अहमदनगर जिल्ह्यात शिर्डीपासून जवळ असलेल्या वाकडी या गावाला येथील खंडोबाच्या मंदिरामुळे ‘खंडोबाची वाकडी’ म्हणून ओळखले जाते. जेजुरीहून खंडोबा बाणाईला आणण्यासाठी चंदनपुरी येथे जात असताना त्यांनी येथे मुक्काम केला म्हणून हे स्थान ‘प्रति जेजुरी’ म्हणूनही परिचित आहे. वांगीसट म्हणजेच चंपाषष्ठी (मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी) उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या दिवशी खंडोबा देवस्थानातून काढण्यात येणारी घोड्यांची मिरवणूक हे येथील प्रमुख आकर्षण असून यावेळी हजारो भाविक उपस्थित असतात.
खंडोबा मंदिराविषयी आख्यायिका अशी की महादेवांचे अवतार असलेल्या खंडोबांनी मणी व मल्ल या राक्षसांचा वध करून वास्तव्यासाठी जेजुरी हे ठाणे निवडले. काही दिवसांनी जेजुरी येथून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथून बाणाई देवीला आणण्यासाठी जात असताना त्यांनी वाकडी येथे मुक्काम केला. त्यांच्यासोबत त्यांचे हेगडी प्रधान व घोडे होते. येथे आल्यानंतर त्यांनी हेगडी प्रधानांना घोड्यांसह जेजुरीला परत जाण्यास सांगितले व खंडोबा स्वतः चंदनपुरीसाठी निघाले; परंतु आपले स्वामी एकटेच जात आहेत हे पाहून त्या स्वामिनिष्ठ घोड्यांना वाईट वाटत होते. त्यामुळे ते घोडे सतत मान वाकडी करून मागे पाहत होते. त्यामुळे या गावाचे नाव वाकडी असे पडले. वाकडी येथील हे देवस्थान जागृत असून जेजुरी येथे केलेल्या नवसाची या मंदिरात पूर्ती करता येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
शिर्डी येथून वाकडीकडे जाणाऱ्या मार्गावर खंडोबा मंदिर स्थित आहे. मंदिराचा परिसर प्रशस्त असून या संपूर्ण परिसरात फरसबंदी करण्यात आली आहे. या परिसरात अनेक पूजासाहित्याची दुकाने आहेत. मंदिराच्या प्रांगणात दीपमाळ असून त्याच्या बाजूला एक अखंड पेटती धुनी आहे. मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला एका मोठ्या चौथऱ्यावर खंडोबांचे वाहन असलेल्या घोड्याचे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे. सभामंडप व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. प्रशस्त सभामंडपात नंदी स्थानापन्न असून गाभाऱ्यात खंडोबा, म्हाळसादेवी व बाणाई देवी यांचा त्रिपिंडी स्वरूपातील तांदळा आहे. या तांदळ्याला खंडोबा व म्हाळसाई यांचे चांदीचे मुखवटे लावून त्यांना वस्त्रालंकार चढविले जातात. तांदळ्याच्या समोर घोड्यावर स्वार खंडोबा व म्हाळसाई दैत्य मणी व मल्ल यांचा वध करीत आहेत, अशा मूर्ती आहेत. या मूर्ती नंतर बसविल्याचे सांगण्यात येते. या मंदिर परिसरात बाणाई देवी व हेगडी प्रधान यांचे मंदिर आहे. मंदिराला लागूनच आणखी नवीन सभामंडप तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
भाऊबीज, मार्गशीर्ष षष्ठी (चंपाषष्ठी) आणि चैत्र पौर्णिमेला येथे यात्रा भरतात. भाऊबीजेच्या दिवशी जेजुरीहून आणलेल्या अखंड ज्योतीने येथील धुनी व दीपमाळेवरील दिवे प्रज्वलित केले जातात व त्यानंतर यात्रोत्सवाला प्रारंभ होतो. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी खंडोबांचा नवरात्रोत्सव सुरू होतो, तो मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीपर्यंत म्हणजेच चंपाषष्ठीपर्यंत सुरू असतो. मणी व मल्ल या २ दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा करतात. ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा जयघोष करत हजारो भाविक वाकडी येथे दाखल होतात. भंडाऱ्याची अखंड उधळण आणि तळी भरणे असे कार्यक्रम दिवसभर सुरू असतात. यावेळी भाविकांकडून खंडोबाला वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य दाखविला जातो. या यात्रोत्सवात घोड्यांची मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक पाहण्यासाठी हजारो भाविक येथे उपस्थित असतात. चैत्र पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीला येथे भरणाऱ्या यात्रेत मानाच्या काठ्यांची मिरवणूक निघते.
दररोज सकाळी, दुपारी व संध्याकाळी या मंदिरात खंडोबा देवाची आरती होते. सकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात जाऊन खंडोबाचे दर्शन घेता येते.