मंदिरापाशी परत येते. यात्रा कालावधीत लाखो भाविक वीरभद्र महाराजांच्या दर्शनाला येतात. गूळभाकर पुरणपोळीचा नैवेद्य देवाला दाखविण्याची येथे पद्धत आहे. वर्षभर केलेल्या नवसांची पूर्ती म्हणून येथे गळी लागण्याची प्रथा आहे. त्यासाठी हत्तीची प्रतिकृती तयार करून रथ बनवला जातो आणि रथाच्या आडव्या खांबावर दोन्ही बाजूला (गळवंतीला) नवसपूर्तीसाठी भाविकांना लटकवून फेरी पूर्ण केली जाते. या बगाडाला लटकणाऱ्या पुरुषांपेक्षा महिलांची संख्या मोठी असते.

गळवंतीला लटकण्याची ही परंपरा शेकडो वर्षांपासून राहातावासीयांनी जपली आहे. यामध्ये उच्चशिक्षित तरुणांचाही मोठा सहभाग असतो. आजपर्यंत गळवंतीला लटकून कुठलीही इजा, अपघात वा कोणी जखमी झालेले नाही, हे येथील विशेष आहे. वीरभद्र महाराज मंदिरात आषाढ महिन्यात महालक्ष्मी उत्सव, श्रावणात महादेवाचा उत्सव, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असे अनेक उत्सव साजरे केले जातात.

उपयुक्त माहिती:

  • राहाता बस स्थानकापासून पायी मिनिटांच्या अंतरावर 
  • शिर्डीपासून किमी, तर अहमदनगरपासून ७८ किमी अंतरावर
  • राहाता येथे जाण्यासाठी राज्यातील अनेक भागांतून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home