काशी केदारेश्वर मंदिर

काशिनाथबाबा समाधी मंदिर

नागलवाडी, ता. शेवगाव, जि. अहमदनगर

श्रीराम, लक्ष्मण सीता वनवास काळ संपवून अयोध्येमध्ये परतल्यानंतर तेथील प्रजेने सीतेसंदर्भात काही शंका उपस्थित केल्या. त्यामुळे श्रीरामांनी लक्ष्मणासोबत सीतेला पुन्हा दंडकारण्यात पाठविले. दंडकारण्यात वाल्मिकी ऋषी अनेक वर्षे तपश्चर्या करीत होते. त्यांच्या आश्रमात सीतेने आश्रय घेतला. असे सांगितले जाते की ते ठिकाण म्हणजे अहमदनगरमधील शेवगाव तालुक्यातील नागलवाडी येथील श्री क्षेत्र काशी केदारेश्वर होय. या पवित्र ठिकाणी लव कुश यांचा जन्म झाला. रामायण काळातील सप्तऋषींपैकी एक असलेले महर्षी वाल्मिकी यांच्या वास्तव्याने पावन झालेले हे क्षेत्र नागलवाडीचे ग्रामदैवत अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

पुराणग्रंथांमधील उल्लेखानुसार, त्रेतायुगात दंडकारण्याचा भाग असलेला हा परिसर निसर्गसमृद्ध होता. त्यामुळे वास्तव्यासाठी वाल्मिकी ऋषींनी या परिसराची निवड केली. या परिसरात त्यांनी शेकडो वर्षे तपश्चर्या केली अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या. त्याचदरम्यान अयोध्येहून सीतेला श्रीरामांनी पुन्हा वनवासात पाठविले. लक्ष्मण सीतेला घेऊन या परिसरात आला. सीता वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राहू लागली. वाल्मिकी ऋषींना पितृस्थानी मानून त्यांना देवी सीतातातम्हणत असे. तेव्हापासून या स्थानालाही तातोबाचा मठ असे म्हटले जाते. सीतेला घेऊन जेव्हा लक्ष्मण या भागात आला तेव्हा सीतेला तहान लागली होती. त्यावेळी लक्ष्मणाने येथील कातळात बाण मारून झरा निर्माण केला. तो आता सीतेची न्हाणी म्हणून प्रसिद्ध आहे. झऱ्याची खोली सुमारे सात फूट असून तो कधीही आटत नाही. अयोध्येहून सीता जेव्हा पुन्हा दंडकारण्यात आली तेव्हा ती गर्भवती होती. तिने महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात लव कुश यांना जन्म दिला. या दोन्ही भावंडांचे बालपणही या परिसरात गेले.

महर्षी वाल्मिकींची ही भक्तीची परंपरा ऋषी परंपरेतील महान तपस्वी काशिनाथबाबा यांनी पुढे नेली. त्यांनी या ठिकाणी तपश्चर्या करून महादेवांना प्रसन्न करून घेतले त्यांना या परिसरात वास्तव्य करण्यास सांगितले. त्यावेळी येथे स्वयंभू शिवलिंग प्रकट झाले. तेव्हापासून हे स्थान केदारेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. या केदारेश्वराची काशिनाथ बाबांनी अनेक वर्षे सेवा केली म्हणून या मंदिराला काशी केदारेश्वर असे संबोधले जाऊ लागले.

नागलवाडी गावाजवळ महादेव डोंगररांगेतील निसर्गसमृद्ध परिसरात प्राचीन काशी केदारेश्वर देवस्थान स्थित आहे. काहीशा खोलगट भागात असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरून जावे लागते. मंदिराचा परिसर प्रशस्त असून तेथे फरसबंदी करण्यात आलेली आहे. सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाबाहेर अखंड दगडातील भव्य नंदीची मूर्ती आहे. सभामंडप हा खुल्या प्रकारातील आहे. गर्भगृहात स्वयंभू शिवपिंडी असून त्यावर पितळी आवरण आहे. मंदिर परिसरात महर्षी वाल्मिकी यांचा आश्रम, हनुमंताचे मंदिर सीता न्हाणी कुंड आहे. लीळा चरित्रातील उल्लेखानुसार महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांचेही या ठिकाणी काही दिवस वास्तव्य होते.

या मंदिरापासून १५० मीटर अंतरावर काशिनाथबाबा यांचा अकराव्या शतकातील मठ आहे. ज्येष्ठ शुक्ल नवमी या दिवसाला महेश नवमी असेही म्हटले जातेया दिवशी महादेवांची पूजाअर्चा केल्यास ते आपल्या भक्तांच्या अडचणी सोडवतात, अशी मान्यता आहे. या दिवशी दान करणेही पुण्य समजले जाते. येथील भुयारात त्यांनी संजीवन समाधी घेतली होती. या समाधीच्या शेजारी बहीण दुर्गामाता (देवी) यांचेही काळ्या पाषाणातील मंदिर आहे. असे सांगितले जाते की काशिनाथबाबा दुर्गामाता या भावंडांनी तपसामर्थ्याच्या जोरावर एकाच रात्रीत या मठाचे बांधकाम पूर्ण केले. या मठामध्येसीतेचा संसारभुयार आहे. या भुयारातून काशिनाथबाबा समाधीस्थ होण्यासाठी गेले. भुयाराच्या मधोमध मोठी शिळा असून त्यावर ब्रह्मानंदी देवीची मूर्ती आहे. या भुयारात पुरातन दगडी जाते, दगडी रांजण इतर संसारोपयोगी दगडी वस्तू आहेत.

काशिनाथबाबांच्या समाधी मंदिरापासून दक्षिणेकडे सुमारे ६०० फूट अंतरावर लहानशी टेकडी आहे. या टेकडीवर उभे राहून बाबांच्या मंदिराकडे आवाज दिला तर त्याचा प्रतिध्वनी पुन्हा स्पष्ट ऐकायला येतो. मोकळ्या पठारावर असा प्रतिध्वनी येणे हे येथील वैशिष्ट्य समजले जाते

काशी केदारेश्वर मंदिर काशिनाथबाबांच्या समाधीस्थानाबद्दल संत एकनाथ महाराजांनी आपल्या अभंगामध्ये वर्णन केले आहे. त्यांचे गुरू जनार्दन स्वामी यांनी केदारेश्वर येथे येऊन भगवान केदारेश्वराचे दर्शन घेतल्याचा उल्लेख आहे. ते म्हणतात – 

अधिष्ठाण देवगिरी। मग आले ब्रम्हपूरी ।।१।। 

धरिला दक्षिणेचा पंथ। स्वामी आले केदारात ।।२।।

पूजा केदाराची केली। इच्छा समाधिची झाली ।।३।।

दक्षिणेशी हरीहर। ध्यौम्यऋषिंचा डोंगर ।।४।।

तेथे घेतली समाधी एका जनार्दन वंदी ।।५।। 

अशा या प्राचीन काशी केदारेश्वर देवस्थानाची श्रावण महिन्यात तिसऱ्या सोमवारी मोठी यात्रा भरते. शेवगाव तालुक्यातील मोठ्या यात्रांपैकी ती एक समजली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशीही येथे उत्सव साजरा होतो. तेव्हा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ शुक्ल नवमीला काशिनाथबाबा यांचा संजीवन समाधी उत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात येतो.

उपयुक्त माहिती:

  • शेवगावपासून ४० किमी, तर अहमदनगरपासून ८५ किमी अंतरावर
  • शेवगावपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास न्याहरीची व्यवस्था नाही
Back To Home