लिंगेश्वर मंदिर,

लिंगदेव, ता. अकोले, जि. अहमदनगर

शहाजीराजे भोसले यांच्यासह इतिहासकाळापासून मराठ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या लिंगेश्वर महादेव मंदिरात सर्वप्रथम हिंदवी स्वराज्य स्थापनेचा संकल्प करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात लिंगदेव येथे शहाजीराजांनी केलेल्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नास यश आले नसले तरी छत्रपती शिवाजी महाराजांना या प्रयत्नातून प्रेरणा मिळाली ते हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात यशस्वी ठरले. सह्याद्रीच्या कुशीत उंच पर्वतरांगांच्या सानिध्यात मुळा नदीच्या तीरावर वसलेले लिंगेश्वर महादेवाचे हे ठिकाण हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

असे सांगितले जाते की ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या स्वयंभू लिंगेश्वराच्या दर्शनासाठी शहाजीराजे भोसले नेहमी येथे येत असत. जिजाऊ गर्भवती असताना पेमगिरी किल्ल्यावरून लिंगदेवमार्गे शिवनेरीकडे जाताना त्यांना प्रसूतीवेदना सुरू झाल्या. त्या वेळी शहाजीराजांनी जिजाऊंना शिवनेरीपर्यंत सुखरूप पोचू दे, अशी लिंगेश्वराला प्रार्थना केली होती. लिंगेश्वराच्या कृपेने जिजाऊ शिवनेरीवर सुखरूप पोहोचल्या तेथे शिवबांचा जन्म झाला.

लिंगेश्वर महादेवाचे मंदिर प्राचीन असून . . १७७५ ते १७९० या कालखंडात अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून येथे पिण्याच्या पाण्यासाठी बारवही बांधली, अशी नोंद आहे. मंदिर परिसर प्रशस्त असून मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एका चौथऱ्यावर पुरातन दगडी दीपमाळ आहे. जमिनीपासून चार ते पाच फूट उंचीवर हे मंदिर आहे. २०१८ मध्ये केलेल्या नूतनीकरणानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मुखमंडप, सभामंडप, गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मूळ मंदिरापुढे सभामंडप नंतर बांधल्याचे जाणवते. सभामंडपाच्या मध्यभागी शुभ्र नंदी असून त्यावर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर श्रीगणेश, तर खालच्या बाजूला कीर्तिमुखाचे शिल्प असून गर्भगृहात एका चौकोनी खोलगट भागातून शिवपिंडी वर आल्यासारखी भासते. याशिवाय श्रीगणेश, श्रीभैरवनाथ, राधाकृष्ण, रामलक्ष्मणसीता, हनुमंत विठ्ठलरुक्मिणी यांच्या संगमरवरी मू्र्ती येथे स्थापित केलेल्या आहेत. मंदिराच्या बाजूला श्रीदत्तांचे मंदिर आहे.

लिंगेश्वर देवस्थान हे जागृत नवसाला पावणारे असे स्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी येथे भरणारा यात्रोत्सव हा अकोले तालुक्यातील मोठा उत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी पहाटे लिंगेश्वराची महापूजा, मुकुट चढविणे, वस्रालंकार परिधान करणे, महाआरती, ऋतुमान उकलविधी, शोभायात्रा तसेच संगीत अश्वनृत्याचा कार्यक्रम पार पडतो. सायंकाळी संगीत आखाडीची सुरुवात होते. डफावर थाप पडताच तुतारीचा आवाज निनादतो. ‘मेहेरबान सलाम, बाजूसे बाजू, कदमसे कदम, सूत्रधाराची स्वारी आली. गलबला मत करोअसा आवाज आसमंतात निनादतो आणि सूत्रधाराच्या प्रवेशाने संगीत आखाडीचा प्रारंभ होतो. रात्रभर संगीत आखाडी चालते. सकाळी वाजता आखाडीचा समारोप होतो.

येथे होणारा संगीत आखाडी हा कार्यक्रम प्रसिद्ध असून त्यामध्ये रामायण, महाभारत, विष्णूपुराण यामधील दृश्ये पथनाट्याच्या स्वरूपात सादर केली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने सूत्रधार, विदूषक, गणपती, सरस्वती, राम अवतार, त्राटिकाशूर्पणखा वध, श्रीरामरावण युद्ध, सत्यवानसावित्री, अर्जुनकर्ण युद्ध, दुर्योधनभीम युद्ध, भस्मासुर, मोहिनीराज ही पात्रे विशेष प्रसिद्ध आहेतअनेक वर्षांपासून येथे हिंदूमुस्लिम गुण्यागोविंदाने राहतात. मुस्लिम तरुणांकडून संगीत आखाडीमध्ये अनेकदा श्रीरामांचे पात्र वठविण्यात आलेले आहे. याशिवाय येथील पीरबाबाच्या यात्रेत हिंदूधर्मीय उत्साहाने भाग घेतात. दुसऱ्या दिवशी कुस्ती स्पर्धांनी या यात्रेची सांगता होते. या स्पर्धेसाठी कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक अहमदनगर येथून नामवंत कुस्तीपटू हजेरी लावतात.

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे यात्रा भरते. या दिवशी सव्वा लाख बेलपत्रांनी लिंगेश्वर महादेवाची विधिवत पूजा केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशीही या परिसराला यात्रेचे स्वरूप आलेले असते. या संपूर्ण दिवसात आलेल्या भाविकांना महाप्रसाद देण्यात येतो. दुपारी ते या वेळेत पालखी प्रदक्षिणा मिरवणूक निघते, त्यामध्ये हजारो भाविक सहभागी होतात. राज्य सरकारच्या तीर्थक्षेत्राच्यादर्जाच्या यादीत या देवस्थानाचा समावेश झालेला आहे. (ज्या देवस्थानाच्या दर्शनासाठी वर्षातून एक लाखांहून अधिक चार लाखांपर्यंत भाविक येतात, अशा देवस्थानाला तीर्थक्षेत्राचादर्जा प्राप्त होतो.)

उपयुक्त माहिती:

  • अकोले शहरापासून १६ किमी, तर संगमनेरपासून ३४ किमी अंतरावर
  • अकोलेपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home