पयोष्णी (पूर्णा) नदीची उपनदी असणाऱ्या बोर्डी नदीच्या काठावर वसलेल्या सुटाळा (बुद्रुक) येथील महादेवाचे प्राचीन मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. येथील जागृत शिवलिंगावर हजारो भाविकांची अढळ श्रद्धा आहे. चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी येथे हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडणारा शिव-पार्वती विवाह सोहळा वैशिष्ट्यपूर्ण असतो. या गावात महादेवाच्या मंदिराच्या शिखरावरील चांदीच्या कळसापेक्षा उंच घर न बांधण्याची एक अनोखी प्रथा आहे. कळसापेक्षा उंच घर बांधल्यास संबंधित कुटुंबाला महादेवाच्या कोपाला सामोरे जावे लागते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
भारतीय ग्रामरचनेत मंदिराला गावाचे हृदय आणि आध्यात्मिक ऊर्जेचे उगमस्थान मानले जाते. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये, मंदिराच्या कळसापेक्षा उंच घर न बांधण्याची परंपरा आजही निष्ठेने जपली जाते. या प्रथेमध्ये आध्यात्मिक, सामाजिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोन दडलेला आहे. आध्यात्मिक भावनेनुसार, ग्रामदैवत हे गावाचे ‘राजा’ आणि रक्षणकर्ता मानले जाते. ज्याप्रमाणे राजाच्या सिंहासनापेक्षा प्रजेचे आसन उंच असणे अयोग्य मानले जाते, तसेच ईश्वराच्या शिखरापेक्षा मानवाचे निवासस्थान उंच नसावे, ही श्रद्धा या परंपरेचा पाया आहे.
ही मर्यादा अहंकाराचा त्याग करून देवाप्रती नम्रता आणि शरणागती व्यक्त करण्याचे प्रतीक आहे. दररोज सकाळी उंच कळसाचे दर्शन घेतल्याने मानवाला आपल्या मर्यादांची जाणीव होते, ज्यामुळे समाजात सौहार्द टिकून राहण्यास मदत होते.
वास्तुशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास, मंदिराचा कळस हा वैश्विक ऊर्जा आकर्षित करणारा मुख्य स्रोत असतो. कळसाची उंची सर्वोच्च असल्यास ही सात्त्विक ऊर्जा कोणत्याही अडथळ्याशिवाय संपूर्ण गावात प्रवाहित होते. जर घरांची उंची कळसापेक्षा अधिक झाली, तर या सकारात्मक लहरींच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊन गावाच्या ऊर्जेवर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी लोकधारणा आहे. सामाजिक दृष्टिकोनातून, ही पद्धत गावात समता टिकवून ठेवण्यास आणि प्रत्येक घराला नैसर्गिक स्रोत समान मिळण्यास मदत करते. अशा प्रकारे, ही परंपरा ईश्वराचे श्रेष्ठत्व, सामाजिक सुसंवाद आणि निसर्गाचे संतुलन साधणारी एक महत्त्वपूर्ण जीवनशैली ठरली आहे.
खामगावपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर बोर्डी नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर केव्हापासून अस्तित्वात आहे, याबाबतचा लेखी इतिहास उपलब्ध नाही. मात्र,
प्राचीन काळापासूनच येथे शिवलिंग असल्याचे सांगितले जाते. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. मंदिराभोवती असलेल्या तटबंदीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. पेव्हर ब्लॉकची फरसबंदी असलेल्या या प्रांगणात उजवीकडे पार्वतीमातेचे मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला गणेशाचे मंदिर आहे आणि त्याला लागूनच डावीकडे दगडी दीपस्तंभ आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची मूळ संरचना आहे. काही वर्षांपूर्वी सभामंडपाबाहेरील बाजूला मोठा मंडप बांधण्यात आला आहे. सभामंडपाला कमानीच्या आकाराचे छोटे प्रवेशद्वार आहे. सभामंडपात दगडी स्तंभ आहेत तसेच येथील भिंतींवर देवकोष्टके आहेत. सभामंडपात दगडी स्तंभांच्या मध्यभागी एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती विराजमान आहे; त्यावर पंचधातूचा पत्रा बसवण्यात आला आहे. गर्भगृहात मोठ्या शाळुंकेमध्ये महादेवाचे शिवलिंग आहे. शाळुंकेवरील चांदीच्या पत्र्यावर सुरेख नक्षीकाम आहे. गर्भगृहाच्या छतावर चारही बाजूंनी बाशिंगी कठडा आहे. या छतावर चार कोपऱ्यांत मेघडंबरी व मध्यभागी घुमटाकार शिखर आहे. या शिखरावर चांदीचा कळस आहे.
शेजारी असलेल्या पार्वती माता मंदिराच्या सभामंडपात प्राचीन नंदी व गर्भगृहात पार्वतीमातेचे प्रतीक असलेली पिंडी आहे.
येथे महाशिवरात्रीसह हिंदू धर्मातील विविध सण व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी येथे शिव-पार्वतीचा विवाहसोहळा विधिवत पार पडतो. या सोहळ्यानिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात येते. या सोहळ्यासाठी सकाळी सुटाळा खुर्द तसेच बुद्रुकमधील प्रत्येक घरातून रुखवत आणले जाते. त्यात ११ पापड, ११ पोळ्या, भजी, कुरड्या, वडे आदी पदार्थ तसेच मिष्टान्नांचा समावेश असतो. त्यानंतर हे रुखवत एकत्र केले जाते. दुपारी मानाच्या कावड यात्रांमधून पूर्णा नदीचे जल आणून शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो. त्यानंतर गावातून नवसाच्या काठ्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. अनेक भजनी मंडळे त्यात सहभागी होतात. त्यानंतर या काठ्या व दिवट्यांसह मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात येते. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मंदिरात महाआरती झाल्यावर विवाहसोहळ्याला सुरुवात होते. त्यासाठी मंदिर परिसरात जमलेल्या हजारो भाविकांना ज्वारीच्या अक्षता वाटण्यात येतात. मंगलाष्टकांच्या घोषात शिव-पार्वती विवाह संपन्न होतो. याप्रसंगी शाही ढोल-नगाऱ्यांचेही वादन करण्यात येते. विवाहसोहळा पार पडल्यानंतर मंदिरात भजन होते. विवाह सोहळ्यानंतर ग्रामस्थांनी आणलेल्या रुखवतापासून बनवण्यात आलेल्या महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. सुमारे १५ हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. या सोहळ्यानंतर पाच दिवस मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पाचव्या दिवशी मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. पंचक्रोशीतील हजारो भाविक या यात्रेदरम्यान शिवलिंगाचे दर्शन घेतात. या यात्रेनिमित्त गावातून महादेवाच्या पालखीची मिरवणूकही काढण्यात येते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शेकडो भाविक येथील शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून अभिषेक करतात. अधिक मासानिमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रम होतात. त्यात कीर्तन, अखंड हरिनाम सप्ताह आदींचा समावेश असतो.