आंध्र प्रदेशातील अहोबिळम ही विष्णूच्या नृसिंह स्वरूपाची अवतारभूमी मानली जाते. तेथे नृसिंहाची नऊ मंदिरे आहेत. येथील अहोबिळ मठ हे दक्षिण भारतीय वैष्णव संप्रदायातील वडकलै परंपरेतील अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. या मठाच्या भारतभर अनेक शाखा आहेत. मुंबईच्या चेंबूर या उपनगरातील शाखा ही त्यांपैकी एक महत्त्वाची शाखा मानली जाते. या मठातील लक्ष्मी-नृसिंहाचे मंदिर हे मुंबईतील असंख्य दाक्षिणात्य वैष्णवांच्या आस्थेचे एक प्रमुख केंद्र आहे. या देवतेचे दर्शन धैर्य व संरक्षण प्रदान करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
दक्षिण भारतीय वैष्णव परंपरेत एकूण १०८ ‘दिव्य देसम्’ मानली जातात. दिव्य म्हणजे पवित्र आणि देसम् म्हणजे स्थान होय. इ.स. ५०० ते ८५० या काळात बारा तमिळ वैष्णव संतकवी होऊन गेले. त्यांना ‘आळ्वार’ अर्थात पूर्ण समर्पित असे म्हणतात. या आळ्वार संतांनी भगवान विष्णूच्या पुण्यस्थळांची कीर्ती गायली. या पुण्यस्थळांना ‘दिव्य देसम्’ असे म्हटले जाते. त्यांनी अशी १०८ महाविष्णुस्थाने म्हणजेच ‘दिव्य देसम्’ निश्चित केली आहेत. यातील १०६ स्थळे पृथ्वीतलावर आहेत. क्षीरसागर आणि वैकुंठ ही उर्वरित दोन ‘दिव्य देसम्’ आहेत. या स्थळांचे भौगोलिक स्थानानुसार चोळ नाडू, चेरा किंवा मलै नाडू, नाडू नाडू, थोंडई किंवा पल्लव नाडू, पांड्य नाडू, वद नाडू आणि विन्नुलगा नाडू असे विभाग पडतात.
यातील विन्नुलगा नाडू म्हणजे क्षीरसागर आणि वैकुंठ होय. वद नाडू म्हणजे तमिळनाडू आणि केरळच्या बाहेर असलेली स्थळे होत. अन्य नाडू ही तमिळनाडू आणि केरळमधील स्थळे होत. या वद नाडूमध्ये अहोबिळम्चा समावेश होतो.
आंध्र प्रदेशातील नंद्याळ जिल्ह्यातील नल्लामल्ला पर्वतरांगेत वसलेल्या अहोबिळम्ला नव-नृसिंह क्षेत्र म्हणतात. येथील डोंगरावर अहोबिळ नृसिंहाचे मंदिर आहे. याचबरोबर डोंगराच्या वरच्या भागात भार्गव नृसिंह, योगानंद नृसिंह, क्रोध किंवा वराह नृसिंह, चतुर्वर्ण नृसिंह यांची मंदिरे आहेत. खालच्या भागात मालोला, पावन व कारंज नृसिंहांची मंदिरे आहेत. शिखरावर नृसिंहाचे सर्वात उग्र रूप मानल्या गेलेल्या ज्वालानृसिंहाचे मंदिर आहे. या सर्व मंदिरांना मिळून एक ‘दिव्य देसम्’ मानले जाते.
‘श्रीमद्भगवद्गीतेच्या’ दहाव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने “दैत्यांमध्ये मी प्रल्हाद आहे” (“प्रल्हादश्चास्मि दैत्यानां”) अशा शब्दांत भगवद्भक्ताचा गौरव केला आहे. त्या प्रल्हादाची पौराणिक कथा अहोबिळम् येथे घडली असल्याचे सांगण्यात येते. ‘भागवत पुराणातील’ कथेनुसार, हिरण्यकशिपू या दैत्यराजाच्या नाशाकरिता त्याचा पुत्र प्रल्हाद याच्या याचनेवरून भगवान विष्णूने नृसिंहावतार धारण केला. हिरण्यकश्यपू हा मूळ संस्कृत नावाचा अपभ्रंश आहे. ‘अग्निपुराणात’ या अवताराचे रूप पुढीलप्रमाणे वर्णिले आहे: “सिंहस्य कृत्वा वदनं मुरारिः सदा करालं च सुरक्तनेत्रम् । अर्ध वपुर्वै मनुजस्य कृत्वा ययौ सभां दैत्यपतेः पुरस्तात् ।।” याचा अर्थ विष्णूने सिंहाचे विक्राळ मुख धारण केले असा होतो.
