अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जवळा येथील जवळेश्वर मंदिर रथ यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. राज्यभरात साजऱ्या होणाऱ्या मोठ्या आषाढी यात्रांमध्ये जवळेश्वराच्या रथ यात्रेला महत्त्वाचे स्थान आहे. आषाढी एकादशी ते गुरुपौर्णिमा असे पाच दिवस ही यात्रा साजरी होते. सुमारे २०० वर्षांपासून सुरू असलेली ही यात्रा नर्तिकांच्या जुगलबंदीसाठीही प्रसिद्ध आहे. जवळावासीयांचे ग्रामदैवत असलेले हे जागृत देवस्थान लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
जवळा गावाच्या मध्यावर असलेले जवळेश्वराचे प्राचीन मंदिर हेमाडपंती शैलीतील आहे. १७९१ साली या मंदिराचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जीर्णोद्धार केल्याची नोंद आहे. दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराची रचना चौरसाकृती आहे. संपूर्ण मंदिर परिसराला तटबंदी असली तरी येथील नंदीमंडप मात्र तटबंदीच्या बाहेर आहे. एका चौथऱ्यावर चार खांबांवर उभ्या असलेल्या या नंदी मंडपाची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. सुमारे २० ते २५ फूट उंच असलेल्या या मंडपात कोरीवकाम केलेला नंदी विराजमान असून येथील कळसावर गणेशासह अनेक देवी–देवतांच्या मूर्ती आहेत. नंदी मंडपापासून काहीसे उंचावर जवळेश्वराचे मंदिर आहे.
तटबंदीमधील लहानशा प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मंदिराच्या समोर चौथऱ्यावर आणखी एक काळ्या दगडातील नंदी आहे. मंदिर परिसर प्रशस्त असून तेथे फरसबंदी व अनेक शोभेची झाडे लावल्याने हा परिसर स्वच्छ, शांत व सुशोभित भासतो. जमिनीपासून सुमारे सहा ते सात फूट उंच जगतीवर (पाया) जवळेश्वराचे मंदिर आहे. सात ते आठ पायऱ्या चढून मंदिराच्या प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गणेश व भैरवनाथांच्या मूर्ती आहेत.
गर्भगृहात प्राचीन शिवपिंडी असून त्या शिवपिंडीच्या समोरील भिंतीवरील मोठ्या देवडीमध्ये महादेवांची मूर्ती आहे. (महादेवाच्या पुरातन मंदिरांमध्ये या जागेवर सहसा पार्वती मातेची मूर्ती आढळते.) या मंदिराच्या उजवीकडे नव्याने बांधलेले राम मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. या मंदिराच्या तळमजल्यावर ध्यानमंदिर आहे. अनेक भाविक ग्रंथवाचन व पारायणासाठी त्याचा वापर करतात.
अलीकडच्या काळापर्यंत जवळेश्वर मंदिराला शिखर नव्हते. असे सांगितले जाते की त्यामुळे जवळा आणि परिसरातील ग्रामस्थ दुमजली घर बांधत नव्हते. मंदिराला शिखर नसल्याने घरावर दुसरा मजला बांधण्यास घेतल्यावर त्यामध्ये काही अडचणी येत किंवा बांधल्यास काही दिवसांनी ते बांधकाम पडत असे. १९९६ मध्ये ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून या मंदिरावरील शिखराचे बांधकाम केले व विधीपूर्वक त्यावर कळस बसविला. तेव्हापासून जवळा येथे मोठ्या संख्येने दोन, तीन व चार मजली इमारती उभ्या राहू लागल्या आहेत.
जवळा गावात जवळेश्वर, बाळेश्वर, काळेश्वर, नंदकेश्वर व बेलेश्वर असे पाच स्वयंभू शिवलिंग आहेत. एका आख्यायिकेनुसार, येथील पाचही शिवलिंग श्रीरामांच्या काळातील असून जामखेडजवळील सौताडा येथे जेव्हा श्रीरामांचे वास्तव्य होते, त्यावेळी त्यांनी त्यांची स्थापना केली होती.
आषाढी एकादशी ते गुरुपौर्णिमा असे पाच दिवस चालणारा येथील यात्रा उत्सव प्रसिद्ध आहे. या काळात जवळेश्वर मंदिरावर आकर्षक रोषणाई केली जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी आरती करून जवळेश्वराच्या मुकुटाची रथामध्ये प्रतिष्ठापना केली जाते. आरतीचा मान हा येथील पाटील व कुलकर्णी यांना आहे. यावेळी भाविक नैवेद्य अर्पण करतानाच रथावर नारळाचे तोरण चढवतात. एकाच दिवसांत रथावर चढविलेल्या नारळांची संख्या १० ते १५ हजारांपर्यंत असते.
दुपारी एकच्या सुमारास ही भव्य रथ मिरवणूक ‘हर हर महादेव’च्या गजरात सुरू होते. सध्या ज्या रथामध्ये देवाची मिरवणूक काढली जाते तो रथ सुमारे १५० वर्षांपूर्वी याच गावातील सुतार असलेले येदू पंढरीनाथ सुरवसे यांनी सागाच्या लाकडापासून बनविला होता. आजही हा रथ सुस्थितीत आहे. २०२२ ला याची चाके जीर्ण झाल्यामुळे ती बदलण्यात आली होती. मिरवणूक सुरू असताना या रथाला वळण घेण्यासाठी रथाच्या मागे व पुढे मोठा दोर बांधला जातो. हा रथ खेचण्यासाठी २०० ते २५० जण लागतात. यात्रेच्या दिवशी रथाला दोर बांधण्याचा मान येथील मते घराण्याला, तर रथात बसण्याचा मान सुरवसे घराण्याला आहे. हा रथ ज्या मार्गावरून जातो त्या संपूर्ण मार्गाचे (‘रथ मार्ग’ म्हणून येथे हा रस्ता प्रसिद्ध आहे.) राज्य सरकारच्या निधीतून याचे काँक्रिटीकरण झाले आहे. रात्री एक ते दीड वाजेपर्यंत ही रथ मिरवणूक पुन्हा जवळेश्वर मंदिराजवळ येते. यावेळी गावातील सर्व मंडाळांच्या नर्तिका, वाद्यवृंद पथक जवळेश्वर मंदिराच्या प्रांगणात येतात. रात्री दीडच्या सुमारास या सर्व नर्तिकांकडून देवाची आरती करून घेण्यात येते. त्यानंतर त्या नर्तिकांची नृत्याची जुगलबंदी सुरू होते.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या मंदिराचा राज्य सरकारने तीर्थक्षेत्राच्या ‘क’ दर्जात समावेश केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून या मंदिराला वेळोवेळी निधी मिळत असतो.