पराशर ऋषी मंदिर

पाथर्डी, ता. मेहकर, जि. बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात सप्तर्षींची सात मंदिरे आहेत. हे बुलडाणा जिल्ह्याचे वेगळेपण मानले जाते. ही सर्व मंदिरे प्राचीन आहेत आणि ती डोंगराळ भागात वसलेली आहेत. या सर्व मंदिरांजवळ जिवंत पाण्याचे झरे आहेत. यामध्ये वडाळी येथील वसिष्ठ ऋषी, देळप येथील बकदाल्भ्य ऋषी, गोमेधर येथील गौतम ऋषी, वरवंड येथील वाल्मिक ऋषी, पाथर्डी येथील पराशर ऋषी, दुर्गबोरी येथील दुर्वास ऋषी आणि विश्वी येथील विश्वामित्र ऋषी यांच्या मंदिरांचा समावेश होतो. यांपैकी ‘विष्णुपुराणा’ची रचना करणाऱ्या पराशर ऋषींनी प्राणप्रतिष्ठा केलेले प्राचीन शिवलिंग मेहकर तालुक्यातील पाथर्डी येथे आहे.

महाभारतातील आदिपर्वातील संदर्भानुसार, सप्तर्षींपैकी एक असलेल्या वसिष्ठ ऋषींचे नातू आणि ऋषी शक्ती यांचे पुत्र म्हणून पराशरांचा जन्म झाला. दुर्दैवाने जन्मापूर्वीच पित्याचे निधन झाल्यामुळे क्रोधाविष्ट होऊन त्यांनी राक्षसांचा नाश करण्यासाठी ‘राक्षस-सत्र’ यज्ञ सुरू केला होता; परंतु आजोबा वसिष्ठ आणि पुलस्त्य ऋषींच्या विनंतीवरून त्यांनी हा हिंसाचार थांबवला. या क्षमेच्या बदल्यातच त्यांना पुलस्त्य ऋषींकडून ‘पुराणसंहिते’चे दिव्य ज्ञान वरदान स्वरूपात प्राप्त झाले, ज्यामुळे ते पुढे महान ज्ञानी म्हणून ओळखले गेले.

पराशर ऋषींच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे त्यांचा सत्यवतीशी आलेला संबंध होय. देवीभागवत पुराणात नमूद केल्याप्रमाणे, यमुना नदीच्या तीरावर मत्स्यगंधेशी (सत्यवती) त्यांची भेट झाली आणि त्यांच्या मीलनातूनच महाभारतकार महर्षी वेदव्यासांचा जन्म झाला. पराशर ऋषी हे एक महान ग्रंथकारही होते. अठरा पुराणांपैकी अत्यंत प्रमाण मानल्या जाणाऱ्या ‘विष्णुपुराणा’चे ते मुख्य वक्ते आहेत. त्यांचे शिष्य ‘मैत्रेय’ यांनी जेव्हा विश्वाच्या उत्पत्तीबद्दल त्यांना प्रश्न विचारले, तेव्हा पराशरांनी त्यांना जे उत्तर दिले, तेच ‘विष्णुपुराण’ म्हणून ओळखले जाते. यामध्ये पराशरांनी सृष्टी कशी निर्माण झाली, पृथ्वीचा भूगोल, नद्या, पर्वत आणि काळाची गणना याचे अतिशय वैज्ञानिक दृष्टिकोनातून वर्णन केले आहे. त्यामुळेच, व्यासांनी अठरा पुराणे लिहिली असली तरी, त्याचे मूळ ज्ञान आणि प्रेरणा त्यांना पिता पराशरांकडूनच मिळाली होती, असे मानले जाते.

