मयुरेश्वर मंदिर

पोहेगाव, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर

शमीच्या झाडाखाली स्वयंभू प्रकट झालेल्या श्रीगणेशाचे जागृत स्थान म्हणून अहमदनगरमधील पोहेगाव येथील मयुरेश्वर गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. या गावाचे वेगळेपण असे की येथील ग्रामस्थ आपल्या घरातील दूधदुभत्याची विक्री करता ते रोज सकाळी या मंदिरात आणतात येथे येणाऱ्या भाविकांना त्याचे नि:शुल्क वाटप करतात. पूर्वी स्वतः ग्रामस्थ भाविकांची ही सेवा करत असत. आता मंदिर ट्रस्टमुळे ती आणखी नियोजित पद्धतीने करण्यात येते.

कोपरगावसंगमनेर महामार्गाला लागून असलेले पोहेगाव येथील मयुरेश्वराचे मंदिर पोहेगावसह कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी, चांदेकसारे, झगडेफाटा देर्डे नगदवाडी या पाच गावांच्या सीमेवर आहे. पोहेगावचे ग्रामदैवत असलेले हे स्थान हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून मयुरेश्वर गणपतीची ख्याती आहे. या स्थानाची आख्यायिका अशी की सध्या जेथे मयुरेश्वराचे मंदिर आहे तेथे पोहेगावातील रोहमारे परिवाराची पिढीजात शेती होती. त्या जमिनीत मोठे शमीचे झाड होते. (आजही मंदिरासमोर ते झाड आहे.) एके दिवशी या शमीच्या झाडाच्या बुंध्याजवळ गणेशाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. त्याच रात्री रोहमारे परिवारातील बाळाजी रोहमारे यांना गणेशाने स्वप्नदृष्टांत देऊनशमीच्या झाडाखाली मी आलो आहे. माझी प्रतिष्ठापना कराअसे सांगितले. त्या स्वप्नदृष्टांतानुसार रोहमारे परिवाराने गणेशाची मूर्ती जेथे प्रकट झाली त्या शमीच्या झाडाजवळ एक लहानसे मंदिर तयार करून त्यात मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

या छोटेखानी मंदिरात पुढील काही वर्षे गणेशाच्या दर्शनाला परिसरातील भाविक येत आपल्या मनोकामना व्यक्त करत असत. या गणेशाची उपासना केल्यावर मनातील इच्छा पूर्ण होतात, अशी प्रचिती भाविकांना येऊ लागल्यानंतर दिवसेंदिवस या मंदिराचा लौकिक वाढत गेला परिसरातील नागरिकांचीही दर्शनासाठी गर्दी होऊ लागली.

मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे नियोजन करता यावे, यासाठी १९९५ मध्ये ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन येथे नवीन मंदिर बांधण्याचे ठरविले. गणेशाच्या लौकिकामुळे दानशूर भाविकांनी या कार्यासाठी सढळ हस्ते मदत केल्याने आजचे हे सुंदर प्रशस्त मंदिर उभे राहिले आहे. मयुरेश्वर मंदिराची रचना प्राचीन आधुनिक स्थापत्यकलेचा सुंदर मेळ आहे. मंदिराचा उंच कळस लांबूनच लक्ष वेधून घेतो. मंदिर परिसर प्रशस्त असून सर्वत्र फरसबंदी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ शमीचे झाड आहे. भाविक या मंदिरात जाण्याआधी प्रथम शमीच्या झाडाखाली असलेल्या मूर्तीचे दर्शन घेऊन मग मंदिरातील मयुरेश्वराच्या दर्शनाला जातात. (गणेशाच्या स्थानाजवळ शमीचे झाड असणे पवित्र समजले जाते. शमीची पाने गणेशाला वाहतात. असे सांगितले जाते की अज्ञातवासात जाण्यापूर्वी पांडवांनी आपली सर्व शस्त्रे शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवली होती. तेव्हापासून शस्त्रास्त्रांची पूजा करताना त्यावर शमीपत्र वाहण्याची पद्धत आहे. धार्मिक कार्यात आयुर्वेदामध्येही शमी वृक्षाचे महत्त्व आहे. त्यामुळे शमीला राजस्थान तेलंगणा या राज्यांतराज्यवृक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.) 

दर्शनमंडप, सभामंडप गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. संगमरवराच्या वापरामुळे सभामंडप वैशिष्ट्यपूर्ण भासतो. भाविकांच्या गर्दीचे नियोजन करता यावे यासाठी त्यात दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्भगृहाच्या ललाटबिंबावर या मूळ मंदिराचे बांधकाम १९५४ साली झाल्याचा उल्लेख आहेगर्भगृहात संगमरवरी आसनावर मयुरेश्वराची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. मयुरेश्वराचा मुकुट चांदीचा तर डोळे सोन्याचे आहेत. याशिवाय कपाळावरील तिलकही सोन्याचा आहे. या मंदिरावर कळस असून त्यापैकी गर्भगृहावरील उंच कळसावर अनेक लहानलहान कळसांच्या प्रतिकृती कोरलेल्या आहेत. मंदिर परिसरात अनेक झाडे असल्यामुळे हा परिसर हिरवागर्द शांत भासतो.

प्रत्येक मंगळवारी, संकष्टी चतुर्थी अंगारकी चतुर्थीला येथे हजारो भाविक दर्शनाला येतात. माघी गणेश चतुर्थीचा उत्सव येथे मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. येवला, लासलगाव, कोपरगाव, तसेच परिसरातील अनेक भाविक २० ते ४० किमी अंतरावरून या दिवशी पायी दर्शनाला येतात. यावेळी आलेल्या सर्व भाविकांना येथे मोफत फराळ, खिचडी चहाची व्यवस्था करण्यात येते. रात्री १२ वाजेपर्यंत येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते.

कोणत्याही कार्याची सुरुवात करताना गणेशाची प्रथम पूजा करण्याचा रिवाज आहे. त्याप्रमाणे येथील पंचक्रोशीत कोणतेही कार्य असेल तर आधी येथील गणेशाला श्रीफळ वाहिला जातो त्यानंतरच कामाला सुरुवात केली जाते. ग्रामस्थांची अशी श्रद्धा आहे की त्यामुळे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतात.

उपयुक्त माहिती:

  • कोपरगावपासून १२ किमी, तर अहमदनगरपासून ९७ किमी अंतरावर
  • कोपरगाव, संगमनेरपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home