अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात अहमदनगर–मनमाड मार्गावर अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या तीरावर वसलेले कोल्हार हे गाव येथील प्राचीन कोल्हाळेश्वर मंदिर, विठ्ठल–रुख्मिणी मंदिर, हनुमान मंदिर व भगवती माता मंदिर यामुळे प्रसिद्ध आहे. कोल्हाळेश्वर मंदिरावरून या गावाचे कोल्हार असे नामकरण झाले आहे. असे सांगितले जाते की वनवासात असताना श्रीरामांनी स्वतःच्या हाताने येथे वालुकामय शिवलिंगाची स्थापना केली होती. कोल्हाळेश्वर मंदिर प्राचीन असून त्याच्या कळसाची उंची ९० फूट आहे.
कोल्हार गावाची आख्यायिका अशी की समुद्रमंथनातून मिळालेले अमृत देवांना वाटप झाले ते ठिकाण होते येथून जवळ असलेले नेवासे. या अमृत वाटपावरून दानवांनी प्रचंड कोलाहल माजविला होता. त्यावरून या गावाला ‘कोलाहल–कोल्हाळ–कोल्हार’ असे नाव प्राप्त झाले. तो कोलाहाल शमविण्यासाठी महादेवांनी येथे प्रकट होऊन भगवती देवीला सर्व राक्षसांचा संहार करण्यास सांगितले. तेव्हापासून हे स्थान कोल्हाळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. दुसऱ्या आख्यायिकेनुसार, वनवासकाळात श्रीराम, लक्ष्मण व सीता यांनी प्रवरा नदीच्या काठावर मुक्काम केला. त्यावेळी नित्यपूजेसाठी श्रीरामांनी नदीतील वाळूपासून येथे एक शिवपिंडी स्थापन करून पूजा–अर्चा केली. यावेळी महादेव प्रकट होऊन त्यांनी मी येथे वास्तव्य करेन, असे श्रीरामांना सांगितले. तेव्हापासून या मंदिराला कोल्हाळेश्वर नाव पडले व या मंदिरावरून गावास कोल्हार नाव पडले असावे. याच ठिकाणी भगवती मातेने श्रीरामांना दृष्टांत दिला व दुष्टांचा नाश करण्यासाठी आशीर्वाद दिला. काही ग्रंथांमधील उल्लेखानुसार संत ज्ञानेश्वरादी भावंडांनी नेवासा ते आळंदी या प्रवासात कोल्हार येथे मुक्काम केला होता व येथून त्यांनी पुढे प्रस्थान केले.
प्रवरा नदीच्या तीरावर असलेल्या कोल्हाळेश्वराचे हेमाडपंती रचनेचे हे मंदिर भव्यदिव्य आहे. हे मूळ मंदिर १६व्या शतकातील असून २०१६ ते २०२० या काळात केलेल्या नूतनीकरणानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराची प्रतिकृती असलेल्या या मंदिराचा परिसर प्रशस्त आहे. मंदिर परिसराला तटभिंती असून त्याच्या बाहेर एका मोठ्या चौथऱ्यावर शनिदेवांचे स्थान आहे. तेथून १५–२० पायऱ्या चढून तटबंदीच्या कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. हा परिसर प्रशस्त असून मुख्य मंदिरासह येथे सहा दिशांना आणखी सहा मंदिरे आहेत. त्यामध्ये गणपती, श्रीदत्त, केशव–गोविंद (चंदनाच्या लाकडात साकारलेले स्तंभरूपी शिवलिंग), राधा–कृष्ण, पार्वती देवी व रामेश्वर या मंदिरांचा समावेश आहे. नंदीमंडप, सभामंडप व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर समोर नंदीची मोठी दगडी मूर्ती आहे. त्यावरील कलाकुसर वैशिष्ट्यूर्ण आहे. असे सांगितले जाते की या नंदीच्या मागच्या बाजूला भुयार असून ते गावातील भगवती देवीच्या मंदिरापर्यंत जाते. भुयाराचे पहिले द्वार महादेव मंदिराच्या पिंडीखाली आहे. सभामंडप प्रशस्त असून त्यापुढे गर्भगृहात महादेवांची प्राचीन वालुकामय पिंडी आहे. गर्भगृहातून बाहेर जाण्यासाठी एक लहानसा दरवाजा आहे. तेथून थेट मंदिराबाहेर पडता येते. मंदिराच्या बाह्य भिंतींवर वैशिष्ट्यपूर्ण कोरीवकाम असून अनेक शिल्पे कोरलेली आहेत.
श्रावणी सोमवारी व महाशिवरात्रीच्या दिवशी कोल्हाळेश्वर परिसराला जत्रेचे स्वरूप आलेले असते. यावेळी हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. हे जागृत देवस्थान असून येथे १६ सोमवारचे व्रत केल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. सकाळी ५ ते रात्री १० पर्यंत भाविकांना या मंदिरातील कोल्हाळेश्वराचे दर्शन घेता येते. मुंबई येथील विक्रोळी कन्नमवार नगरमधील साईनाथ मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे २०२२ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार येथील या कोल्हाळेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती व त्यावेळी या मंडळाला मुंबई पोलीस खात्याकडून पुरस्कार प्राप्त झाला होता.