कोकमठाण शिवमंदिर,

कोकमठाण, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव हे तालुक्याचे शहर प्राचीन मंदिरांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. गोदावरी नदीच्या तीरावर असलेल्या या शहरात अनेक वर्षांपूर्वीचा सांस्कृतिक व धार्मिक वारसा येथील मंदिरांच्या रूपाने पाहायला मिळतो. या पंक्तीतील १३ व्या शतकातील कोकमठाण येथील शिवमंदिर निसर्गसमृद्ध परिसरात स्थित आहे. हेमाडपंती शैलीतील या मंदिराची बाह्यरचना आणि आतील भिंती कलाकुसरींनी भरलेल्या आहेत. या स्थानाबाबत असे सांगितले जाते की महादेव व विष्णू यांची येथे भेट झाली होती. त्यामुळे ‘हरिहरेश्वर’ म्हणूनही हे मंदिर प्रसिद्ध आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर व परिसरात लहान-मोठी अशी सुमारे २०० मंदिरे आहेत. शुक्राचार्य मंदिर, संजीवनी पार, कचेश्वर मंदिर, साईबाबा तपोभूमी, स्वामी जनार्दन महाराज (मौनगिरी), जंगलीदास महाराज, उपासनी महाराज, विभांडक ऋषी आश्रम, श्रृंगेश्वर मंदिर, महानुभव आश्रम, पुणतांबा येथील चांगदेव महाराज समाधी, अशी महत्त्वाची धार्मिक स्थाने येथे आहेत. याशिवाय संत चांगदेव महाराज समाधी सोहळ्यासाठी जात असताना संत निवृत्तीनाथ व संत मुक्ताई यांनी या परिसरात एक महिना वास्तव्य केले होते, असा उल्लेख ‘नामदेव गाथा’ व ‘चांगदेव समाधी’ चरित्रात आहे.

कोकमठाण शिवमंदिर हे केंद्र शासनाने संरक्षित वास्तू म्हणून घोषित केले आहे. गोदावरीच्या तीराला लागून असलेल्या मंदिराच्या प्रशस्त आवाराभोवती तटबंदी व तारेचे कुंपण आहे. मंदिराच्या पायापासून शिखरापर्यंतच्या दगडांना खुंट्या आणि खाचा पाडून ते घट्ट बसतील, अशी रचना केलेली आहे. एकमेकांमध्ये गुंफल्यामुळे ते एकसंध दिसतात. हेमाडपंती मंदिराचे बांधकाम या पद्धतीने केलेले असते.

पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराची मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी रचना आहे. उंच जगतीवर (चौथरा, पाया) मंदिर स्थित आहे. ८ ते १० पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश होतो. तेथे नंदीची मूर्ती आहे. मुखमंडपातील खांबांवर व सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर अनेक शिल्पे कोरलेली दिसतात. सभामंडपामधील प्रत्येक खांब हा नक्षीकामांनी अक्षरशः सजला आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे सभामंडपाच्या वितानावर (छत) असलेले दगडी झुंबर. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर केलेले हे झुंबर या मंदिराचे आकर्षण आहे. अशा प्रकारचे दगडी झुंबर हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील टाहाकारी येथील जगदंबेच्या मंदिरातही पाहायला मिळते. गाभाऱ्याच्या ललाटबिंबात (दाराच्या चौकटीच्या वरच्या आडव्या पट्टीच्या मधोमध असलेली मूर्ती वा शिल्प) गरूड आहे. गाभाऱ्यात शिवपिंडी असून त्याच्या मागे विष्णूची मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या वितानावर नृत्य करणाऱ्या आणि वाद्य वाजवणाऱ्या यक्ष व गंधर्वांची शिल्पे आहेत. ललाटबिंबावर गरूड शिल्प व गाभाऱ्यात असलेली विष्णू्ची मूर्ती यामुळे हे मूळचे विष्णूमंदिर असावे, अशी शक्यता वर्तविली जाते.

मंदिराचे शिखर विटांचे असून बारीक नक्षीकाम केलेल्या छोट्या शिखरांपासून ते बनलेले आहे. मुख्य शिखरावर शिवलिंग आणि विष्णू यांचे शिल्प आहेत. त्यासोबत अनेक सुरसुंदरी, वाद्य वाजवताना यक्ष-गंधर्व, अष्टदिक्पाल (आठ दिशांचे पालन करणारे देव) आणि अनेक देवी-देवतांची शिल्पे आहेत.

महाशिवरात्रीला येथे मुख्य उत्सव असतो. यादिवशी मंदिर व परिसराची सजावट केली जाते. मंदिरावर आकर्षक रोषणाई असते. यावेळी महाअभिषेक, महाआरती आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हजारो भाविक यादिवशी येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे या परिसराला जत्रेचे स्वरूप आलेले असते. श्रावणी सोमवारीही भाविकांची येथे गर्दी असते. सकाळी ६ ते सायंकाळी ७ या वेळेत भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येते. दररोज सकाळी ९ वाजता आरती होते. कोकमठाण येथे गोदावरी तीरावर असलेले हे सुंदर मंदिर कोपरगावचे वैभव समजले जाते.

उपयुक्त माहिती:

  • कोपरगावपासून ८ किमी, तर अहमदनगरपासून ९९ किमी अंतरावर
  • कोपरगावातून येण्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास व न्याहरीची सुविधा उपलब्ध
Back To Home