रेणुका माता (काच मंदिर)
त्रिमुखी महादेव मंदिर सोनई, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर
मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ व चक्रधर स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेले नेवासा तालुक्यातील सोनई गाव धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. असे सांगितले जाते की या गावात गोरक्षनाथांनी सोन्याची वीट टाकली होती, तेव्हापासून या गावाचे नाव ‘सोनई’ झाले. गावात रेणुका मातेचे मंदिर असून रेणुका दरबार तसेच काच मंदिर म्हणून ते प्रसिद्ध आहे. याशिवाय १०व्या शतकातील त्रिमुखी महादेव मंदिरही येथे आहे. शनिशिंगणापूरपासून जवळ असलेल्या सोनई गावातील ही मंदिरे भाविकांची श्रद्धास्थाने आहेत.
रेणुका माता मंदिराची आख्यायिका अशी की १९५४ साली येथील अण्णा स्वामी महाराजांना रेणुका देवीने दृष्टांत देऊन सांगितले की मी तुमच्या वडिलोपार्जित जमिनीत आहे,
तेथे माझी प्रतिष्ठापना करा. त्यानुसार अण्णा स्वामींनी शोध घेतला असता त्यांना रेणुका देवीची मूर्ती आढळली. देवीने सांगितल्याप्रमाणे त्यांनी या जागेवर मंदिर बांधून त्यात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली.
सोनई गावाला लागून असलेल्या भागात बेल्हेकरवाडी येथे हे रेणुका देवीचे मंदिर आहे. मंदिरासमोरील प्रवेशद्वारावर सुमारे ८ फूट उंचीची दुर्गामातेची मूर्ती आहे. प्रवेशद्वारातून मंदिर प्रांगणात गेल्यावर २ उंच दीपमाळा दिसतात. साधारणतः ४५ ते ५० फूट उंच असलेल्या या दीपमाळांवर बाहेरील भागात मंदिरांमध्ये ज्याप्रमाणे देवकोष्टके असतात, तशी शेकडो देवकोष्टके आहेत. उत्सवाच्यावेळी यामध्ये दीप लावून या दीपमाळा प्रज्वलित केल्या जातात. या दुमजली मंदिराच्या प्रवेशद्वारावर बाहेरील बाजूला २ गजराज आहेत. काही पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. तेथील सर्व भिंती व खांबांवर विशिष्ट प्रकारच्या लहान–लहान रंगीत काचांचे तुकडे लावण्यात आले आहेत. त्यामुळे हे मंदिर ‘काच मंदिर’ म्हणून ओळखले जाते. गर्भगृहात रेणुका देवीची तांदळास्वरूप मूर्ती आहे, देवीच्या मूर्तीसोबतच येथे जलदेवता, नागदेवता, काळभैरव, सप्तयोगिनी, श्रीदत्त, वेताळ यांच्या मूर्ती आहेत. त्यामुळे रेणुका देवीचे मंदिर ‘माता दरबार’ म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरात वर्षभरात अनेक उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी वासंतिक नवरात्र, गुरुपौर्णिमा, शारदीय नवरात्र या उत्सवांवेळी हजारो भाविक येथे येतात. मंदिराच्या प्रांगणात योगीराज हंसतीर्थ स्वामींचे समाधी मंदिर आहे.
याच सोनई गावात असलेले त्रिमुखी महादेवाचे मंदिर हे यादवकालीन असावे, असे सांगण्यात येते. या मंदिराचा परिसर प्रशस्त असून येथे अनेक वृक्ष आहेत. याशिवाय येथे सोमेश्वर मंदिर, गोरक्षनाथ व श्रीदत्त अशी मंदिरे आहेत. पूर्वाभिमुख असलेल्या मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील चौथऱ्यावर वैशिष्ट्यपूर्ण नंदीची मूर्ती आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपातील खांबांवर वैशिष्ट्यपूर्ण शिल्पकाम आहे. सभामंडप खुला असून अशा रचनेला ‘रंगमंडप’ असे संबोधले जाते. सभामंडपात चक्रधर स्वामींचे आसन आहे. महानुभव पंथाचा प्रसार करताना चक्रधर स्वामी येथील गुंफेत ३ दिवस थांबल्याचे सांगितले जाते. गाभाऱ्यात त्रिलिंगी शिवपिंडी असून ते ब्रह्मा, विष्णू व महादेवांचे प्रतीक आहे. याशिवाय मंदिर परिसरात काही विरगळ आहेत. महाशिवरात्रीला येथे उत्सव असतो. प्रत्येक श्रावणी सोमवारी शेकडो भाविक त्रिमुखी महादेवाच्या दर्शनाला येतात.
उपयुक्त माहिती:
- शनिशिंगणापूरपासून ७ किमी, तर नेवासे येथून २७ किमी अंतरावर
- खासगी वाहने रेणुका मंदिर व त्रिमुखी मंदिराजवळ जाऊ शकतात
- नेवासे येथून एसटीची सुविधा
- मंदिर परिसरात निवासाची सुविधा नाही
- रेणुका मंदिर स्थान: https://maps.app.goo.gl/Pxxqw9QyUMykiz1x7
- त्रिमुखी मंदिर स्थान: https://maps.app.goo.gl/vv8T1VzsamAXW5dW6


