‘शिर्डीस ज्याचे लागतील पाय । टळतील अपाय सर्व त्याचे…’ असा शिर्डीच्या साईबाबा मंदिराचा महिमा आहे. शिर्डी हे देशातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे. येथील साईबाबांच्या मंदिराचा तिरुपतीनंतर देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानांमध्ये समावेश होतो. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. साईबाबांच्या केवळ दर्शनाने दुःखे दूर होऊन मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ‘शिर्डीला मुंग्यांसारखे भक्त गोळा होतील’ या स्वतः साईबाबांनी केलेल्या भविष्यवाणीचा दिवसेंदिवस वाढणाऱ्या भाविकांच्या संख्येवरून आज प्रत्यय येतोय.
असे सांगितले जाते की १८५४ मध्ये साईबाबा पहिल्यांदा शिर्डीत आले होते. त्यावेळी ते १६ वर्षांचे होते. काही काळ शिर्डीत राहिल्यानंतर ते तेथून अचानक निघून गेले. काही वर्षांनी चांद पाटील या व्यक्तीच्या लग्नाच्या मिरवणुकीवेळी ते पुन्हा शिर्डीत आले. त्यावेळी खंडोबा मंदिराचे पुजारी म्हाळसापती यांनी त्यांना ‘ये साई’ असे म्हटले. तेव्हापासून शिर्डीमध्ये त्यांना ‘साईबाबा’ हे नाव पडले. साईबाबा शिर्डीतील केवळ ५ कुटुंबांकडून दिवसातून २ वेळा भिक्षा मागायचे. त्यांनी आयुष्यातील मोठा काळ द्वारकामाई या पडीक मशिदीत घालवला. डोक्यावर पांढरे वस्त्र बांधून फकिराच्या रूपात ते येथे राहत असत. त्यांच्या पेहरावामुळे काहीजण त्यांना मुस्लीम तर काहीजण हिंदू मानत; परंतु साईंनी स्वतःला कधी जाती-धर्मामध्ये बांधून घेतले नाही. हिंदू असो वा मुस्लीम, साईबाबांनी सर्वांना समान वागणूक दिली.
गावातील व्यापाऱ्यांकडून तेल मागून साईबाबा नेहमी मशिदीत दिवा लावत असत. एकेदिवशी व्यापाऱ्यांनी त्यांना तेल देण्यास नकार दिला. तेव्हा साईबाबांनी दिव्यात पाणी टाकून वाती पेटविल्या. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्या व्यापाऱ्यांना आपली चूक उमगली व त्यांनी साईबाबांची माफी मागितली. या दिव्य चमत्कारानंतर साईबाबा हे ईश्वरी अवतार आहेत, याची सर्वांना खात्री पटली. याशिवाय त्यांच्याशी संबंधित शेकडो चमत्कार आणि कथा भाविकांमध्ये लोकप्रिय आहेत.
साईबाबांचा जन्म आणि सुरुवातीच्या आयुष्याबाबत फारसे ठोस पुरावे नाहीत. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात झाला, असे मानले जाते. एकदा त्यांच्या एका भक्ताने विचारले असता साईबाबांनी सांगितले की त्यांचा जन्म २८ सप्टेंबर या दिवशी झाला होता. त्यामुळे दरवर्षी २८ सप्टेंबरला साईबाबांची जयंती साजरी केली जाते. शशिकांत शांताराम गडकरी लिखित ‘सद्गुरू साई दर्शन’ या पुस्तकातील संदर्भांनुसार बाबांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे गोत्र कौशिक असून ते यजुर्वेदी ब्राह्मण होते. साईबाबांच्या वडिलांचे नाव गंगाभाऊ आणि आईचे नाव देवकीगिरी होते. साईबाबा पाच भावंडांपैकी तिसरे असून त्यांचे मूळ नाव हरिबाबू भुसारी होते.
साईबाबांनी १५ ऑक्टोबर १९१८ रोजी समाधी घेतली. सध्या ज्या दगडी इमारतीमध्ये ही समाधी आहे ती इमारत साईबाबांच्या आज्ञेने नागपूर येथील श्रीमंत गोपाळराव ऊर्फ बापूसाहेब बुट्टी यांनी बांधली. या इमारतीला पूर्वी ‘बुट्टीवाडा’ असे संबोधले जाई.
साईचरित्रातील उल्लेखानुसार, बुट्टीवाड्यात गाभारा बांधून त्यामध्ये एका सिंहासनावर मुरलीधराची मूर्ती स्थापन करावी, अशी साईबाबांची इच्छा होती. त्या दृष्टीने मुरलीधराची मूर्ती बनविण्याचे काम सुरू झाले. हे सुरू असतानाच साईबाबांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. साईबाबांच्या इच्छेनुसार बांधलेल्या या भव्य वाड्यास त्यांचे पाय तरी लागतील का, या शंकेने सर्व चिंतेत होते. तेव्हा सर्वांना बोलावून साईबाबांनी माझा अंतकाळ जवळ आलेला आहे, मला यापुढे बुट्टीवाड्यात ठेवा, असे सांगून जगाचा निरोप घेतला. त्यानंतर बुट्टीवाडा मुरलीधर मंदिर होण्याऐवजी साईबाबांचे समाधी मंदिर झाले. या मंदिरात स्थापन करण्यासाठी तयार झालेली मुरलीधराची मूर्ती साई संस्थानतर्फे साईबाबांची स्मृती म्हणून जतन करून ठेवण्यात आली आहे.
साईभक्त चांदोरकर व रा. भ. प्रधान यांनी शिर्डीमधील देवदर्शनाचा पूर्वी एक क्रम आखला होता. त्यानुसार भाविकांनी गोदावरीत स्नान करून बाबांच्या गुरू समाधीचे प्रथम दर्शन घ्यायचे, त्यानंतर द्वारकामाईत जाऊन धुनीचे दर्शन, चावडीत जाऊन बाबांच्या पादुकांचे दर्शन आणि शेवटी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन लेंडीबागेतील नंदादीप, पिंपळ-निंबवृक्षाचे दर्शन, असा हा क्रम होता; परंतु आता भाविकांच्या गर्दीमुळे यानुसार नियोजन करणे शक्य होत नाही.
साई समाधी मंदिराच्या मागे गुरुस्थान आहे. लिंबाच्या झाडाखाली साधना करीत असलेल्या १६ वर्षांच्या तरुणाला तेव्हा शिर्डीकरांनी पाहिले होते. हे स्थान आपल्या गुरुंचे आहे, असे तेव्हा साईंनी सांगितले होते. या ठिकाणी दर गुरुवारी व शुक्रवारी भाविकांना उद जाळण्यास त्यांनी सांगितले. हे गुरुस्थान व येथील लिंबाचा वृक्ष भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे साईबाबांच्या प्रतिमेपुढे एक शिवपिंडी व नंदी नाहे. मंदिरासमोर धुपाचे मोठे पात्र आहे. तेथे भाविक श्रद्धेने उद जाळतात.
साईबाबा शिर्डीस आल्यापासून सलग ६० वर्षे त्यांचे द्वारकामाईत (मशीद) वास्तव्य होते. असंख्य भक्तांना बाबांनी या ठिकाणीच कृपाप्रसाद दिला होता. साईबाबा शिर्डीत आले तेव्हा द्वारकामाई एक पडीक मशीद होती. पुढे बाबांच्या आज्ञेने नाना चांदोरकर, काका दीक्षित यांनी तिचा जीर्णोद्धार केला. बाबा ज्या शिळेवर बसत, तीही इथेच आहे. साईबाबांनी तेव्हा प्रज्वलित केलेली धुनी या ठिकाणी आजही अखंड तेवत आहे. भक्तांना संकटांतून सोडविण्यासाठी बाबा त्यांना या धुनीतून उदी देत असत. या ठिकाणी बाबा गरिबांसाठी भोजनही तयार करीत असत.
द्वारकामाईपासून जवळच साईबाबांच्या वास्तव्यामुळे पावन झालेली चावडी आहे. असे सांगितले जाते की या चावडीवर बाबा १ दिवसाआड निवास करीत असत. या ठिकाणी सध्या बाबांची एक प्रतिमा असून तिच्या शेजारी १ पलंग आहे. या पलंगावर बाबांना महानिर्वाणानंतर स्नान घालण्यात आले होते. याशिवाय येथे लेंडीबाग, नंदादीप, खंडोबा मंदिर, शामसुंदर समाधी अशी साईंबाबांच्या स्मृती जागविणारी अनेक ठिकाणे आहेत. दर गुरुवारी संध्याकाळी साईबाबांची पालखी मिरवणूक काढली जाते. त्यात हजारो भाविक सहभागी होतात. ही पालखी शिर्डी शहराला प्रदक्षिणा घालून द्वारकामाईत आणली जाते.
मुख्य समाधी मंदिरात साईबाबांची दिवसातून पाच वेळा आरती केली जाते. पहिली भूपाळी आरती पहाटे ४.१५ वाजता, काकड आरती पहाटे ४.३० वाजता, मध्यान्ह आरती दुपारी १२ वाजता, धुपारती संध्याकाळी सूर्यास्तानंतर आणि शेजारती रात्री १०.३० वाजता होते. श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या online.sai.org.in या अधिकृत वेबसाईटवरून भाविकांना आरतीची नोंदणी करता येते. भाविकांसाठी शिर्डी संस्थानतर्फे सुसज्ज भक्तनिवास व मोफत महाप्रसादाची सुविधा करण्यात आली आहे.