अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कुंभेफळ गावात प्रवरा नदीच्या किनाऱ्यावर श्री शेषनारायणाचे प्राचीन मंदिर आहे. शेषनारायणाची मंदिरे ही देशात दुर्मिळ असून काशी येथील शेषनारायण मंदिरानंतर राज्यातील या मंदिराचे महत्त्व आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या ठिकाणाला ‘प्रतिकाशी’ असेही म्हटले जाते. या मंदिराची अक्षय तृतीयेपासून भरणारी ३ दिवसांची यात्रा प्रसिद्ध आहे.
पुराणांतील उल्लेखानुसार, शेषनाग हा कश्यप ऋषींचा ज्येष्ठ पुत्र व विष्णूचा परमभक्त होता. तो नागांचा राजाही होता; परंतु त्याने राज्य सोडून विष्णूसेवा करण्याचे व्रत घेतले. तेव्हापासून तो विष्णूंसाठी आपल्या वेटोळ्यांचे आसन व फण्यांचे छत्र धरू लागला. विष्णूंनाही शेषनाग प्रिय असल्याने अनेकदा त्यांनी शेषनागासह पृथ्वीवर अवतार घेतले. त्रेतायुगात राम अवतारात शेषनाग हा लक्ष्मण, तर कृष्ण अवतारात बलराम झाला होता. वासुदेव जेव्हा बाळ कृष्णाला टोपलीत घेऊन नदी पार करत होते, तेव्हा शेषनागाने आपल्या फण्याने त्याचे पावसापासून रक्षण केले होते. यजुर्वेदातील नारायण सूक्तानुसार, विष्णू म्हणजेच नारायण हा विश्वाचा स्वामी असून तो स्वतःचा अधिपती आहे, तो सर्वोच्च आहे. त्यानुसार नागांमध्ये शेषनाग व देवांमधील विष्णू वा नारायण श्रेष्ठ समजले जातात. असे सांगितले जाते की समुद्रमंथनातून मिळालेल्या अमृताच्या वाटपावरून देव व राक्षसांमध्ये झालेल्या युद्धानंतर कुंभेफळ येथे श्रीविष्णू वास्तव्यास आले होते. त्यावेळी विष्णूंची सेवा करण्यासाठी शेषनागही येथे आला. तेव्हापासून या तीर्थस्थानाला शेषनारायण मंदिर हे नाव पडले.
अकोले येथून कुंभेफळ गावात प्रवेश करताना रस्त्याला लागून शेषनारायणाचे हे प्रसिद्ध मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडात असून अहिल्यादेवी होळकर यांनी त्याचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आहे. रस्त्यावर असणाऱ्या मंदिराच्या कमानीतून आत गेल्यानंतर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराच्या प्रांगणात फरसबंदी असून परिसराला तारेचे कुंपण आहे. मंदिराच्या समोर असलेल्या दगडी चौथऱ्यावर श्रीरामांच्या पादुका प्रतिष्ठापित आहेत.
शेषनारायण मंदिर उंच जगतीवर (पाया) उभे आहे. दर्शन मंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. ५ पायऱ्या चढून मंदिराच्या दर्शन मंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर वैशिष्ट्यपूर्ण कोरीव शिल्पे आहेत. सभामंडप तुलनेने लहान असून गाभाऱ्यात विष्णूंची मूर्ती आहे. या मूर्तीवर शेषाने फणा धरला आहे. गाभाऱ्यात विष्णू मूर्तीच्या दोन्ही बाजूला घोड्यावर बसलेला खंडोबा व म्हाळसा यांच्या मूर्ती आहेत.
दरवर्षी अक्षय तृतीयेपासून ३ दिवस शेषनारायणाची यात्रा असते. यावेळी देवाच्या काठीची मिरवणूक काढली जातात. ढोल–ताशांच्या गजरात निघणाऱ्या या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी होतात. याशिवाय मंदिरात दिवाळी, देवदिवाळी हे उत्सवही साजरे होतात. मंदिरात दररोज सकाळी ७ वाजता आरती होते. भाविकांना सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत शेषनारायणाचे दर्शन घेता येते.
कुंभेफळ हे गाव ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. या गावात अनेक मंदिरे आहेत. त्यामध्ये गावाचे श्रद्धास्थान असलेल्या शेषनारायण मंदिरासह वीरभद्र, काशाई, शंभू महादेव व मारुती या मंदिरांचा समावेश आहे. या गावाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे शेषनारायण मंदिरापासून जवळच अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली बारव (दगडी विहीर). अनेक पर्यटक तसेच येथे दर्शनासाठी आलेले भाविक आवर्जून ही वैशिष्ट्यपूर्ण बारव पाहायला जातात.
राणी अहिल्यादेवी होळकर पुण्याहून इंदोरकडे जाताना या मार्गाने जात असत. त्यामुळे या मार्गावर त्यांनी अनेक ठिकाणी बारव बांधल्या, पण कालौघात त्या नष्ट झाल्या. मात्र या बारवेचा चिरा अन् चिरा आजही शाबूत आहे. या बारवेची खोली ५८ फूट (१० पुरुष खोल) असून तळापर्यंत जाण्यासाठी सुमारे ४७ पायऱ्या आहेत. या बारवेचे वैशिष्ट्य असे की यामध्ये २ कमानी असून त्यात श्रीगणेशाची मूर्ती अहिल्यादेवींच्या हस्ते प्रतिष्ठापित केलेली आहे. अहिल्यादेवींनी महाराष्ट्रात जेथे जेथे बारव बांधल्या तेथे तेथे त्यांनी आवर्जून त्यामध्ये देवांच्या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या होत्या. ज्यामुळे तेथील पावित्र्य कायम राखले जाईल. त्र्यंबकेश्वरसाठी आळंदीहून निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकरी दिंड्यांचा या बारवेजवळच थांबा असतो.