
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील कांबी हे गाव येथील प्राचीन महालक्ष्मी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. ११व्या ते१२ व्या शतकातील असलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील महालक्ष्मीची मूर्ती. ही वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात नसून ती सभामंडपाच्या छताला कोरलेली आहे. छताला कोरलेल्या मूर्तीची दररोज येथे पूजा होते, त्याचबरोबर छतावरील देवीला दररोज साडी-चोळी परिधान केली जाते. अशा प्रकारचे हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते.
मंदिराची आख्यायिका अशी की गोदावरी काठावरील हा परिसर पूर्वी ‘काम्यक वन’ म्हणून ओळखला जात असे. या वनात अनेक ऋषी, मुनी, साधू आश्रम स्थापून तप करीत असत. एकदा पार्वतीबरोबर झालेल्या वादामुळे महादेव रूसून येथे आले व या वनात तपश्चर्या करू लागले. यावेळी पार्वतीने भिल्ल स्त्रीचा वेष घेतला व मोरपिसांची वस्त्रे धारण केली. गळ्यात हार, हातात धनुष्यबाण, डोक्याला केवड्याचे फूल, सर्वांगास कमळे, मस्तकावर मुकुट, डोळ्यात काजळ व विडा खाऊन रंगविलेले तोंड, अशा रूपात तिने महादेवांसमोर नृत्य केले. त्यावेळी महादेवांनी प्रसन्न होऊन तिला वर मागण्यास सागितले, तेव्हा तुम्ही सदैव माझ्या सोबत राहा, असा वर तिने मागितल्यावर दोघे याच वनात १०० वर्षे राहिले. एकदा दृष्ट शक्तींनी पार्वतीला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देवी मंदिराच्या छतावर बसली ती कायमचीच.
राज्यात कोल्हापूरच्या अंबाबाईनंतर कांबीच्या महालक्ष्मीची महती सांगितली जाते. हे गाव अहिल्यानगर, बीड, जालना व औरंगाबाद या चार जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीतील हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात
एक सर्पशिळा आहे. तसेच देवकोष्टकांत भैरव व गणेश यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी वितानावर (छतावर) देवीची मूर्ती आहे. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी १.५ फूट रुंद व २ फूट लांबीची ही मूर्ती आहे. देवीला वस्त्रालंकार परिधान करण्याची पद्धतही येथे विशेष आहे.
दररोज सकाळी देवीला साडी-चोळी परिधान करून ती पातळ धाग्याने विशिष्ट पद्धतीने बांधली जाते. पुष्पमाळा व अलंकारही त्याच पद्धतीने परिधान केले जातात. या मूर्तीच्या बाजूने छतावर कोरीव नक्षीकाम करण्यात आलेले आहे. या ठिकाणी एका खांबावर मंदिर निर्मितीसंदर्भात यादव काळातील राजाची माहिती कोरलेली आहे. देवी-देवतांची अनेक शिल्पेही येथे आहेत. गाभाऱ्यात प्राचीन शिवपिंडी असून हे मंदिर म्हणजे शिव व पार्वतीचे कुटुंब असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
हे स्थान जागृत असून देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवरात्रोत्सव हा येथील प्रमुख उत्सव. या ९ दिवसांत मंदिर परिसरात शेकडो भाविक घटी बसतात. दररोज पहाटेपासून देवीचा अभिषेक, पूजा, आरती याशिवाय भजन व कीर्तन येथे होत असते. उत्सव काळात येथे नवस फेडण्यासाठी अनेक भाविक येतात. त्यामुळे या काळात परिसराला जत्रेचे स्वरूप येते. महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवारीही येथे भाविकांची गर्दी असते. मंदिरात पहाटे ५ वाजल्यापासून रात्री ९ पर्यंत भाविकांना दर्शन घेता येते.