अहमदनगर जिल्ह्यात उगम पावलेली प्रवरा व नाशिक जिल्ह्यातून येणारी गोदावरी या नद्यांचा संगम नेवासे येथे होतो. औरंगाबाद-अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या या प्रवरासंगमावर कायगाव टोका गावात साधारणतः १२व्या शतकातील ‘शिल्पजडीत’ सिद्धेश्वर मंदिर आहे. हेमाडपंती स्थापत्य शैलीतील हे मंदिर पुरातन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून प्रसिद्ध आहे.
मंदिराबाबत असे सांगितले जाते की श्रीरामांनी हरिणीचे रूप घेतलेल्या मारीच राक्षसाला या ठिकाणी मारले. कार्य सिद्धीस गेले म्हणून श्रीरामांनी हे सिद्धेश्वर मंदिर उभारले. सिद्धेश्वर मंदिर प्रांगणात महादेव, विष्णू व लक्ष्मी (गजरादेवी) अशी तीन मंदिरे आहेत. या सर्व मंदिरांभोवती एक उंच दगडी तटबंदी आहे. या तटबंदीच्या आतील बाजूस ओवऱ्या (भिंतींमधील महिरपी आकाराच्या लहान-लहान खोल्या) असून तटबंदीच्या वर जाण्यासाठी मंदिर प्रांगणातून मार्ग आहे. तटबंदीवरून या मंदिरांच्या भिंतींवर व कळसांवर असलेली असंख्य शिल्पे न्याहाळता येतात.
येथील तीन मंदिरांमध्ये मध्यभागी मोठे मंदिर आहे ते सिद्धेश्वराचे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराची रचना नंदीमंडप, सभामंडप व गाभारा अशी आहे. नंदीमंडपात असलेल्या अखंड दगडातील भव्य नंदीवरील कलाकुसर वैशिष्ट्यपूर्ण आहे. नंदीच्या पाठीवरील दोरखंड, साखळ्या, वेसण, नक्षीदार पट्टे, लहान-लहान घंटांचे वेल सुंदर पद्धतीने कोरलेले दिसतात. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर द्वारपालांची शिल्पे आहेत. सभामंडपाच्या घुमटाकृती वितानावर (छत) राधा-कृष्णाच्या विविध मूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडपातील खांबांवर वरच्या बाजूला भारवाहक यक्ष दिसतात. गाभाऱ्याच्या द्वारपट्टीवरही शिल्पखजिना पाहायला मिळतो. गाभाऱ्यात काळ्या दगडात काहीशी उंच प्राचीन शिवपिंडी असून त्यासमोर पार्वतीची मूर्ती आहे.
सिद्धेश्वर मंदिराच्या बाहेरील भिंतीवर रामायण, महाभारत व पुराणांमधील काही प्रसंग कोरलेले आहेत. यामध्ये मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध व कल्की असे श्रीविष्णूंचे दहा अवतार कोरलेले आहेत. याशिवाय याच मंदिराचे दर्शन घेण्यासाठी हत्तीवरील अंबारीत बसून आलेला राजा, सीता स्वयंवर, बालकृष्णाचे गोकुळातील प्रसंग व कृष्णाच्या गोपिकांसोबतच्या लीला, अर्जुनाचे गर्वहरण, भीम गर्वहरण, अशोक वनातील हनुमान-सीता भेट अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे आहेत. बाह्य भिंतींच्या खालील पट्टिकेवर स्त्रियांच्या विविध भावमुद्रा, नृत्यमुद्रा कोरलेल्या आहेत.
सिद्धेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूस विष्णू मंदिर आहे. या मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ व गाभारा अशी आहे. मंदिराच्या समोरील बाजूस चौथऱ्यावर गरूडमूर्ती, तर गाभाऱ्यात विष्णूची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. या मंदिराच्या प्रत्येक दिशेला देवतांच्या मूर्ती (अष्टदिक्पाल) आहेत. पश्चिमेला वाहन हत्तीसह वरूण, अग्नेयेला एडक्यासह अग्नी, दक्षिणेला रेड्यासह यम, नैऋत्येला शत्रूचे कापलेले मुंडके हातात धरलेला निऋती, वायव्येला बैलासह हातात ध्वज घेऊन उभा असलेला वायू, पूर्वेला ऐरावतासह देवराज इंद्र, ईशान्येला नंदीसह ईशण व उत्तरेला मगरीसह कुबेर यांची वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या मागील भिंतीवर हत्ती आणि माकडांची शिल्पे इतक्या खुबीने कोरली आहेत की त्यांच्या जबड्यातील दातही स्पष्ट दिसतात.
सिद्धेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला गजरादेवीचे मंदिर आहे. या मंदिराची विशेष बाब म्हणजे त्याचे बांधकाम हे षटकोनी चांदणीच्या आकाराचे आहे. या मंदिरावरही अनेक देवी मूर्ती कोरलेल्या आहेत व कळसाकडील भागात गजशिल्पे आहेत. या मंदिरापासून पायी १० ते १५ मिनिटांच्या अंतरावर घटेश्वर, मुक्तेश्वर व रामेश्वर ही मंदिरे आहेत. पुरातत्त्व विभागाकडून सध्या सिद्धेश्वर मंदिराची व्यवस्था पाहण्यात येते.