त्याचे डोळे लालभडक होते. त्याचे अर्धे शरीर मानवाचे होते. असे रूप घेऊन तो दैत्यराजाच्या महालातील दरबारातील खांबातून प्रकट झाला आणि दिवस व रात्र नसलेल्या सायंसमयी त्याने हिरण्यकशिपूचा वध केला. हिरण्यकशिपूचा हा महाल अहोबिळम् येथे होता, असे सांगण्यात येते. येथील अहोबिळ नृसिंहाच्या मंदिरात एक खांब कोरलेला आहे. या खांबातून नृसिंह प्रकट झाला असे मानले जाते.
येथील अहोबिळ मठाची स्थापना चौदाव्या शतकात अथिवण षटकोप यतींद्र महादेशिक (अथिवण षटकोप जीयर) यांनी केली. त्यांचा जन्म इ.स. १३७९ मध्ये म्हैसूरजवळील तिरुनायाणपुरम् अर्थात मेलकोटे येथे झाला. संन्यासाश्रम स्वीकारण्यापूर्वी त्यांचे नाव किदंबी श्रीनिवासाचार्य असे होते. अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी वेदांतशास्त्रात असामान्य प्राविण्य मिळविले होते. रामानुजाचार्यांच्या विशिष्टाद्वैत वेदांताचे थोर अभ्यासक अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्याविषयी एक आख्यायिका सांगण्यात येते. त्यानुसार एके दिवशी त्यांना लक्ष्मी-नृसिंहाचा दृष्टान्त झाला. नृसिंहाने त्यांना अहोबिळम् येथे येथे येण्यास सांगितले. त्यानुसार तेथे गेल्यावर त्यांनी लक्ष्मीनृसिंहांच्या मूर्तीसमोर भक्तिभावाने प्रार्थना केली. प्रार्थना सुरू असतानाच त्यांच्या समोर एक वृद्ध संन्यासी प्रकटला. या दिव्य संन्यासाने किदंबी श्रीनिवासाचार्यांना संन्यासदीक्षा दिली आणि त्यांना षटकोप यतींद्र महादेशिक हे संन्यासनाम दिले. अथिवण षटकोप जीयर या नावाने ते वैष्णव जगतात प्रसिद्ध आहेत. वैष्णव संप्रदायातील उच्चपदस्थ संन्यासी किंवा आचार्यास ‘जीयर’ असे म्हणतात.
यानंतर त्यांनी सप्टेंबर १३९८ मध्ये येथे वैष्णव संप्रदायातील वडकलै परंपरेमधील मठाची औपचारिक स्थापना केली. ते मठाचे पहिले संन्यासी आचार्य म्हणजेच ‘अळगियसिंगर’ होत. या मठसंप्रदायाचे तत्त्वज्ञान विशिष्टाद्वैत सिद्धांतावर आधारित आहे. या संप्रदायाचे ‘उपनिषदे’, ‘ब्रह्मसूत्र’ आणि ‘भगवद्गीता’ हे तीन प्रमाणभूत ग्रंथ आहेत. या तिन्ही ग्रंथांना एकत्रितपणे ‘प्रस्थानत्रयी’ असे म्हटले जाते. भगवान श्रीनृसिंहाची भक्ती आणि पाञ्चरात्र आगमानुसार पूजा ही या मठाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
चेंबूर येथील लक्ष्मी-नृसिंह मंदिर व मठ ही याच अहोबिळ मठाची शाखा आहे. चेंबूर या ग्रामनामाची एक लोकप्रिय व्युत्पत्ती सांगण्यात येते. त्यानुसार या परिसरात मोठ्या प्रमाणावर चिंबोरी सापडत असत. त्यामुळे या परिसरास चिंबोरी असे नाव पडले. मात्र ब्रिटिशांना चिंबोरीचा उच्चार कठीण जात असल्याने ते त्यास चेंबूर असे म्हणू लागले. मुंबईचा आद्य राजा प्रताप बिंब याने इ.स. ११४२ मध्ये मुंबईतील माहिम येथे आपली राजधानी स्थापन केली थी. तसेच त्यानंतर इ.स. १२९५ मध्ये यादव राजा रामदेवराय यांचा पुत्र बिंबदेव यादव सत्तेवर आला. या राजांची हकीकत ‘महिकावतीची बखर’ या ग्रंथात दिली आहे. या ग्रंथात या गावाचा उल्लेख ‘चेंभूर’ असा आढळतो. त्यामुळे चिंबोरीवरून चेंबूर नाव पडल्याची व्युत्पत्ती निरर्थक ठरते. हे प्राचीन काळातील एक महत्त्वाचे गाव होते. येथील माहुली खाडीतून आंतरराष्ट्रीय व्यापार चालत असे, असे सांगितले जाते.
इसवी सनाच्या पहिल्या शतकातील ग्रीक-रोमन गणितज्ज्ञ व भूगोलतज्ज्ञ क्लॉडियस टॉलेमी याने उल्लेख केलेले ‘सिमुल्ला’ किंवा ‘टिमुल्ला’ म्हणजे चेंबूर होय, असे काही इतिहासअभ्यासकांचे मत आहे. इ. स. ११७० ते ११९७ या काळात उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार राजा अपरादित्य प्रथम याच्या काळातील शिलालेख येथे सापडले आहेत. या शिलालेखात देवस्थानासाठी चेंबूर नजीकच्या वडिवली गावातील एका बागेचा निश्चित महसूल राजाने लावून दिल्याची नोंद आहे. जानेवारी १८०५ मध्ये ब्रिटिश गव्हर्नर जोनाथन डंकन यांच्या कारकिर्दीत शीवचा पूल बांधण्यात आल्यानंतर हा भाग मुंबई बेटास रस्तेमार्गाने जोडला गेला. सन १८५३ मध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान रेल्वे वाहतूक सुरू झाली. त्यानंतर १९०६ मध्ये कुर्ला ते चेंबूर हा रेल्वेमार्ग सुरू करण्यात आला. कचरा वाहतुकीसाठी हा मार्ग उभारण्यात आला होता. चेंबूर, मानखुर्द, मंडाला आदी परिसरातील दलदलीच्या भागात या कचऱ्याचा भराव घालून येथे मोठ्या प्रमाणावर जमीन तयार करण्यात आली. ४ फेब्रुवारी १९२४ रोजी हा मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी खुला झाला. त्या काळात चेंबूर हे निसर्गसंपन्न आणि शांत गाव होते, असे सांगितले जाते. दाट जंगलांनी व्यापलेल्या टेकड्या, ओढे, भातशेती, हिरवीगार कुरणे आणि अरबी समुद्राच्या खाड्यांनी वेढलेला हा परिसर रमणीय होता.
येथील लोकसंख्या वाढावी याकरिता सरकारने १९२५ ते १९४० या काळात नागरिकांना अत्यंत कमी दरात येथील भूखंडांचे वाटप केले होते. १९४५ मध्ये चेंबूरचा बृहन्मुंबईत समावेश झाला. त्या काळात येथे फाळणीतून विस्थापित झालेल्या निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी छावण्या उभारण्यात आल्या. आज चेंबूर हे एक आधुनिक परंतु शांत असे उपनगर आहे.
