अहमदनगर जिल्ह्यात असे एक गाव आहे जेथे या गावातील मुलीशी लग्न करणाऱ्या जावयाची सर्व ग्रामस्थांकडून पूजा करून त्याचे आदरातिथ्य केले जाते. त्याला कारणही तसेच आहे. नेवासे तालुक्यातील नेवासे बुद्रुक हे खंडोबाची पत्नी म्हाळसाईचे माहेर. म्हाळसाईचा जन्म याच गावातील. त्यामुळे खंडोबा या गावचे जावई होत. तेव्हापासून या गावात जावई पूजनाची प्रथा सुरू आहे ती आजतागायत. नेवासे बुद्रुक येथील अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या तीरावरील श्री खंडोबा–म्हाळसाईचे पुरातन मंदिर येथील ग्रामदैवत असून हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
श्रीमद्भागवत महापुराणातील अष्टम स्कंधामधील उल्लेखानुसार, खंडोबा हे शंकराचे अवतार असून या अवतारात म्हाळसाई आणि बाणाई या त्यांच्या दोन पत्नी होत्या. त्यापैकी म्हाळसाई ही त्यांची पहिली पत्नी. म्हाळसाईला जोगेश्वरी आणि भैरवी या नावानेही ओळखले जाते. मोहिनी अवतार म्हणूनही म्हाळसाई प्रसिद्ध आहे. समुद्रमंथनाच्यावेळी दैत्यांकडून अमृत मिळविण्यासाठी श्रीविष्णूंनी मोहिनीचे (सुंदर स्त्री) रूप धारण करून दैत्यांना आपल्याकडे आकर्षित केले. मोहिनीच्या सौंदर्यावर भाळलेल्या दैत्यांनी आपल्याकडील अमृतकुंभ श्रीविष्णूरूपी मोहिनीकडे दिले. त्यामुळे सर्व देवांना अमृत प्राशन करता आले. मात्र त्याचवेळी मोहिनीच्या अलौकिक रूपावर देवही भाळले होते.
एके दिवशी महादेवांनी श्री विष्णूकडे मोहिनी रूप दाखवण्याचा हट्ट धरला; परंतु श्रीविष्णूने त्याला नकार दिला. मात्र महादेव काही केल्या ऐकेनात. अखेरीस श्रीविष्णूंनी महादेवांसाठी पुन्हा मोहिनी रूप धारण केले. मोहिनीचे ते रूप पाहून महादेवही तिच्यावर मोहित झाले. त्यावेळी मोहिनीने पार्वतीच्या देहात प्रवेश केला. पार्वतीचे मोहिनीसारखे रूप पाहून महादेवांनी तिला म्हाळसा असे नाव दिले. जेव्हा महादेव मोहिनीरुपाला पाहून तिच्याकडे आकर्षित झाले होते, त्यावेळी मोहिनीने महादेवांना आश्वासन दिले की भविष्यात जेव्हा तुम्ही मार्तंड भैरव रूपात पृथ्वीवर अवतार घ्याल, तेव्हा मी म्हाळसा रूपाने अवतार घेऊन तुमची पत्नी होईन.
नेवासे बुद्रुक येथे तिमशेठ या नावाचा एक श्रीमंत लिंगायत वाणी राहत होता. त्याला मूळबाळ नव्हते. तिमशेठ हा महादेवाचा निस्सीम भक्त होता. म्हाळसाईने या दाम्पत्याच्या घरी जन्म घ्यावा, असे महादेवांनी तिला सुचवले. एके दिवशी तिमशेठ पूजाविधीत तल्लीन असताना त्याच्यासमोर देवी पार्वती प्रकट झाली. देवी पार्वतीने तिमशेठला डोळे मिटण्यास सांगितले. तिमशेठने डोळे मिटल्यावर आदिमाता पार्वतीने बाळरूप धारण केले व तेथे ती रडू लागली. तिमशेठने या मुलीचे नाव म्हाळसा असे ठेवले. ती उपवर झाल्यावर एका रात्री महादेवांनी तिमशेठ यांच्या स्वप्नात येऊन म्हाळसाचा खंडोबासोबत विवाह लावण्यास सांगितले. महादेवांनी सांगितल्यानुसार पौष पौर्णिमेला खंडोबा व म्हाळसाचा विवाह सध्याच्या सातारा जिल्ह्यातील पाली येथे पार पडला. आजही दरवर्षी पौष पौर्णिमेच्या दिवशी सातारा जिल्ह्यातील पाल येथे लाखो भाविकांच्या साक्षीने श्रीखंडोबा व म्हाळसा यांचा विवाह शाही थाटात पार पडतो.
या सोहळ्यासाठी पाच ते सात लाख भाविकांची उपस्थिती असते, अशी नोंद आहे.
म्हाळसाईचे जन्मस्थान असलेल्या नेवासे बुद्रुक या गावाची ओळख म्हाळसापुरी अशी आहे. येथे श्रीखंडोबा, म्हाळसाई व बाणाई यांचे पुरातन छोटेखानी मंदिर आहे. दगडी बांधणीच्या या मंदिराच्या गर्भगृहात मध्यभागी श्रीखंडोबा, उजवीकडे म्हाळसाई व डावीकडे बाणाई यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराच्या बाहेरील बाजूस शंकर–पार्वती, तसेच इतर प्राचीन मूर्ती आहेत. मूळ मंदिराच्या शेजारी ग्रामस्थांनी काही वर्षांपूर्वी नवीन मंदिराची उभारणी केली. प्रवरा नदीच्या तीराला लागून एका सुंदर उद्यानाची निर्मिती करून त्यासमोरच हे नवीन मंदिर उभारले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर उंच दीपमाळ आहे. जमिनीपासून चार ते पाच फूट उंचीवर असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला द्वारपालांची शिल्पे आहेत. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून मंदिराला तीन गर्भगृह व प्रत्येक गर्भगृहावर कळस आहेत. मध्यभागी असलेल्या गर्भगृहात चौथऱ्यावर घोड्यावर स्वार खंडोबा व म्हाळसाई आणि त्यांच्या शेजारी बाणाई या मूर्ती आहेत. उजव्या बाजूच्या गाभाऱ्यात तीन मूर्ती असून मध्यभागी नारदमुनी, उजव्या बाजूला श्रीदत्त व डाव्या बाजूस श्रीगणेश यांच्या मूर्ती आहेत. डाव्या बाजूच्या गाभाऱ्यात सच्चीदानंद महाराज यांची मूर्ती आहे. नेवासे येथे संत ज्ञानेश्वरांनी पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली ती सच्चीदानंद महाराज यांनी लिहून घेतली होती.
असे सांगितले जाते की चंपाषष्ठीच्या दिवशी (मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी) खंडेराय नेवासे येथील या स्थानावर मुक्कामाला येतात. तेव्हापासून चंपाषष्ठीच्या दिवशी गावातील जावयाला विशेष मान दिला जातो. या दिवशी येथे यात्रा भरते. जेजुरीहून आणलेल्या अखंड ज्योतीद्वारे येथील दिवे प्रज्वलित केले जातात. खानदेशी वांग्याचे भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा खंडोबाला नैवेद्य दाखवून आलेल्या भाविकांना महाप्रसाद दिला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवशी खंडोबा अर्थात मल्हारी देवाचा सहा दिवसांचा उत्सव सुरू होतो. मणी–मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीपर्यंत हा उत्सव असतो. जेजुरीसह खंडोबाच्या अनेक तीर्थस्थानांवर हा उत्सव मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो.