राज्यातील प्रमुख तीर्थस्थळांपैकी पाथर्डी तालुक्यातील भगवानगड हे एक प्रसिद्ध तीर्थस्थान म्हणून ओळखले जाते. बीड व अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर खरवंडी गावाच्या बाजूला असलेल्या निसर्गसमृद्ध परिसरात हे स्थान आहे. वारकरी संप्रदायाचे संत भगवानबाबा यांनी निर्माण केलेले हे स्थान राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान मानले जाते.
पुराणातील नोंदींनुसार, या परिसरात सप्तर्षींनी अनेक वर्षें तपश्चर्या केली होती. पांडवांचे पुरोहित धौम्य ऋषी यांचे या भागात वास्तव्य होते. या ठिकाणी धौम्य ऋषींच्या पादुका होत्या. त्यामुळे हे स्थान पूर्वीपासून ‘धौम्यगड‘ किंवा ‘धुम्यागड‘ म्हणून प्रसिद्ध होते. येथील धौम्य ऋषींचे मंदिर काही हजार वर्षांपूर्वीपासूनच आहे. या शिवाय येथे रंग ऋषी, भारद्वाज ऋषी, शृंग ऋषी, पराशर ऋषी व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) यांचेही वास्तव्य होते.
भगवानबाबा यांचा जन्म बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे २९ जुलै १८९६ या दिवशी झाला. वंजारी समाजाचे तुबाजीराव सानप व कौतिकाबाई यांचे ते पाचवे अपत्य. आई–वडिलांनी त्यांचे नाव आबाजी असे ठेवले होते. लहानपणापासून आबाजीचा ओढा देवधर्माकडे होता. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी प्रथम पायी पंढरपूरची वारी केली. पंढरपूरहून परतल्यानंतर आबाजी घरी न जाता गावातील हनुमंताच्या मंदिरात थांबला. घरातील सर्वजण माळकरी होत असतील तरच मी घरी येईन, अशी अट त्यांनी घातली. मुलाच्या हट्टापायी सर्वांनी तुळशीमाळ घालण्याचे व मांसाहार वर्ज्य करण्याचे वचन दिल्यावरच आबाजी घरी परतला. समाजसुधारण्याची मुहूर्तमेढ आपल्या घरापासूनच सुरू करून भक्ती व ज्ञानमार्गाच्या कामाला त्यांनी सुरुवात केली.
आबाजीच पूर्वज बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील नारायणगडाचे उपासक होते. त्यामुळे आबाजीचे तेथे सतत जाणे होत असे. पुढे सांप्रदायिक शिक्षणासाठी आबाजी नारायणगडावर गेले. तेथील महंत माणिकबाबांनी अनुग्रह दिल्यानंतर त्यांचे नाव बदलून ‘भगवान’ असे ठेवले. त्यानंतर भगवानबाबा आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेत भरती झाले. तेथील बंकट स्वामींच्या विचारांच्या प्रभावाने भगवानबाबांनी सन्याशी जीवनाचा स्वीकार केला. पुढे भगवानबाबांनी नारायणगडाचे महंत म्हणून ३५ वर्षे काम पाहिले. त्या काळात १९१८ मध्ये नारायणगड ते पंढरपूर अशी पायी दिंडी त्यांनी सुरू केली. मराठवाड्यातून पंढरपूरकडे जाणारी ही पहिली दिंडी समजली जाते. त्यानंतर त्यांनी नारायणगडावरून पैठण येथे दिंडी सुरू केली. हे सर्व सुरू असतानाच काही समाजविघातक प्रवृत्तींनी त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला. हे सहन न झाल्याने व आरोप खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी भगवानबाबांनी स्वतःच्या हाताने स्वतःचे लिंग कापले. त्यानंतरही त्यांच्यावर निरनिराळे आरोप होत राहिल्याने अखेर भगवानबाबांनी नारायणगड सोडले व धौम्यगडावर राहून ते तपसाधेत रममाण होऊ लागले.
भगवानबाबा यांनी त्यांच्या जीवनातील मोठा काळ धौम्यगडावर व्यतीत केला. कीर्तनाच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील खेड्यापाड्यांत ते जात असत. या काळात त्यांचा शिष्यपरिवार खूप वाढला होता. त्यांनी धौम्यगडावरून पंढरपूर, आळंदी तसेच पैठणसाठी पालखी वारी सुरू केली. ते भक्तांसोबत दरवर्षी आषाढीवारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे जात असत. भगवानबाबा गडावर असताना येथून निघणाऱ्या पालखीसोबत हत्ती, घोडे असा लवाजमा असे.
नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील शिक्षण परिषदेत सहभागी झालेल्या भगवान बाबांनी तेव्हा ‘वाचाल तर वाचाल’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मूलमंत्र ऐकला आणि त्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांना ‘शेत विका, पण पोरं शिकवा’ असे सांगितले. त्यासाठी त्यांनी खरवंडी गावात पहिली शाळा सुरू केली. १ मे १९५८ रोजी मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी धौम्यगडाला भेट देऊन भगवानबाबांचे कार्य जाणून घेतले. यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले, ‘धर्मरक्षणासाठी भगवानबाबांनी भक्तांना एकत्र करून शास्त्राच्या आधाराने भक्तीचा गड उभारण्याचे काम केले आहे. आजपासून धौम्यगड हा भगवानगड म्हणून ओळखला जावा.’ तेव्हापासून धौम्यगडाचे नाव ‘भगवानगड’ असे पडले. गावोगावी, खेड्यापाड्यात धर्माचे व ज्ञानार्जनाचे काम करता करता १९६५ च्या सुरुवातीला भगवानबाबांची प्रकृती ढासळली. उपचारासाठी त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्यांना यश आले नाही. अखेर १ जानेवारी १९६५ मध्ये वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. बाबांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थिव भगवानगडावर आणून तेथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्री क्षेत्र भगवानगड हे मराठवाड्यासह राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. खरवंडी गावाजवळील टेकडीच्या माथ्यावर असलेल्या या गडाला तटबंदी असून त्यात ६० फूट उंचीचे महाद्वार आहे. या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर भगवानगडावरील प्रशस्त परिसरात प्रवेश होतो. या गडावर विठ्ठल, भगवानबाबा, धौम्य ऋषी आणि हनुमंत अशा चार मंदिरांचा समूह आहे. यामध्ये विठ्ठलाचे मुख्य मंदिर मध्यावर असून सभोवताली धौम्य ऋषी आणि मारुती ही मंदिरे आहेत.
विठ्ठलाचे मंदिर पश्चिमाभिमुख असून त्यावर सुबक कोरीव काम आहे. मंदिराच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर सभामंडपात प्रवेश होतो. येथील शिल्पांकित स्तंभ पाहिल्यावर एखाद्या किल्ल्यात आल्याचा भास होतो. गर्भगृहात वैशिष्ट्यपूर्ण विठ्ठल मूर्ती आहे. विठ्ठलमूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर तेथील गर्भगृहाच्या बाजूने भगवानबाबा यांच्या समाधी स्थानाकडे जाण्यासाठी खालील बाजूस पायऱ्या आहेत. तळमजल्यावर संत भगवानबाबा व भीमसिंह महाराज यांच्या काळ्या संगमरवरी समाध्या आहेत. समाध्यांचा प्रदक्षिणा मार्ग अरुंद आहे. या स्थानाच्या विशिष्ट रचनेमुळे सूर्योदयाच्यावेळी सूर्याची किरणे थेट गाभाऱ्यातील समाधीवर पडतात.
विठ्ठल मंदिराच्या शेजारी धौम्य ऋषींचे मंदिर आहे. त्यात ५ पांडव, द्रौपदी व धौम्य ऋषी यांच्या मूर्ती आहेत. धौम्य ऋषींच्या मंदिराच्या बाजूला जनार्दनस्वामी यांचे मंदिर आहे. विठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर हनुमानाचे मंदिर आहे. याशिवाय विठ्ठल मंदिराच्या मागील बाजूस भगवानबाबांनी वास्तव्य केलेले ठिकाण व त्यांनी आपल्या वास्तव्याच्या काळात वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालय आहे.
गडावरील मुख्य उत्सव हा विजयादशमीचा असतो. भगवानबाबांनी सुरू केलेल्या या उत्सवाला ७५ वर्षांची परंपरा आहे. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक गडावर गुरुपदेश घेण्यासाठी येतात. याशिवाय भगवानबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त (१८ जानेवारी) भगवानगडावर भव्य हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या ८ दिवसांत सुमारे २,००,००० (दोन लाख) भाविक गडावर येऊन भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतात.