संगमनेरपासून भंडारदऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सह्याद्रीच्या कुशीत ऐतिहासिक वारसा लाभलेले पेमगिरी गाव वसले आहे. भीमगड, शहागड या नावांनी प्रसिद्ध असलेला पेमगिरी किल्ला याच गावात आहे. या किल्ल्यावर असलेले पेमाई मातेचे मंदिर येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. याशिवाय गावात संपूर्ण सागवानी लाकडात बांधलेले दुमजली हनुमंताचे भव्य मंदिर आहे. या मंदिराच्या शेजारी सुमारे २१ फूट उंचीची गदा उभारण्यात आली आहे. देशातील ही सर्वात मोठी गदा असल्याचे सांगितले जाते. या गावाच्या सीमेवर महाराष्ट्रातील महावटवृक्ष म्हणजेच सुमारे साडेतीन एकरावर पसरलेला एक विशाल वटवृक्षही आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एकमेव किल्ला म्हणजे पेमगिरी. शहाजीराजे भोसले यांच्या कर्तृत्वाची निशाणी म्हणून या किल्ल्याची ओळख आहे. या किल्ल्यावर शहाजीराजे व जिजाऊ यांचे अनेक वर्षे वास्तव्य होते. असे सांगितले जाते की शिवबांचे बालपणातील काही दिवस या किल्ल्यावर गेले होते. पेमगिरी किल्ल्यावर जाण्यासाठी गावातून रस्ता व पायरी असे दोन्ही मार्ग उपलब्ध आहेत. गावाकडून किल्ल्याकडे जाताना काही अंतरावर पेमाई देवीचे नवीन मंदिर गावकऱ्यांनी बांधले आहे. याशिवाय किल्ल्यावरही पेमाई देवीचे प्राचीन लहानसे मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची शस्त्रसज्ज मूर्ती आहे. मूर्तीशेजारी देवीचा मूळ तांदळा आहे. मंदिराच्या शेजारी ४ आयताकृती कोरीव टाक आहेत. ते सातवाहन काळातील असल्याचे सांगितले जाते. या टाकांमध्ये कायमच पाणी असते. हे दगडी टाक आतून एकमेकांना जोडण्यात आले आहेत. चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला येथे देवीची यात्रा भरते.
पेमगिरी गावाच्या मध्यभागी हनुमंताचे एक संपूर्ण सागवानी लाकडांचा वापर करून बांधण्यात आलेले सुंदर मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील बांधकामासाठी केवळ दगड व सागवानी लाकडांचा वापर करण्यात आला आहे. एखादा भव्य राजवाडा वाटावा, अशी या मंदिराची रचना आहे. मंदिर परिसराला सर्व बाजूंनी तटबंदी आहे. मंदिराचा आवार प्रशस्त असून त्यात सुंदर उद्यान विकसित करण्यात आले आहे. त्यात अनेक शोभेची व फुलझाडे लावण्यात आल्यामुळे हा परिसर सुंदर व शांत भासतो. मंदिराशेजारी सुमारे २१ फूट उंचीची वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर असलेली गदा आहे. जमिनीपासून ६ ते ७ पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप दुमजली असून तेथून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे.
सभामंडपाच्या मध्यभागी एका चौथऱ्यावर शेंदूरचर्चित गदाधारी मारुतीची मूर्ती स्थापित असून या मूर्तीच्या मागे २ गदा कोरलेल्या आहेत. या संपूर्ण चौथऱ्यावर लाकडी नक्षीकाम आहे. चौथऱ्याच्या बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. सभामंडपातच प्रदक्षिणा मार्गावर आणखी २ मंदिरे असून त्यामध्ये श्रीदत्त व विठ्ठल–रुख्मिणी यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपाच्या खालच्या व वरच्या मजल्यावर या गावातील ऐतिहासिक वास्तू प्रतिमारूपाने येथील भिंतींवर लावण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पेमगिरी किल्ला, तेथे सापडलेल्या पुरातन मूर्ती, शस्त्रास्त्रे, गावातील पुरातन दगडी बारव याशिवाय गावाच्या सीमेवर असलेले महावटवृक्ष यांचा समावेश आहे. मंदिराच्या प्रांगणात एका चौथऱ्यावर शनिदेवांची शिळा आहे. गंगाराम तात्याबा डुबे पाटील यांच्या प्रेरणेने १९४२ मध्ये या मंदिराचे काम पूर्ण झाले. त्यासाठी कोकणातून सागवानी लाकडे आणण्यात आली होती. आज ८० वर्षांनंतरही मंदिर जैसे थे असल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्याला अद्याप कोणतीही डागडुजी करण्याची गरज भासली नाही.
या मंदिरापासून अडीच ते तीन किमी अंतरावर मोरदरा भागात महाराष्ट्रातील सर्वात मोठा वटवृक्ष आहे. हा विशाल वटवृक्ष साधारणतः साडेतीन एकरावर पसरला असून त्याच्या बुंध्याचा घेर हा ५० ते ६० फूट व एकूण पारंब्या १०० पेक्षा जास्त आहेत. (त्या जमिनीला टेकून पुन्हा त्याचे खोडात रूपांतर झाले आहे) ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार २५० वर्षांपूर्वीचा हा वटवृक्ष असून त्याच्या हजारो पारंब्या जमिनीत जाऊन त्याचा घेर दिवसेंदिवस आणखी मोठा होत आहे. या शेकडो पारंब्यांमधून वटवृक्षाच्या मूळ खोडापर्यंत जाता येते. या खोडाच्या बुंध्याजवळ जाखाई–जाकमतबाबा ही दैवते आहेत.
या दैवतांबद्दल अशी आख्यायिका आहे की रामोशी समाजातील जाकमतबाबा शेळ्यांना चरण्यासाठी या जागेवर आले होते. त्यावेळी एका वाघाने शेळ्यांच्या कळपावर हल्ला केला. शेळ्यांना वाचविण्यासाठी जाकमतबाबाही वाघाशी भिडले. जाकमतबाबांची आरडाओरड ऐकून त्यांची बहीण जाखाई तेथे आली. वाघाच्या तावडीत भाऊ सापडल्याचे लक्षात येताच जाखाईने स्वतः वाघाशी लढा दिला. या संघर्षात वाघ, जामकतबाबा व जाखाई हे तिघेही गतप्राण झाले. या दोघांनी वाघाशी लढताना हत्यार म्हणून वापरलेल्या कुऱ्हाडीचा दांडा आजही या वृक्षात पाहायला मिळतो. पुढे या जागेवर ग्रामस्थांनी जाकमतबाबा व जाखाई यांच्या मूर्तींची स्थापना केली. या झाडाच्या फांद्या जाणीवपूर्वक कोणी तोडल्या तर जाकमतबाबा त्याला शिक्षा करतो, अशी येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे. त्यामुळे झाडाच्या पानालाही कोणी हात लावत नाही. त्यामुळे या झाडाचे रूपांतर विशाल वटवृक्षात झाले आहे. या महाकाय वटवृक्षावर गावकऱ्यांची नितांत श्रद्धा आहे. गावातील या सर्व वैशिष्ट्यांमुळे भटकंती करणारे पर्यटक, इतिहास अभ्यासक, वनस्पती अभ्यासक व भाविक येथे कायम येत असतात.