नागेश्वर मंदिर

भाळवणी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर 

पराशर, विभांडक भृंग ऋषींच्या वास्तव्याने पावन झालेल्या भाळवणी परिसरात नागेश्वर महादेवाचे मंदिर आहे. असे सांगितले जाते की पुरातन काळी हे तिन्ही ऋषी या स्थानावर येऊन आध्यात्मिक चर्चा करत असत. येथे असलेल्या शिवपिंडीची स्थापना या ऋषींनी केली आहे. पौराणिक काळात या मंदिर परिसरात अनेक ऋषी वास्तव्यास होते. येथील कापरी नदीच्या तीरावर असलेले १६ व्या शतकातील हे प्राचीन मंदिर जागृत देवस्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे 

भाळवणी गाव मंदिराबाबत आख्यायिका अशी की पारनेरमधील एका डोंगरावर विभांडक भृंग ऋषी महादेवांची कठोर तपश्चर्या करीत होते. त्यांची ही तपश्चर्या शेकडो वर्षे सुरू होती. महादेवांनी प्रसन्न होऊन या ऋषींना वरदान दिल्यास ते आपले स्थानही मागू शकतील आपल्या हातातून स्वर्ग जाईल, या भीतीने देवांचा राजा इंद्र चिंतित झाला होता. त्याने आपल्या दरबारातील उर्वशी मेनका या अप्सरांना ऋषींची तपश्चर्या भंग करण्यासाठी स्वर्गातून या ठिकाणी पाठविले. त्यानुसार अप्सरांनी नृत्य करून ऋषींवर मोहिनी टाकली. त्यांच्या नृत्यावर अदांवर ऋषी भाळले त्यांची तपश्चर्या भंग झाली. तेव्हापासून या गावाचे नाव भाळवणी झाले. त्यानंतर या ठिकाणी राहून ऋषींनी या परिसरात शिवपिंडींची स्थापना केली. त्यापैकी नागेश्वराचे प्रमुख स्थान मानले जाते.

भाळवणी गावाच्या दक्षिणेला एका लहानशा टेकडीवर नागेश्वराचे हेमाडपंती शैलीतील मंदिर आहे. त्याच्या बाजूने कापरी नदी वाहते. पौराणिक काळात या नदीचे नावजान्हवी नदीअसे होते. नदीला लागून देवस्थानच्या वतीने सुंदर उद्यान विकसित करण्यात आले असून त्यातून मंदिरात जाण्यासाठी मार्ग बनविण्यात आला आहे. रस्त्याच्या दुतर्फा शोभेची झाडे लावण्यात आल्यामुळे हा परिसर सुशोभित शांत भासतो. मंदिराच्या प्रांगणात फरसबंदी असून मुख्य मंदिरासमोर भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्टतर्फे शेड उभारण्यात आली आहे.

नंदी मंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी नागेश्वर मंदिराची रचना आहे. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या नंदी मंडपात नंदीची भव्य वैशिष्ट्यपूर्ण संगमरवरी मूर्ती आहे. या नंदी मंडपासह या परिसरातील सर्व मंदिरांचे कळस सोनेरी रंगात रंगविले आहेत. त्यामुळे दूरवरूनही ही मंदिरे नजरेस पडतात. नंदी मंडपासमोरून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपातील दगडी खांबांवर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर असून मध्यभागी पितळी कासवाची मूर्ती आहे. अंतराळातून गर्भगृहाकडे जाताना गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या सर्व बाजूने पितळी पत्र्यावर नक्षीकाम केलेले असून ललाटबिंबावर हनुमान गणेश यांच्या मूर्ती आहेत. साधारणतः महादेवाच्या प्राचीन मंदिरांमध्ये गर्भगृहाच्या ललाटबिंबावर महादेव अथवा गणेशाची मूर्ती असते; परंतु येथे मात्र मूर्ती एकत्र असून त्यातही हनुमंताची मूर्ती असणे हे दुर्मिळ मानले जाते. गर्भगृहातील खोलगट भागात मूळ दगडी शिवपिंडी असून त्याच्या शाळुंकेला पितळी आवरण आहे. श्रावणी सोमवार महाशिवरात्रीला शिवलिंगाभोवती फुलांची आरास करण्यात येते, तर उत्सवाच्यावेळी शिवपिंडीवर धातूचा मुखवटा ठेवण्यात येतो.

मंदिराच्या शेजारी साईबाबा, श्रीदत्त गणपती यांची मंदिरे आहेत. जागृत देवस्थान म्हणून हे ठिकाण अहिल्यानगर जिल्ह्यात ओळखले जाते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी नागेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी होते. महाशिवरात्रीला येथील यात्रोत्सव हा पारनेरमधील मोठ्या उत्सवांपैकी एक मानला जातो. हा सोहळा सलग दिवस सुरू असतो. पहिल्या दिवशी पहाटेपासून महापूजा अभिषेक करण्यात येतो. यात्रोत्सवानिमित्त, भजन, कीर्तन, शेरणी वाटप (नवसपूर्तीनिमित्त गुळाचे वाटप करणे) आदी सांस्कृतिक कार्यक्रम होतात. सायंकाळी छबिना (पालखी) निघतो. यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी येथे होणाऱ्या कुस्ती स्पर्धा प्रसिद्ध असून त्यावेळी राज्यभरातून शेकडो मल्ल येथे येतात. उत्सवाच्या काळात देवस्थानच्या वतीने भाविकांना फराळवाटप करण्यात येतो, तर महाशिवरात्रीला महाप्रसादाचे वाटप करण्यात येते.

आषाढी एकादशीनिमित्त नागेश्वर मंदिरातून दरवर्षी पंढपूर येथे दिंडी काढण्यात येते. यामध्ये मोठ्या संख्येने वारकऱ्यांचा सहभाग असतो. दररोज सकाळी वाजता आरती होते. महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवारी सकाळी दुपारी १२ वाजता महाआरती होते. दररोज सकाळी ते सायंकाळी पर्यंत मंदिरात जाऊन नागेश्वराचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • पारनेरपासून १८ किमी, तर अहिल्यानगरपासून २२ किमी अंतरावर
  • पारनेर, अहिल्यानगरपासून भाळवणी येथे एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home