मोहिनीराज मंदिर,

नेवासा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा परिसर मानला जातो. ज्ञानेश्वरांनी ग्रंथराज ‘ज्ञानेश्वरी’ म्हणजेच ‘भावार्थ दीपिका’ यांची रचना येथे केली. पौराणिक कथेनुसार नेवासे म्हणजे ते ठिकाण, जेथे समुद्रमंथनानंतर विष्णूंनी मोहिनीचे रूप घेऊन राहू या राक्षसाचा वध केला होता. राहूला मारल्यानंतर त्याच्या धडातून सांडलेल्या अमृताच्या थेंबांतून जो प्रवाह निर्माण झाला, त्यातून येथील प्रवरा नदी निर्माण झाली. त्यामुळे प्रवरेला ‘अमृतवाहिनी’ म्हटले जाते. नदीच्या तीरावर वसलेल्या नेवासे शहराच्या मध्यभागी मोहिनीराज मंदिर आहे. विष्णूंच्या मोहिनी अवताराला समर्पित असे हे राज्यातील एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते.

मंदिराची आख्यायिका अशी की देवांचा राजा इंद्र हत्तीवर बसून वनविहार करीत असताना त्यांना दुर्वास ऋषी भेटतात. तेव्हा दुर्वास ऋषीनी इंद्राला पुष्पमाळ भेट म्हणून दिली. परंतु इंद्राने ती गळ्यात न घालता हत्तीच्या सोंडेमध्ये दिली. हत्तीने ती माळ आपल्या पायांखाली तुडवली. इंद्राच्या या गर्विष्ठ वागण्याचा दुर्वास ऋषींना राग आला व त्यांनी इंद्राला शाप दिला. ‘ज्या ऐश्वर्याचा तुला गर्व झाला आहे, त्याचा नाश होऊन तुझे इंद्रपदही जाईल.’ त्यानंतर राक्षसांचा राजा बाली याने इंद्राबरोबर युद्ध करून देवांचे राज्य हिरावून घेतले. त्यामुळे इंद्रासह सर्व देवांची शक्ती क्षीण झाली. आपले राज्य व शक्ती परत मिळविण्यासाठी काहीतरी तोडगा काढावा, यासाठी सर्व देव विष्णूंकडे गेले. त्यावर विष्णूने सर्व देवांना राक्षसांबरोबर मैत्री करण्यास सांगितली. राक्षसांकडील शक्तीचा वापर करून समुद्रमंथन करण्याचे त्याने सुचविले. समुद्रमंथनातून मिळणारे अमृत प्राशन करून गेलेले वैभव परत मिळणार होते. त्यानुसार समुद्रमंथनातून १४ रत्ने प्राप्त झाली. त्यामध्ये विष, कामधेनू गाय, उच्चेश्रवा घोडा, ऐरावत हत्ती, कौस्तुभ मणी, कल्पवृक्ष, रंभा-अप्सरा, लक्ष्मी, वारुणी (विशिष्ट प्रकारचे मद्य), चंद्र, पारिजात वृक्ष, शंख, वैद्यराज धन्वंतरी व अमृत यांचा सहभाग होता. अमृताच्या आधी जी १३ रत्ने निघाली त्यातील उच्चेश्रवा घोडा आणि वारुणी दानवांनी, कामधेनू गाय ऋषींनी; तर बाकी १० रत्ने देवांनी वाटून घेतली.

१४वे रत्न अमृत वाटपावरून देव व राक्षसांमध्ये वाद सुरू झाला. देवांची शक्ती आधीच क्षीण झाल्यामुळे राक्षसांनी अमृतकुंभ पळवून नेला. त्यानंतर ते अमृत कोणी व किती घ्यायचे यावरून त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. ती संधी साधत विष्णूंनी सुंदर स्त्रीचे (मोहिनी) रूप घेतले व राक्षसांकडे गेले. या सुंदर स्त्रीने राक्षसांवर मोहिनी घातली. त्यामुळे अमृत प्राशन करण्याचे विसरून सर्वजण या स्त्रीकडे आकर्षित झाले. त्यावेळी त्या स्त्रीने राक्षसांना एक पर्याय सुचविला, ‘अमृताचा कुंभ माझ्याकडे द्या, मी राक्षस व देवांना त्याचे समान वाटप करेन.’ त्या स्त्रीने सुचविलेल्या उपायावर राक्षसांपैकी कोणीही शंका न घेता अमृतकुंभ तिच्या स्वाधीन केला. त्यानंतर मोहिनी रूप घेतलेल्या विष्णूंनी देवांना व राक्षसांना वेगवेगळ्या रांगेत बसण्यास सांगितले. तिने देवांना अमृत व राक्षसांना मद्य दिले. अमृत प्राशनामुळे देवांची शक्ती परत आल्याने राक्षसांकडून देवलोक परत मिळविण्यात त्यांना यश आले. विष्णूंच्या मोहिनी रूपामुळे हे शक्य झाल्याने सर्व देवांनी मोहिनी स्वरूपातील विष्णूंची या स्थानावर पूजा केली, म्हणून या देवाला ‘मोहिनीराज’ असे म्हणतात. समुद्रमंथनातून निर्माण झालेली लक्ष्मी ही विष्णूंची अर्धांगिनी बनली. त्यामुळे या मंदिरात मोहिनीराज व लक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत.

नेवासे शहराच्या मध्यवर्ती भागात मोहिनीराज हे प्राचीन मंदिर आहे. पाच ते सहा फूट उंच जगतीवर (जोते) उभ्या असलेल्या काळ्या पाषाणातील या प्राचीन मंदिराची रचना सभामंडप व गर्भगृह अशी आहे. मंदिरात जाण्यासाठी पाच ते सहा पायऱ्या चढून जावे लागते. मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल कोरलेले दिसतात. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी १७७३ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आहे. संपूर्ण सभामंडपाचे वितान (छत) हे दगडामध्ये झुंबर कोरल्याप्रमाणे दिसते. सभामंडपात अनेक प्राचीन मूर्ती आहेत. गर्भगृहातील मोहिनीराजांची मूर्ती वालुकामय आणि स्वयंभू आहे. तिला वज्रलेपाने सुशोभित करण्यात आले आहे. मूर्ती सिंहासनावर विराजित असून हातात शंख, चक्र, गदा व अमृतकुंभ आहे. डोक्यावर मुकुट, नथ, कंबरपट्टा व पायात तोडे परिधान केलेली ही मूर्ती साडेचार फूट उंचीची आहे. मोहिनीराज मूर्तीच्या शेजारी लक्ष्मी मातेची मूर्ती आहे.

माघ शुक्ल सप्तमी म्हणजे रथसप्तमीपासून मोहिनीराजाचा उत्सव सुरू होतो. हा उत्सव पुढे पाच दिवस चालतो. या कालावधीत सर्व भाविकांना मूर्तीला हात लावून दर्शन घेता येते. इतरवेळी मात्र सभामंडपातून गर्भगृहात असलेल्या मूर्तीचे दर्शन घेता येते. मोहिनीराज मंदिर हे नेवासेचे ग्रामदैवत आणि राज्यातील हजारो कुटुंबांचे कुलदैवत आहे. दररोज दुपारी १२.३० आणि सायंकाळी ७ वाजता मंदिरात आरती होते. सकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना मोहिनीराज व लक्ष्मीमातेचे दर्शन घेता येते.


उपयुक्त माहिती:

  • नेवासे बस थांब्यापासून पायी १० मिनिटांवर, तर अहिल्यानगरपासून ५९ किमी अंतरावर
  • अहिल्यानगर, शिर्डी येथून बस सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंतजाऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home