
माती गणपती, तळ्यातला गणपती, ढोल्या गणपती, नवश्या गणपती, त्रिशुंड गणपती, गुपचूप गणपती अशी गणेशाची विविध नावे आपण अनेकदा ऐकली आहेत; परंतु अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आव्हाणे येथे चक्क निद्रिस्त गणपती आहे. निद्रिस्त गणपतीची येथे स्वयंभू मूर्ती असून मोरगावच्या मोरेश्वर गणपतीचा यामध्ये अंश असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. निद्रिस्त स्वरूपातील हे गणपतीचे स्थान राज्यातील एकमेव असल्याचे सांगितले जाते.
या मंदिराची आख्यायिका अशी की, अहिल्यानगर-पैठण मार्गावर तीसगावपासून जवळ असलेल्या ‘आव्हाणे’ गावात पूर्वी दादोबा देव नावाचे गणेशभक्त राहत होते. ते दरवर्षी न चुकता मोरगाव येथील मोरेश्वराच्या दर्शनाला जात असत. वयोमानामुळे त्यांना मोरगावपर्यंत जाणे-येणे कठीण होत होते. तेव्हा गणेशभक्त संत मोरया गोसावी यांनी स्वप्नदृष्टांत देऊन आता मोरगावची वारी थांबवावी, असे दादोबांना सांगितले; परंतु दादोबांना हे पटले नाही. ते नेहमीप्रमाणे मोरगावला वारीसाठी निघाले. त्यांच्या मार्गातील एका ओढ्याला पूर आल्यामुळे त्यांना तो ओलांडता येत नव्हता.
प्रतीक्षा करूनही पुराचे पाणी कमी होण्याची चिन्हे दिसत नव्हती. त्यामुळे दादोबा मोरेश्वराचे नाव घेऊन पाण्यात उतरले; परंतु पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर ते वाहत गेले. कसेबसे स्वतःला सांभाळत एका ठिकाणी ते थांबले. चारही बाजूने पाणी व मध्येच बेटासारखा एक छोटासा जमिनीचा तुकडा होता. त्यावर दादोबा उभे राहून पाणी ओसरण्याची वाट पाहू लागले. तेथेच मोरेश्वराने त्यांना दृष्टांत देऊन सांगितले, तू तुझ्या गावी परत जा, मीच तुझ्या गावी येत आहे. पुढे काही वर्षांनी दादोबा देवांचे निधन झाले. त्यानंतर ‘आव्हाणे’ गावात एक शेतकरी शेत नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ जमिनीत अडकला.
जमीन खोदल्यानंतर तेथे गणेशाची मूर्ती असल्याचे शेतकऱ्याला समजले. त्याच रात्री दादोबा देवांच्या मुलाला म्हणजेच गणोबा देव याला स्वप्नदृष्टांत झाला की, तुझ्या गावातील शेतकऱ्याला सापडलेली माझी मूर्ती जशी आहे तशीच तिची प्रतिष्ठापना कर. ती स्वयंभू मूर्ती म्हणजेच ‘आव्हाणे’ येथील निद्रिस्त गणपती होय. या मूर्तीच्या छातीवर नांगराचा फाळ लागल्याची खूण येथे दाखवली जाते.
आव्हाणे गावाच्या पश्चिमेला अवनी नदीच्या काठावर निद्रिस्त गणपती देवस्थान आहे. मंदिराभोवती तटबंदी असून तटबंदीच्या प्रवेशद्वारातून देवस्थान परिसरात प्रवेश होतो. मंदिराच्या प्रांगणात असलेली स्वच्छता व टापटीपपणा यामुळे येथील वातावरण प्रसन्न वाटते. सभामंडप व गाभारा अशी मंदिराची रचना आहे. या मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून तो तीनही बाजूंनी खुला आहे. मूळ मंदिरासमोर नंतरच्या काळात तो बांधलेला आहे. मूळ गाभाऱ्यात गणेशाच्या एकूण तीन मूर्ती आहेत. निद्रिस्त गणेशाची मुख्य मूर्ती दक्षिणमुखी असून ती चार फूट लांब, तीन फूट रुंद व दोन फूट खोलीवर झोपलेल्या अवस्थेत आहे. ही मूर्ती ५०० वर्षांहूनही अधिक प्राचीन असल्याचे सांगितले जाते. या मूर्तीच्या मागे आणखी एक गणेशमूर्ती असून बाजूला असलेल्या गाभाऱ्यातही एक गणेशाची मूर्ती आहे. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आहे.
गणेश चतुर्थी आणि गणेश जयंतीला येथे उत्सव होतो. यावेळी होणाऱ्या महाआरतीसाठी येथे हजारो भाविक येतात. अंगारकी चतुर्थीला येथे मोठी जत्रा भरते. सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत भाविकांना या गणेशाचे दर्शन घेता येते.