महाराष्ट्राचा इतिहास अनेक किल्ल्यांच्या अंगाखांद्यावर लिहिला गेला आहे. ‘स्वराज्याचे सार ते किल्ले’ या उक्तीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ल्यांची दुरुस्ती केली व नव्यानेही बांधले. या किल्ल्यांमुळे स्वराज्याचा विस्तार झाला. त्यांच्या भिंतींनी कित्येक मोहिमांची नियोजने, लढाया व राजवटीही पाहिल्या. यापैकी काही किल्ले विशिष्ट घटनांसाठी ओळखले जातात. तानाजी मालुसरे यांचे बलिदान म्हटले की सिंहगड आठवतो, अफजलखान वधासाठी प्रतापगड, मुरारबाजींच्या पराक्रमासाठी पुरंदर, त्याचप्रमाणे एक दुर्दैवी आणि कठोर प्रसंग एका किल्ल्याने पाहिला तो किल्ला म्हणजे बहादूरगड! या किल्ल्यावर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला होता.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे भीमा नदीच्या काठावर बहादूरगड किल्ला आहे. गावाच्या नावावरून त्याला ‘पेडगावचा किल्ला‘ असेही म्हटले जाते. छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने संगमेश्वर येथे पकडून या किल्ल्यात आणले होते. या ठिकाणी त्याने राजांचे प्रचंड हाल करून त्यांचे डोळे काढले व जीभ छाटली होती. तरीही राजांनी स्वाभिमान सोडला नाही. स्वराज्य अबाधित राखण्यासाठीचे राजांचे हे योगदान बहादूरगडाने अनुभवले आहे. राजांच्या या स्मृती जागविण्यासाठी अनेक शंभूप्रेमी या किल्ल्याला ‘धर्मवीरगड‘ असे संबोधतात.
बहादूरगड किल्ल्याची तटबंदी भीमा नदीला समांतर आहे. सध्या ती अनेक ठिकाणी ढासळली असली तरी या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील उत्कृष्ट स्थापत्य रचनेची सुरेख मंदिरे. या किल्ल्यावर लक्ष्मीनारायण, बालेश्वर, रामेश्वर आणि मल्लिकार्जुन अशी ४ प्राचीन मंदिरे आहेत. इतिहास संशोधकांच्या मते ही मंदिरे ५ व्या शतकातील चालुक्य शैलीतील असल्याने या राजवटीतील वास्तुस्थापत्याचा पगडा मंदिरांच्या बांधकामात दिसतो. यापैकी लक्ष्मीनारायण व बालेश्वर ही मंदिरे पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असून त्यांचे सौंदर्य जपण्याचे कार्य सध्या सरकारी पातळीवर सुरू आहे.
यातील लक्ष्मीनारायणाचे मंदिर त्यावरील शेकडो वैशिष्ट्यपूर्ण शिल्पांमुळे विशेष प्रसिद्ध आहे. या मंदिराला ‘चित्रमंदिर’ असे संबोधले जाते. मंदिराचे वेगळेपण म्हणजे त्याच्या अष्टदिशांवर त्या त्या दिशांच्या देवता कोरलेल्या आहेत. त्यानुसार पूर्वेस इंद्र, आग्नेयेस अग्नी, दक्षिणेस यम, नैऋत्येस निऋती, पश्चिमेला वरुण, वायव्येला वायू, उत्तरेला कुबेर आणि ईशान्य दिशेला ईशान या मूर्ती येथे आहेत. याशिवाय मंदिराच्या बाह्यभागावर नरसिंह अवतार, श्रीविष्णू, जटाधारी शंकर, बासरी वाजविणारा श्रीकृष्ण व राधा आणि सूर्यदेवता यांच्या मूर्ती आहेत. पारनेर तालुक्यातील पळशी येथील प्राचीन विठ्ठल मंदिरातही अशा प्रकारची सूर्यदेवतेची मूर्ती आहे. सूर्यदेवतेची अशी मूर्ती दुर्मिळ समजली जाते; परंतु अहमदनगर जिल्ह्यातील या दोन मंदिरांवर या मूर्ती पाहायला मिळतात. लक्ष्मीनारायण मंदिराच्या अग्नेय दिशेला इंद्रदेव, वराह अवतार अशी शिल्पे आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी सूरसुंदरी कोरल्या आहेत. त्यामध्ये वादक व शृंगार करीत असलेल्या सूरसुंदरीची शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मंदिराच्या सर्वात खालच्या स्तरावर हत्ती (गजस्तर) व त्याच्या वरील भागात घोडे (अश्वस्तर) कोरलेले आहेत. या स्तराजवळ वाली आणि सुग्रीव यांची संपूर्ण मंदिराभोवती एका रेषेत गोलाकार पद्धतीने चित्रलिपी चितारली आहे.
