रेणुका माता मंदिर

रेणापूर, ता. रेणापूर, जि. लातूर

नावातच रेणुकादेवीचे अस्तित्व असणाऱ्या रेणापूर शहरात रेणुकादेवीचा ८०० वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आणि परंपरा लाभलेले प्राचीन मंदिर आहे. या ठिकाणी परशुरामांनी आपल्या मातेची, म्हणजेच रेणुका देवीची पूजा केल्याचे मानले जाते. येथील रेणुका देवी रेणापूरची ग्रामदेवता व जिल्ह्यातील अनेक भाविकांची आराध्य देवता आहे. या मंदिराची ओळख माहूर देवीचे प्रतिरूप म्हणूनही आहे; त्यामुळे माहूरगडावर दर्शनाला जाण्यापूर्वी या देवीचे दर्शन घेण्याची प्रथा सांगितली जाते. येथील हलणारी दीपमाळ हे या मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे.

रेणुका देवी ही भूदेवी आहे आणि रेणुका या शब्दाचा अर्थ रेणुमयी पृथ्वी असा होतो. पौराणिक आख्यायिकांनुसार, रेणुका ही जमदग्नी ऋषींची पत्नी आहे. ‘रेणुका माहात्म्य’ ग्रंथात तिची अशी चारित्र्यकथा सांगण्यात आली आहे की प्राचीन काळी कान्यकुब्ज देशात इक्ष्वाकुवंशीय रेणू ऊर्फ प्रसेनजीत नावाचा राजा राज्य करीत होता. त्याने कन्याकामेष्टी यज्ञ केला असता, त्या यज्ञाग्नीतून एक कन्या जन्मास आली. तिचे पाळण्यातील नाव कामली असे ठेवण्यात आले. रेणू राजाची कन्या म्हणून तिला रेणुका असे म्हणण्यात येऊ लागले. ती मोठी झाल्यानंतर रेणू राजाने भागीरथीक्षेत्री तिचे स्वयंवर मांडले. त्यात तिने जमदग्नी ऋषींना वरले. या दाम्पत्यास रुमण्वत्, सुषेण, वसु, विश्वावसु व रामभद्र म्हणजेच परशुराम असे पाच मुलगे झाले.

तिचे पातिव्रत्य इतके प्रखर होते की ती नदीकाठच्या वाळूपासून घागर बनवून त्यात पाणी आणू शकत असे आणि त्या घागरीला आधार देण्यासाठी सापाच्या वेटोळ्याचा वापर करीत असे. एके दिवशी तुंगभद्रेच्या जलराशीत चित्ररथ गंधर्व जलक्रीडा करीत असताना, त्यास पाहून काही क्षणांसाठी तिचे मन विचलित झाले आणि तिच्या मनातील सात्त्विक भाव लोप पावल्यामुळे वाळूपासून घागर बनवण्याचे तिचे सामर्थ्य नष्ट झाले. ती रिकाम्या हाताने आश्रमात परतली. आपल्या तपोबलाने जमदग्नी ऋषींना सर्व प्रकार समजला. ते प्रचंड क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या पुत्रांना रेणुकेचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. पहिले चार पुत्र रुमण्वान, सुषेण, वसु आणि विश्वावसु यांनी पित्याची ही आज्ञा नाकारली. त्यामुळे जमदग्नींनी त्यांना शाप देऊन विचारशक्तिहीन केले. मात्र, पाचवा पुत्र परशुराम, जो भगवान विष्णूचा अवतार मानला जातो, त्यांनी पितृआज्ञेचे पालन करत आपल्या परशूने मातेचे मस्तक धडावेगळे केले.

परशुरामाच्या या पितृभक्तीवर प्रसन्न होऊन जमदग्नींनी त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा परशुरामाने अत्यंत चातुर्याने आपल्या मातेला जिवंत करून भावांना उःशाप द्यावा, असा वर मागितला. जमदग्नींनी ते मान्य केले. रेणुका पुन्हा जिवंत झाली. याच कथेचा दुसरा भाग असा सांगतो की जेव्हा परशुरामाने रेणुकेचा शिरच्छेद केला, तेव्हा तिचे मस्तक ज्या ठिकाणी पडले, ते स्थान म्हणजे आजचे माहूरगड मानले जाते. याच माहूरगडावरील रेणुका देवीचे प्रतिरूप म्हणून रेणापूर येथील रेणुका माता मंदिर सुप्रसिद्ध आहे.