येथे अहोबिळ मठाचे ४४ वे अळगियरसिंगर श्री वेदान्त महादेशिक यांच्या उपस्थितीत २५ ऑगस्ट १९६८ रोजी या मंदिराचे संप्रोक्षणम् अर्थात महाकुंभाभिषेक झाले. यानंतर ११ जुलै २००५ मध्ये ४५ वे अळगियसिंगर श्री नारायण यतीन्द्र महादेशिक यांच्या उपस्थितीत मंदिराचे दुसरे संप्रोक्षणम् पार पडले. यानंतर ९ फेब्रुवारी २००७ रोजी महालक्ष्मीस म्हणजेच ‘तायार’ देवतेला समर्पित असलेल्या स्वतंत्र सन्निधीचा अर्थात देवालयाचा, ९ नोव्हेंबर २०१४ रोजी धन्वंतरी सन्निधीचा आणि ३१ ऑगस्ट २०२० रोजी मुख्य गर्भगृहाचा पाचवा महासंप्रोक्षणम् पार पडला.
या मंदिराची रचना द्रविड स्थापत्यशैलीतील आहे. राजगोपुरम्, सभामंडप, अंतराळ आणि मुख्य गर्भगृह व महामंडपात विविध सन्निधी अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराचे राजगोपुरम पंचतल स्वरूपाचे आहे. त्यावर लक्ष्मी-नृसिंह, अहोबिळ मठाचे आचार्य, विष्णू आणि गरुड यांची शिल्पे आहेत. हे गोपुरम ऊर्ध्वपुण्ड्र म्हणजेच ‘तिरुनामम्’, शंख आणि चक्र अशा वैष्णव चिन्हांनी सुशोभित केलेले आहे. मंदिरातही ठिकठिकाणी ही वैष्णव चिन्हे कोरलेली आहेत. मंदिराच्या गोपुरात सुवर्णरंगी धातूपत्र्याने मढवलेला पाच पायऱ्यांचा सोपान आहे. या सोपानाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या सुशोभित सन्निधीमध्ये गरुड व हनुमान या देवता प्रतिष्ठापित आहेत. मंदिराच्या सभामंडपास सुवर्णमंडित मुखद्वार म्हणजेच ‘बंगारू वाकिली’ आहे. त्यावर अलंकृत नक्षीकाम आहे. द्वारचौकटीच्या वरच्या भागातही गरुड, तसेच ‘तिरुनामम्’, शंख व चक्र अशा शिल्पाकृती आहेत. संगमरवरी फरसबंदी केलेल्या या सभामंडपाचे छत समतल आहे आणि त्यावर शेषशायी विष्णूची मोठी प्रतिमा रंगवलेली आहे. सभामंडपात समोरच मंदिराचे मुख्य गर्भगृह आहे.
द्रविड स्थापत्य शैलीतील या गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर जय-विजय या वैष्णव द्वारपालांची सुबक शिल्पे आहेत. गर्भगृहास कोरीव नक्षीकाम केलेला सोनेरी पत्रा जडवलेला दरवाजा आहे. त्याच्या द्वारचौकटीस, तसेच येथील दोन पायऱ्यांसही सोनेरी पत्रा जडवलेला आहे. द्वारचौकटीच्या वरच्या भागात छताजवळ पुष्प, शंख आणि विष्णूच्या कमळासारख्या चरणांचे प्रतीक असलेल्या ऊर्ध्वपुंड्र गंध या प्रतीकांची शिल्पे आहेत. गर्भगृहात उंच वेदीवर सोनेरी प्रभावळीमध्ये तीन विग्रह म्हणजेच मूर्ती आहेत. यात मध्यभागी येथील प्रधान देवता असलेल्या लक्ष्मी-नृसिंह यांची मूर्ती आहे. सिंहमुखी, चतुर्भुज, मांडीवर विराजमान श्रीमहालक्ष्मी, हातात शंख आणि चक्र, तसेच अभय आणि वरद मुद्रा अशा स्वरूपात येथे भगवान नृसिंह विराजमान आहेत. मंदिरातील या प्रधान मूर्तीच्या डावीकडे लक्ष्मी-हयग्रीव यांची मूर्ती आहे. लक्ष्मी-हयग्रीव हे ज्ञान, विद्या आणि वेदांचे अधिष्ठाता दैवत. अश्वाचे मुख, चतुर्भुज स्वरूप, हातात ग्रंथ आणि ज्ञानमुद्रा अशा स्वरूपात येथे हयग्रीव विराजमान आहे. उजवीकडे लक्ष्मी-नारायण यांची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. या सर्व मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेल्या आहेत. मूर्तींना वस्त्रालंकार व पुष्पमालांनी शृंगारलेले आहे. या मूर्तींना सुवर्णकवचाने अलंकृत केले आहे.
यातील नारायण, हयग्रीव आणि नृसिंह या मूर्तींच्या वर शेषनारायणाने छत्र धरलेले आहे. या वेदीच्या समोर धातूच्या उंच चौरंगावर पंचधातूच्या प्रल्हादवरद, श्रीदेवी, भूदेवी, आंडाळ, आचार्य व उत्सवमूर्ती प्रतिष्ठापित आहेत.
या गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवरील देवकोष्टकांत म्हणजेच उपसन्निधीमध्ये गणेश, तिरुमलाचा श्रीनिवास, ज्वालानृसिंह, गुरुवायुरप्पन, तसेच सूर्यनारायण यांच्या मूर्ती विराजमान आहेत. गर्भगृहाच्या प्रदक्षिणा मार्गावर मागच्या बाजूस धन्वंतरी या देवतेस समर्पित असलेली सुवर्णरंगी पत्र्याने मढवलेली सन्निधी आहे. त्यात उंच वेदीवर सुवर्णमखरामध्ये धन्वंतरीची वरदमुद्रेतील काळ्या पाषाणातील मूर्ती विराजमान आहे. याचप्रमाणे येथे अन्नपूर्णा मातेचीही सन्निधी आहे. त्यात उंच वेदीवरील छोट्या देवळीत अन्नपूर्णामातेची वस्त्रालंकारांनी शृंगारलेली मूर्ती विराजमान आहे. वैष्णव मंदिरांत विष्णुनारायणाएवढेच महत्त्व ‘तायार’ म्हणजेच महालक्ष्मीला दिले जाते. या मंदिराच्या सभामंडपात उजवीकडे महालक्ष्मीचे स्वतंत्र देवालय आहे. येथे कमलपीठावर महालक्ष्मीची म्हणजेच ‘तायार’ची मूर्ती, तसेच चेंचूलक्ष्मीची उत्सवमूर्ती विराजमान आहे. चेंचूलक्ष्मी ही नृसिंहाची पत्नी मानली जाते. पौराणिक आख्यायिकेनुसार, नृसिंहाने हिरण्यकशिपुचा वध केल्यानंतर आपले उग्र रूप शांत करण्यासाठी अहोबिळम् येथील चेंचू जमातीमधील एका कन्येशी विवाह केला होता. तीच ही चेंचूलक्ष्मी होय. आंध्र प्रदेशातील चेंचू जमातीचे लोक आजही नृसिंहास आपला जावई मानतात. अहोबिळम् येथील एका मंदिरातील मुख्य स्तंभावर या विवाहाचा प्रसंग कोरलेला आहे.
या मंदिरात सोमवार ते गुरुवार या काळात सकाळी ६ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत भाविक देवदर्शनाचा लाभ घेऊ शकतात. तसेच, शुक्रवार ते रविवार या काळात सकाळी ६ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ अशी दर्शनाची वेळ असते. या मंदिरातील सर्व पूजा पाञ्चरात्र आगम पद्धतीनुसार केल्या जातात. येथे नित्य तिरुवाराधनम्, वेदपारायण, दिव्यप्रबंध पारायण, स्वाती नक्षत्रात ज्वाला नृसिंह सन्निधीत स्वाती होमम्, श्रीसूक्त होमम्, प्रत्येक शुक्रवारी चेंचुलक्ष्मी तायार डोलोत्सव, प्रत्येक रविवारी महालक्ष्मी सहस्रनाम अर्चना, एकादशीला अचित्पारायण आणि प्रत्येक द्वादशीला अन्नदान म्हणजेच द्वादशी पारण असे कार्यक्रम होतात. याचप्रमाणे येथे नृसिंह जयंती, वैकुंठ एकादशी, ब्रह्मोत्सव आणि विविध आचार्यांच्या जयंती उत्साहात व मठाच्या धार्मिक परंपरेनुसार साजऱ्या केल्या जातात.