पश्चिमाभिमुख असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी पश्चिम, उत्तर आणि दक्षिणेकडे प्रवेशद्वारे आहेत. हवा खेळती राहावी व मंदिरात प्रकाश येण्यासाठी सभामंडपातील भिंतींना अखंड दगडात कोरलेली नक्षीदार जाळी लावलेली आहे. या जाळीमुळे ऐन उन्हाळ्यातही मंदिरात थंडावा जाणवतो. अशा प्रकारे दगडात कोरलेली जाळी अभावानेच पाहायला मिळते. सभामंडपातील प्रत्येक खांबावर खालपासून वरपर्यंत विविध शिल्पे कोरलेली आहेत. त्यामुळे प्रत्येक खांब दुर्मिळ कलाकुसरीचा नमुनाच भासतो. या खांबांच्या वरील बाजूस भारवाहक यक्ष कोरलेले आहेत. मंदिराच्या वितानावर (छत) चोचीत कमळ घेतलेल्या पक्ष्यांची अखंड माळ कोरलेली आहे. ही शिल्पकृती वैशिष्ट्यपूर्ण भासते.
सभामंडपातून गर्भगृहाकडे जाताना अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सनईवादक, ढोल वादक, सूरसुंदरी, पशू–पक्षी व वेलींची नक्षी कोरलेली आहे. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस गणेशपट्टी आहे. येथील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या प्रवेशद्वाराच्या खालील बाजूस जमिनीवर चक्क दगडी रांगोळी कोरलेली आहे. येथील गर्भगृह मोकळाच असून तेथे कोणतीही मूर्ती नाही.
दरवर्षी २१, २२ व २३ जून रोजी सूर्याची किरणे थेट या गाभाऱ्यात पडतात. हा किरणोत्सव पाहण्यासाठी अनेक भाविक व पर्यटक या ‘शिल्पमंदिरा’त येतात. गेल्या काही वर्षांपासून दिवाळीनिमित्त येथे भव्य दीपोत्सव साजरा करण्यात येतो. शिवदुर्ग संवर्धन व टीम धर्मवीरगड यांनी हा सोहळा सुरू केला आहे.
या किल्ल्यातील दुसरे प्रसिद्ध मंदिर म्हणजे बालेश्वर. लक्ष्मीनारायण मंदिराच्या समोर असलेले बालेश्वराचे मंदिरही उत्तम वास्तुशैलीचा नमुना आहे. सभामंडप, अंतराळ आणि गाभारा अशी रचना असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात मध्यभागी वर्तुळाकार दगड आहे. त्याला ‘नृत्यशिला’ असे म्हणतात. नृत्य करण्याकरिता या शिळेचा वापर पूर्वी कलाकार करीत असत. लक्ष्मीनारायण मंदिराप्रमाणेच येथील अंतराळातही दगडी रांगोळी कोरलेली दिसते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सूरसुंदरी, वादक, पशू–पक्षी यांची शिल्पे आहेत. येथील गाभाऱ्यात भलेमोठे दगडी शिवलिंग आहे. याशिवाय येथील रामेश्वर व मल्लिकार्जुन या प्राचीन मंदिरांची रचनाही काहीअंशी या दोन मंदिरांप्रमाणेच आहे.