साळवण देवी मंदिर,

श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर

देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूरगडावरील रेणुका देवीची राज्यात अनेक मंदिरे आहेत. आपल्या भक्तांसाठी देवीने अनेक ठिकाणी वास्तव्य केलेले आहे. रेणुका देवीचे प्रतिरूप मानले जाणारे साळवण देवीचे प्राचीन मंदिर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या तालुक्याच्या ठिकाणी आहे. मंदिर परिसरात असलेले पुरातन दगडी चाक हे रेणुका देवीच्या रथाचे असून माहूरगडावरून देवी श्रीगोंदा येथे येत असताना चाक जमिनीत रुतल्याने देवीने या ठिकाणी वास्तव्य केले, असे सांगण्यात येते. श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत म्हणून हे स्थान प्रसिद्ध आहे.

मंदिराची आख्यायिका अशी की श्रीगोंदा येथील एक युवक माहूरच्या रेणुका देवीचा निस्सीम भक्त होता. प्रत्येक अश्विन पौर्णिमेला तो माहूर गडावर देवीच्या दर्शनाला जात असे. त्याची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली व त्याला वर मागण्यास सांगितले. त्यावर त्या भक्ताने कोणतीही धन-संपत्ती न मागता केवळ तुझी पूजा-अर्चा दररोज करता यावी यासाठी तू माझ्या गावी चल, अशी देवीला विनंती केली. भक्ताची विनंती त्वरित मान्य करून देवी त्याच्या मागे जाऊ लागली; परंतु गाव येईपर्यंत मागे वळून पाहायचे नाही, अशी देवीची अट होती. ती मान्य करून भक्त पुढे व देवीचा रथ मागे, असे मार्गक्रमण सुरू होते. श्रीगोंदा येथे आल्यावर चाक जमिनीत रुतल्याने देवीचा रथ तेथेच थांबला. रथाचा आवाज येणे बंद झाल्याने भक्ताने मागे वळून पाहिले, तर देवी तेथेच गुप्त झाली. काही दिवसांनी स्वप्नदृष्टांत देऊन देवीने ‘मी जेथे गुप्त झाले, तेथील साळीच्या वनात माझा शोध घे आणि गावात आणून माझी प्रतिष्ठापना कर,’ असे त्यास सांगितले. त्यानुसार शोध घेतला असता तांदळा (हात-पाय किंवा अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती) स्वरूपातील देवीची मूर्ती त्याला सापडली. काही वर्षांनंतर ग्रामस्थांनी याच जागेवर देवीसाठी मंदिर बांधले. हीच ती साळवण देवी. साळीच्या वनात सापडली म्हणून तिचे नाव साळवण देवी असे झाले.

श्रीगोंदा शहराच्या वेशीवर असलेले साळवण देवीचे हे मंदिर १२ व्या शतकातील आहे. मंदिराभोवती सुमारे २० ते २५ फूट उंचीची तटबंदी असून आतील बाजूस त्याला ओवऱ्या (भिंतींमध्ये असणाऱ्या लहान लहान खोल्या) आहेत. या ओवऱ्यांमध्ये भाविकांकडून अनेक धार्मिक विधी केले जातात. साळवण देवीच्या मुख्य मंदिराची रचना सभामंडप व गाभारा अशी आहे. तीनही बाजूने मोकळ्या असलेल्या सभामंडपाच्या मध्यभागी देवीचे वाहन सिंहाची मूर्ती व हवन कुंड आहे. मूळ मंदिराच्या बाहेरील बाजूस नंतरच्या काळात हा सभामंडप उभारले असल्याचे जाणवते. संपूर्ण मंदिराचे बांधकाम दगडातील आहे. गाभाऱ्यात एका चौथऱ्यावर साळवण देवीचा तांदळा प्रतिष्ठापित केलेला आहे. शेंदूरविलेपित या साळवण देवीच्या मूर्तीला दररोज विविध साजशृंगार केले जातात. या मंदिराच्या गाभाऱ्यातून शेजारीच असलेल्या रेणुकामाता मंदिरात जाता येते. तेथेही गाभाऱ्यात रेणुका देवीचा तांदळा आहे. शेजारी-शेजारी असणारी ही दोन्ही मंदिरे प्राचीन असून हे जागृत स्थान म्हणून परिचित आहे. मनातील सर्व इच्छा देवी पूर्ण करते, अशी या देवीबद्दल भाविकांची श्रद्धा आहे.

मंदिर परिसरात एक बारव असून त्या बाजूला एक दीपमाळ आहे. असे सांगितले जाते की १९७७ मध्ये येथील नानासाहेब मोहिते पाटील यांना देवीने दृष्टांत दिला. त्यानंतर त्यांनी देवीला पालखी वाहून दसऱ्याच्या दिवशी पालखी उत्सव सुरू केला. तो आजतागायत सुरू आहे. दसऱ्याच्या दिवशी दुपारी पिठलं-भाकरी, तर सायंकाळी लापशी, भात व आमटीचा महाप्रसाद भाविकांना दिला जातो. रात्री देवीच्या पालखीची मिरवणूक निघते. यावेळी देवीला भाविक साडी-चोळी अर्पण करतात. नवरात्रीच्या ९ दिवसांत नवसपूर्तीसाठी भाविकांकडून अनेक धार्मिक विधी येथे केले जातात.

 

 

उपयुक्त माहिती:

  • श्रीगोंदा बसस्थानकापासून ४ किमी, तर अहिल्यानगरपासून ६६ किमी अंतरावर
  • श्रीगोंदा येथून एसटी, रिक्षाची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home