खंडोबा मंदिर, शेगुड,

ता. कर्जत, जि. अहिल्यानगर

महाराष्ट्रातील खंडोबाच्या महत्त्वाच्या १२ स्थानांपैकी जेजुरीनंतर कर्जत तालुक्यातील शेगुड हे स्थान विशेष महत्त्वाचे मानले जाते. शेगुड येथून खंडोबा जेजुरीला गेले, अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथील खंडोबा गादीवर झोपतात, घोडा वापरतात म्हणून शेगुडमधील ग्रामस्थ झोपण्यासाठी गादीचा वापर करीत नाहीत, तसेच कोणत्याही प्रसंगी घोडा वापरत नाहीत. याशिवाय हे खंडोबा मंदिर दुमजली आहे, त्यासाठी या मंदिरापेक्षा जास्त उंचीचे (दुमजली) घर गावात बांधले जात नाही.

या मंदिराची आख्यायिका अशी की शेगुड परिसरात पूर्वी घनदाट जंगल होते. या जंगलातील एका मोठ्या चंदनाच्या खोडात माझे वास्तव्य आहे, असा स्वप्नदृष्टांत खंडोबाने येथून जवळच असणाऱ्या म्हाळुंगे गावातील एका भक्ताला दिला. त्यानुसार त्या खोडात पाहिले असता तेथे खंडोबांची मूर्ती सापडली. या भक्ताने तेथेच मूर्तीची पूजा-अर्चा करून छोटेसे मंदिर बांधले. त्यानंतर गावकऱ्यांनी त्या ठिकाणी मोठे मंदिर बांधले, ते ठिकाण म्हणजे आजचे शेगुड येथील खंडोबा मंदिर होय.

या मंदिराभोवती भक्कम व उंच दगडी तटबंदी आहे. या तटबंदीच्या चारही दिशांना प्रवेशद्वारे असून दक्षिण व उत्तरेकडील दारे तुलनेने लहान आणि पूर्व व पश्चिमेकडील प्रवेशद्वारे मोठी आहेत. पूर्वेकडील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या वर नगारखाना असून तेथे जाण्यासाठी पूर्व प्रवेशद्वाराजवळून पायरी मार्ग आहे. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस १७७३ सालातील शिलालेख असून त्यावर मल्हारी शंकर, रायाजी महिपत, विठ्ठल महिपत पुंडे अशी नावे आहेत. त्यांनी या तटबंदीचे काम केले असावे, असे सांगितले जाते. तटबंदीच्या आतील बाजूस चारही बाजूंनी ओवऱ्या आहेत. मंदिर प्रांगणात डाव्या बाजूला वैशिष्ट्यपूर्ण दगडी बारव आहे. याला ‘तीर्थाची विहीर’ असेही म्हटले जाते. त्यात उतरण्यासाठी पायऱ्या असून येथील पाणी केवळ देवाच्या पूजेसाठी वापरले जाते. मुख्य मंदिरासमोर दोन उंच दीपमाळा आहेत. उत्सवाच्या वेळी त्या प्रज्वलित केल्या जातात.

मुख्य मंदिरासमोर नंदीमंडपाजवळील फरशीवर एक पुरुष प्रतिमा कोरलेली दिसते. असे सांगितले जाते की चर्मकार समाजातील एका व्यक्तीची ती प्रतिमा आहे. मंदिराचे जेव्हा बांधकाम करण्यात येत होते तेव्हा कळस स्थिर राहत नव्हता. यासाठी या व्यक्तीने आपल्या पोटातील आतडी बाहेर काढून कळसाला बांधल्यानंतर तो स्थिर झाला.

सभामंडप व गाभारा असे मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपातून काहीसे खाली उतरून गाभाऱ्यात जावे लागते. या गाभाऱ्यात खालील बाजूस खंडोबा व म्हाळसा यांची लिंगे आहेत, तर चौथऱ्यावर खंडोबा, म्हाळसा व बाणाई यांच्या बैठ्या मूर्ती आहेत. या मंदिराच्या कळसावर नवदुर्गा व नवनाथांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.

मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस मंदिरात घटस्थापना करण्यात येते. या दिवसापासून खंडोबाचा नवरात्रोत्सव सुरू होतो. चंपाषष्ठीला (मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी) मणी व मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना भयमुक्त केले होते, या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. या देवाचा लाकडी घोडा भाविकांना दर्शनासाठी मंदिराबाहेर काढला जातो. या दिवशी खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह सोहळा पार पडतो. मार्गशीर्ष पौर्णिमेस रात्री देवाची वरात (छबिना) निघते. त्यात देवाचा लाकडी घोडा खांद्यावर घेऊन ढोल-ताशा आणि हलगीच्या निनादावर भाविक नृत्य करतात. रात्री फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. यावेळी भाविकांकडून मोठ्या प्रमाणात भंडारा उधळण्यात येतो. त्यामुळे मंदिर परिसर व गावातील पालखीमार्ग पिवळ्या रंगाने न्हाऊन निघतो. ही वरात रात्रभर चालते व पहाटे पुन्हा मंदिरात येते. दुसऱ्या दिवशी राज्यातील नामवंत मल्लांचा कुस्तीचा फड रंगतो. त्यानंतर २ दिवसांच्या या यात्रेची सांगता होते. दररोज सकाळी ६ वाजता आरती होते. सकाळी ६ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत भाविकांना खंडोबाचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • कर्जतपासून १५, तर अहिल्यानगरपासून ८५ किमी अंतरावर
  • कर्जतपासून येथे येण्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home