विवाह, धार्मिक वा शुभ कार्यासाठी मुहूर्त पाहावा लागत नाही, अशी ख्याती असलेले राज्यातील एकमेव स्थान म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील बेट कोपरगाव येथील गुरू शुक्राचार्य मंदिर. दैत्यगुरू शुक्राचार्यांचे वास्तव्य व तपसामर्थ्यामुळे पावन झालेल्या या ठिकाणाला हजारो वर्षांची पौराणिक व ऐतिहासिक परंपरा आहे. पूर्वी दंडकारण्याचा भाग असलेले हे क्षेत्र आज श्री क्षेत्र बेट, शुक्रतीर्थ वा गुरू शुक्राचार्य मंदिराचे बेट म्हणून ओळखले जाते.
शुक्राचार्यांची कन्या देवयानी एके दिवशी येथील राजकन्या शर्मिष्ठेबरोबर वन विहारास गेली होती. तेथे नदीवर स्नान करत असताना अचानक वादळ आल्यामुळे तीरावरील त्यांची वस्त्रे एकमेकांत मिसळली. घाईघाईत त्यांच्या वस्त्रांची अदलाबदल झाली. शर्मिष्ठा ही राजकन्या असल्यामुळे साहजिकच तिला राग आला व तिने देवयानीला एका विहिरीत ढकलून ती राजवाड्यावर निघून गेली. देवयानी विहिरीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत मदतीसाठी आवाज देऊ लागली. यावेळी क्षत्रिय राजा ययाती शिकारीसाठी या भागातून जात होता. त्याला देवयानीचा आवाज ऐकू आला. त्याने विहिरीत पाहिले असता देवयानी मदतीसाठी याचना करताना दिसली. संकटात असलेल्या स्त्रीला वाचवायचे म्हणून राजा ययातीने देवयानीस हात देऊन विहिरीबाहेर काढले.
पूर्वीच्या काळी स्त्रिया परपुरुषाचा हात हातात घेत नसत. कारण स्त्री व पुरुषाचा हात एकमेकांनी हातात घेणे म्हणजे पाणीग्रहण संस्कार झाले, विवाह झाला, असे समजले जात असे. देवयानीला संकटातून बाहेर काढण्यासाठी चुकून जरी पाणीग्रहण झाले असले तरी राजाला विवाहबद्ध व्हावे लागणार होते, परंतु राजा ययाती क्षत्रिय व देवयानी ही ब्राह्मण कन्या होती. त्यामुळे हा विवाह होणे शक्य नव्हते आणि जेव्हा त्यांच्या हाताचे मिलन झाले तेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल नव्हते. सिंहस्थ काळ सुरू होता. पण विवाह करणे भाग होते. विवाहात कोणतेही विघ्न येऊ नये या हेतूने गुरू शुक्राचार्यांनी गोदावरीच्या तीरावर सध्या जेथे आश्रम आहे तेथे विवाह सिद्ध होम करून विवाह संपन्न केला.
गुरू शुक्राचार्यांनी आपल्या तपोबलाचा वापर करून येथील भूमीस पावन करून घेतले व असे सांगितले की यापुढे या जागेवर कोणतेही ग्रह-नक्षत्र, तिथी-वार, सिंहस्थ वेळ किंवा कोणताही शुभ मुहूर्त नसतानाही कोणत्याही वर्णाच्या स्त्री-पुरुषांनी विवाह केल्यास त्यांना विवाह दोष न लागता त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होईल. गुरू शुक्राचार्यांनी आपल्या आश्रमात केलेल्या विवाह सिद्ध हवनाची जागा म्हणजेच आजचे गुरू शुक्राचार्य मंदिर होय.
बेट कोपरगाव परिसरात बाहेरून एखादा वाडा भासावा, असे हे शुक्राचार्य मंदिर असून मंदिराच्या चारही बाजूने मजबूत तटबंदी आहे. मंदिराच्या प्रांगणात एक दीपमाळ व प्रवेशद्वारावर दोन हत्तींची शिल्पे आहेत. मंदिराची रचना ही नंदीमंडप, सभामंडप आणि गाभारा अशी आहे. गाभाऱ्यात एका सोनेरी आसनावर गुरू शुक्राचार्यांची शुभ्र संगमरवरी मूर्ती आहे. त्यांच्यासमोर काळ्या दगडातील शिवपिंडी आहे. असे सांगितले जाते की ही शिवपिंडी गुरू शुक्राचार्यांनी स्थापित केली होती. गाभाऱ्यात सर्वांना प्रवेश दिला जात नसल्याने गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या गुरुपादुकांची भाविकांकडून पूजा केली जाते. मंदिराच्या आवारात ग्रंथदालन, गुरु शुक्राचार्यांची पालखी आणि पुरातन वस्तूंचे संग्रहालय आहे.
या मंदिरात वर्षभर विवाह सोहळे होत असतात. या सोहळ्यासाठी येथे खास मंडपाची व्यवस्था आहे. वधू व वर पक्षासाठी देवस्थानातर्फे खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. देवस्थानच्या वतीने गरीब, अपंग वधू-वरांचे येथे मोफत विवाह सोहळे पार पाडले जातात. याशिवाय महाशिवरात्रीचा उत्सवही येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो.