सुमारे तेराव्या शतकापासून महाराष्ट्राला संत परंपरेचा समृद्ध इतिहास लाभला आहे. संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम हा पायापासून कळसापर्यंत वारकरी संप्रदायाचा डोलारा अनेक संतांनी उभा केला. धर्मातील अनेक जाचक नियम, शर्ती झुगारून समाजातील तळागाळातील माणसाला उत्कर्षाचा अधिकार या संतांनीच मिळवून दिला. पुढे यात गूढवादाची आणि विविध संप्रदायांची भर पडत गेली, ज्यातून वेगवेगळ्या शाखा उदयास आल्या. याच गूढवादाचे एक थोर अधिकारी अभ्यासक म्हणून संत तुकामाई यांचे नाव आदराने घेतले जाते. शिष्याचे गुरूने बांधलेले समाधी मंदिर म्हणून त्यांच्या येहेळगाव येथील समाधी मंदिराचे वेगळेपण विशेष उठून दिसते. या समाधीचे दर्शन घेतल्याने अनेक समस्यांची उकल होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हे समाधी मंदिर दीडशे वर्षांहून अधिक प्राचीन आहे. काशिनाथपंत व पार्वतीबाई यांच्या पोटी सन १८१२ साली तुकाराम महाराजांचा जन्म झाला. बालपणापासूनच त्यांना अध्यात्माची प्रचंड आवड आणि देव जाणून घेण्याची ओढ होती. ते रंजल्या-गांजल्यांना मदत करीत, तसेच रोग्यांचे रोग व अपंगांचे पंगुपण दूर करीत. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील स्वामी चिन्मयानंद यांच्या गुरुछायेत तुकामाई यांनी गूढवादाचा अभ्यास केला. आपल्याला मिळालेली सर्व दक्षिणा व दान ते गुरूंना अर्पण करीत. इतकेच नव्हे तर, त्यांना मिळालेली जमीनही त्यांनी गुरूंना दान केली.
त्यांच्या आयुष्यात चमत्कारांची अनेक आख्याने सांगितली जातात. त्यांनी अध्यात्मात उच्च अधिकार प्राप्त केला होता, तसेच ते महान तपस्वी व योगी होते. विशेष म्हणजे ते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे गुरू होते. ३० मे १८८७, ज्येष्ठ शुद्ध अष्टमी या दिवशी त्यांनी देहत्याग केला. त्यांचे हे समाधी मंदिर खुद्द त्यांच्या गुरूंनी म्हणजे स्वामी चिन्मयानंद यांनी बांधले आहे, ही एक दुर्मिळ बाब आहे. त्यामुळेच मंदिरात अनेक ठिकाणी ‘चिन्मय सरकार तर्फे बांधकाम’ असे लिहिलेले आढळते. समाधी मंदिराची व्यवस्था आजही उमरखेड संस्थानमार्फत पाहिली जाते.
गावशीवेवर मंदिराची पहिली स्वागतकमान आहे. चौकोनी स्तंभांवर दुमजली सज्जा, असे या स्वागतकमानीचे आकर्षक स्वरूप आहे. येथून मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पक्की सडक आहे, तसेच मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळही उपलब्ध आहे. मंदिरास भक्कम तटबंदी लाभली आहे. तटबंदीच्या बाहेर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला तुळशी वृंदावन दिसून येते. तटबंदीत प्रवेशद्वार आणि त्यासमोर मुखमंडप आहे. मुखमंडपात एकमेकांना महिरपी तोरणाने जोडलेले आठ चौकोनी स्तंभ आहेत. त्यांवरील छतावर आडव्या ओळीत तीन घुमटाकार शिखरे दिसतात. त्यातील मधले शिखर अधिक उंच आहे. शिखरांच्या शीर्षभागी स्तूपिका व कळस आहेत.
मुखमंडपात उजव्या व डाव्या बाजूला वज्रपीठावर गरुड व हनुमंत यांच्या मूर्ती विराजमान आहेत. तटबंदीतून आत जाताच अर्धमंडप, दुमजली सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी रचना असलेले सुंदर समाधी मंदिर दिसते. अर्धमंडपात बारा नक्षीदार स्तंभ आहेत. या स्तंभांच्या शीर्षभागी कणी व कणीवरील तुळईवर छत आहे. अर्धमंडपात भाविकांना बसण्यासाठी आसनांची सोय करण्यात आली आहे. पुढे अर्धखुल्या स्वरूपाचा सभामंडप लागतो.
सभामंडपात स्तंभांच्या चार रांगा आहेत, तसेच डाव्या बाजूला रजतपटल (चांदीचे) आच्छादन केलेला गरुडस्तंभ आहे. या स्तंभावर वेगवेगळ्या देवी-देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. सभामंडपातील मधल्या दोन रांगांतील स्तंभ लाकडी आहेत, तर बाह्यबाजूच्या स्तंभांवर अर्धचंद्राकार कमानी आहेत. सभामंडपात स्टेनलेस स्टीलचे कठडे लावून रांगांचे व्यवस्थापन केलेले आहे.
पुढे अंतराळात जमिनीवर कासव शिल्प आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लाकडी मेजावर चांदीची गजराज शिल्पे आहेत. अंतराळात तुकाराम महाराजांची पितळी उत्सवमूर्ती व तसबिरी ठेवण्यात आल्या आहेत.
अंतराळापेक्षा उंचावर असलेल्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास दोन पायऱ्या आहेत. येथे रजतपटल आच्छादित नक्षीदार द्वारशाखा, ललाटपट्टी व तोरण शोभून दिसते. तोरणावर समाधीलेख कोरलेला आहे. गर्भगृहात तुकाराम महाराजांच्या समाधीचा चौथरा आहे आणि चौथऱ्यावर शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेकपात्र छताला टांगलेले आहे. गर्भगृहात मागील भिंतीतील देवकोष्ठकात विठ्ठल-रखुमाई यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या बाह्यबाजूने प्रदक्षिणा मार्ग तयार करण्यात आला आहे. गर्भगृहाच्या छतावर सात थरांचे शिखर आहे. शिखराचा पहिला थर चौकोनी आहे, त्यात चारही बाजूंनी एकूण वीस देवकोष्ठके आहेत. या थरात चारही कोनांवर गजराज शिल्पे आहेत. शिखराचे वरील सहा थर द्वादशकोनी आहेत, ज्यात प्रत्येक थरात बारा देवकोष्ठके आहेत. सर्व देवकोष्ठकांत विविध देवी-देवतांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. शिखरावर शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक व त्यावर कळस आहेत. मंदिराच्या सभोवती तटबंदीला लागून सेवेकरी व महंतांची निवासस्थाने, भक्तनिवास, अन्नछत्र, देवस्थानचे कार्यालय व इतर वास्तू आहेत.
ज्येष्ठ मासातील शुद्ध अष्टमी हा तुकाराम महाराजांचा पुण्यतिथी सोहळा येथील मुख्य वार्षिक उत्सव मानला जातो. या वेळी महाराजांचे हजारो भक्त सोहळ्यात सहभागी होतात. याशिवाय गुरुपौर्णिमा, दत्तजयंती व महाशिवरात्रीस भाविकांची विशेष उपस्थिती असते. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन, संगीत, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परिसरातील अनेक भाविक पायी दिंडीने तुकाराम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येतात. दर गुरुवारी मंदिरात भाविकांची विशेष गर्दी असते.