मार्कंडेय पुराणातील उल्लेखानुसार, प्राचीन काळी रेणापूर हे दंडकारण्य क्षेत्राचा भाग होते. या ठिकाणी जमदग्नी ऋषी आणि माता रेणुका यांचे वास्तव्य होते. जमदग्नी ऋषींनी याच ठिकाणी तपश्चर्या केली होती म्हणून हा परिसर ‘जमदग्नी ऋषींची तपोभूमी’ म्हणून प्रसिद्ध होता. या गावाचे प्राचीन नाव ‘भिंगरी’ असे होते. माता रेणुकेच्या वास्तव्यामुळे त्याला रेणापूर हे नाव प्राप्त झाले. गावाच्या प्राचीनतेबद्दल स्थानिक भागात एक म्हण प्रसिद्ध आहे – ‘जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर। त्याही अगोदर रेणापूर।’ यामुळे या गावाचे प्राचीनत्व सिद्ध होते.
या मंदिराची आख्यायिका अशी की परशुरामांनी येथे आपल्या मातेची पूजा केली होती आणि या स्थानी त्यांनी रेणुका देवीचे मंदिर उभारले होते. पुढे ते कालौघात नष्ट झाले. त्यानंतर आठशे वर्षांपूर्वी या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना देवीने दृष्टांत देऊन येथे आपले स्थान असल्याचे सूचित केले. भक्तांनी शोध घेतला असता येथून वाहणाऱ्या रेणा नदीमध्ये रेणुकामातेची तांदळास्वरूपातील मूर्ती सापडली. आता जेथे मंदिर आहे त्या जागेवर या मूर्तीची प्रतिष्ठापना करून नंतर या जागेवर मंदिर बांधण्यात आले. वेळोवेळी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.

रेणापूर शहरात मध्यवर्ती भागात वसलेल्या या मंदिराभोवती तटबंदी आहे. या तटबंदीत असलेल्या मोठ्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सुमारे २० फूट उंचीच्या दोन प्राचीन दीपमाळा आहेत. यापैकी डावीकडील दीपमाळेला आतील बाजूने पायऱ्या आहेत. या पायऱ्यावरून दीपमाळेच्या वरपर्यंत जाता येते. उजवीकडे असलेली दीपमाळ ही ‘हलणारी दीपमाळ’ म्हणून प्रसिद्ध आहे. दगडी बांधकाम असलेल्या या दीपमाळेवर दिवे लावण्यासाठी दीपकोष्टके व पाषाणी हस्त आहेत. या दीपमाळेचे वैशिष्ट्य म्हणजे तिला विशिष्ट लयीत धक्का दिल्यास ती काहीशी हलू लागते. दीपमाळेच्या या हलण्यामागे त्या काळचे प्रगत अभियांत्रिकी कौशल्य असल्याचे सांगितले जाते. अशा बांधकामांमध्ये दोन दगडांमध्ये चुना नसतो. त्यामुळे दगडांमध्ये सूक्ष्म जागा असते. जेव्हा त्यावर बळाचा प्रयोग केला जातो, तेव्हा हे दगड एकमेकांवर सरकतात, ज्यामुळे तेथील संपूर्ण रचना लवचिक बनते. भूकंपाच्या धक्क्याने होणारी कंपने शोषून घेण्यासाठी ही रचना केली जाते. जपानमधील ‘पॅगोडा’ ज्याप्रमाणे भूकंपात हालत असले तरी पडत नाहीत, त्याच तत्त्वाचा वापर १२ व्या शतकातील भारतीय स्थापत्यकारांनी येथे केलेला आहे. काळाच्या ओघात येथील एका दीपमाळेचा वरचा भाग पडल्यामुळे त्या जागेवर सिमेंटचे बांधकाम करण्यात आले, परंतु मूळ दगडी रचना आजही तशीच आहे. या हलणाऱ्या दीपमाळेविषयीही येथे एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी की या मंदिरात काही दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्ती शिरून विध्वंस करत असत. एक दिवस त्या व्यक्ती मंदिरात असताना ही दगडी दीपमाळ अचानक हलू लागली. तिच्या हलण्यामुळे घंटानादही झाला. यामुळे सावध झालेले भक्त मंदिरात आले आणि त्यांनी या विध्वंस करणाऱ्या व्यक्तींना अटकाव केला. हा चमत्कार खुद्द देवीनेच घडवून आणला, असा भक्तांचा विश्वास आहे. तेव्हापासून ही दीपमाळ ‘हलती दीपमाळ’ म्हणून ओळखली जाते.

या दोन दीपमाळांच्या मधल्या जागेतून उंच जगतीवर असलेल्या मंदिराच्या मंडपात प्रवेश होतो. मंडप, अर्धखुला सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. येथील मंडप हा मूळ मंदिरासमोर नंतरच्या काळात बांधल्याचे जाणवते. या मंडपातून मूळ मंदिराच्या अर्धखुल्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या दर्शनी बाजूला चार खांब एकमेकांशी महिरपी कमानीने जोडलेले आहेत. या सभामंडपात भाविकांच्या सुविधेसाठी दर्शनरांगेचे नियोजन करण्यात आलेले आहे. सभामंडपात अंतराळाच्या प्रवेशद्वाराजवळ जमिनीवर कासवमूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर कीर्तिमुख व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या शेजारी असलेल्या देवकोष्टकात परशुरामाची मूर्ती आहे. येथून पुढे अंतराळात प्रवेश होतो. अंतराळात हेमाडपंती रचनेचे बांधकाम व दगडी स्तंभ आहेत. समोर गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर असलेल्या देवकोष्टकांत गणपती व देवीची मूर्ती आहे. गर्भगृहात वज्रपिठावर देवीची तांदळास्वरूपातील मूर्ती आहे. या मूर्तीची प्रभावळ, डोळे, कान, नाक व हात चांदीचे आहेत. उत्सवकाळात देवीच्या मूर्तीवर चांदीचा वा सोन्याचा मुखवटा चढवला जातो. या गर्भगृहाला बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या छतावर बाशिंगी कठडा व चार थरांचे शिखर आहे. या शिखराच्या चारही बाजूने सिंहशिल्पे आहेत. शिखराच्या प्रत्येक थरात असलेल्या देवकोष्टकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या शिरोभागी दोन आमलक व त्यावर कळस आहे.

शारदीय नवरात्रोत्सव हा उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी घटस्थापना करून देवीची पूजा, आरती आणि अभिषेक करण्यात येतो. विशेष होम-हवनही केले जातात. उत्सवाच्या शेवटी, म्हणजेच विजयादशमीला पालखी सोहळा होतो. यावेळी देवीची मिरवणूक काढली जाते, ज्यात हजारो भाविक सहभागी होतात. या काळात मंदिरात पानाफुलांची सुंदर सजावट करण्यात येते. याशिवाय, या मंदिरात चैत्र नवरात्रही साजरे करण्यात येते; मात्र त्याचे स्वरूप शारदीय नवरात्राएवढे भव्य नसते. इतर उत्सवांमध्ये महाशिवरात्री, दिवाळी आणि एकादशी यांचा समावेश आहे. महाशिवरात्रीला रुद्राभिषेक आणि शिव-शक्ती पूजन केले जाते. याशिवाय, परशुराम जयंतीला विशेष पूजा आणि अन्नदान होते. चंपाषष्ठीला खंडोबा-म्हाळसाबाईची पालखी येथे येते, असे सांगण्यात येते.

वैशाख पौर्णिमेला येथे तीन दिवसांची यात्रा असते. या काळात लातूर, धाराशिव, बीड आणि कर्नाटकातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात. गॅझेटियरमधील नोंदीनुसार ‘ही देवी आजार आणि रोग बरे करण्यासाठी प्रसिद्ध आहे’. विशेषतः त्वचारोग किंवा देवीचे आजार झाल्यास ‘लिंब नेसणे’ किंवा ‘दंडवत घालणे’ (साष्टांग नमस्कार घालत मंदिर प्रदक्षिणा करणे) असे नवस केले जातात. यावेळी भाविकांकडून देवीला कौल लावला जातो. शेतीची अवजारे, भांडी आणि मिठाईची मोठी उलाढाल या जत्रेत होते.

उपयुक्त माहिती:

  • रेणापूर बस स्थानकापासून ७०० मीटर अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून रेणापूरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९९२१९१४६३२, ९९७५१२३२७०

रेणुका माता मंदिर

रेनापुर, ताल. रेनापुर, जिला. लातूर

Back To Home