तपोबलासोबतच विज्ञानाची सांगड घालणारे ऋषी म्हणूनही त्यांची ख्याती आहे. आजच्या भारतीय ज्योतिषशास्त्राचा मूळ आधार असलेला ‘बृहत्पराशरहोराशास्त्र’ हा ग्रंथ त्यांनीच रचला. त्यात ग्रह-ताऱ्यांचे मानवी जीवनावरील गणितीय विश्लेषण त्यांनी मांडले आहे. विशेष म्हणजे, धर्मशास्त्रात ‘कलौ पाराशरः स्मृतः’ असे स्पष्ट म्हटले जाते. याचा अर्थ कलियुगात केवळ पराशरस्मृतीच प्रमाण मानली जावी, असा आहे. हिंदू धर्मात प्रत्येक व्यक्तीची जन्मकुंडली काढली जाते; या पद्धतीचे जनकही पराशर ऋषी असल्याचेच मानले जाते. त्यांच्या उल्लेखनीय रचनांमध्ये ‘विष्णुपुराण’, ‘पराशर संहिता’, ‘पराशर गीता’ आदींचा समावेश होतो. याच पराशर ऋषींनी प्राचीन काळी अजिंठा पर्वतरांगेत वसलेल्या मेघंकर (आताचे मेहकर) परिसरातील दंडकारण्यात तपश्चर्या केली होती. त्यावेळी त्यांनी येथे शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. पुढे बाराव्या-तेराव्या शतकात येथे हेमाडपंती स्थापत्यशैलीत मंदिर उभारण्यात आले.

हे मंदिर असलेले सध्याचे पाथर्डी गाव ब्रिटिश काळात, १९४०-४५ च्या सुमारास तत्कालीन वन विभागाने वसवले. या विभागाने बंजारा समाजाच्या काही लोकांना येथे जमिनी देऊन हे गाव निर्माण केले. पूर्वी या गावाच्या शेजारी ‘पाच देवळे’ नावाचे गाव होते, असे ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’ मध्ये नमूद आहे. गावाबाहेर नदीपलीकडे पराशर ऋषींचे मंदिर आहे. मंदिराच्या चारही बाजूंनी डोंगर व सागाचे दाट जंगल आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीत उभारलेल्या या मंदिराची मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि तीन गर्भगृहे अशी संरचना आहे. मंदिराच्या आधारशिलांवर नागबंध कोरलेले आहेत, तर मुखमंडपात काहीसे कोरीव काम आहे. मुखमंडपात नंदीची मूर्ती आहे. सभामंडपात दगडी स्तंभपादांवर उभ्या असलेल्या स्तंभांवर विविध आकार कोरलेले आहेत. सभामंडपातील भिंतींवर देवकोष्ठके कोरलेली आहेत. मुख्य गर्भगृहात मोठ्या शाळुंकेमध्ये शिवपिंडी आहे. या शिवपिंडीची स्थापना पराशर ऋषींनी केल्याचे मानले जाते. गर्भगृहात नागदेवतेचीही मूर्ती आहे. मंदिरातील अन्य दोन गर्भगृहांमध्ये पराशर ऋषी आणि श्रीकृष्णाची मूर्ती आहे. मंदिराच्या आवारात एक धुनी कायम पेटत असते. मंदिराच्या मागील बाजूस एका ठिकाणी हनुमानाची मूर्ती आहे. परिसरात अनेक प्राचीन मूर्तींचे अवशेष विखुरलेले आहेत.

या यादवकालीन मंदिरात महाशिवरात्र हा मुख्य उत्सव असतो. येथे हनुमान जयंती व वसुबारसही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारच्या सूर्योदयापूर्वी शेकडो भाविक मेहकर तालुक्यातील सप्तर्षी मंदिरांची परिक्रमा करतात. या महिन्यातील तिसऱ्या रविवारी रात्री सर्व परिक्रमावासी वडाळी येथील शिवमंदिरात एकत्र येतात. मध्यरात्री १२ च्या सुमारास तेथील गोमुखाखाली स्नान करून महादेवाला जलाभिषेक केल्यानंतर ओल्या अंगाने या परिक्रमेला प्रारंभ होतो. विश्वी येथील मंदिरात शिवलिंगाचे दर्शन झाल्यावर या परिक्रमेचा समारोप होतो. सोमवारी सूर्योदयापूर्वी अनवाणी ही परिक्रमा पूर्ण केली जाते.

उपयुक्त माहिती:

  • मेहकर येथून ८० किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ३३ किमी अंतरावर
  • मेहकर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा नाही

पराशर ऋषि मंदिर

पाथर्डी, ता. मेहकर, जी. बुलढाणा

Back To Home