
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ देवस्थान प्रसिद्ध आहे. देशात वाराणसीनंतर काशी विश्वनाथाचे दुसरे स्थान महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदा येथे आहे. येथील ढोरजे या गावी निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे स्थान महादेव व त्याचा लाडका भक्त काशिनाथ यांच्या निस्सीम भक्तीची प्रचिती देते. भक्तासाठी देव काशीहून थेट ढोरजा गावी आले, त्यामुळे या स्थानाला ‘प्रति काशीविश्वनाथ मंदिर’ असेही म्हटले जाते. येथील दर्शनाने वाराणसीमधील काशी विश्वनाथाच्या दर्शनाचे पुण्य लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की श्रीगोंदा येथील ढोरजेपासून जवळच असलेल्या शिरूडी गावात महादेवाचे भक्त काशिनाथ राहत होते. प्रत्येक वर्षी श्रावणात वाराणसी येथे काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी ते गावातून पायी जात असत. त्यांचा हा क्रम अनेक वर्षें सुरू होता. काशिनाथांची निस्सीम भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले व त्यांनी वर मागण्यास सांगितले. त्यावर काशिनाथांनी सांगितले, ‘देवा मला तुझ्या भक्तीत रममाण व्हायचे आहे. प्रत्येक वर्षी मी तुझ्या दर्शनाला येतो, आता तू माझ्याबरोबर माझ्या गावात चल, जेणेकरून मला दररोज तुझे दर्शन घेता येईल.’ देवाने त्वरित होकार दिला व काशिनाथांसोबत त्यांच्या मागे जाऊ लागले. वाटेत मागे वळून पाहायचे नाही, अशी महादेवांची अट होती. त्यानुसार ते काशी येथून निघाले. मजल- दरमजल करीत ढोरजे गावात आल्यावर तेथील निसर्गरम्य परिसर महादेवांना भावला व ते काही क्षण तेथे थांबले. महादेव का थांबले, यासाठी काशिनाथांनी मागे वळून पाहिले असता महादेव जेथे उभे होते तेथून ते गुप्त झाले व तेथे स्वयंभू शिवलिंग प्रगट झाले. त्यामुळे काशिनाथही तेथेच राहून शिवलिंगाची सेवा करू लागले. काही काळानंतर या ठिकाणी महादेवाचे विश्वनाथ मंदिर आणि भक्ताचे काशिनाथ मंदिर अशी दोन मंदिरे उभारण्यात
आली. कालांतराने काशिनाथ-विश्वनाथांची मंदिरे काशी विश्वनाथ म्हणून प्रसिद्ध झाली.
यादवकालीन स्थापत्य रचना असलेली काशिनाथ आणि विश्वनाथ ही मंदिरे १२व्या ते १४व्या शतकातील आहेत. या मंदिरांबाबत असे सांगितले जाते की महादेव आणि काशिनाथ काशीवरून पश्चिम दिशेला चालत असताना काशिनाथांनी मागे वळून पूर्वेकडे असलेल्या महादेवांकडे पाहिले, त्यामुळे काशिनाथ मंदिर हे पूर्वाभिमुख, तर विश्वनाथ मंदिर हे पश्चिमाभिमुख आहे. या मंदिर परिसरात असलेल्या एका कातळावर अगस्ती ऋषींनी काही काळ तपश्चर्या केली होती.
या दोन मंदिरांपैकी विश्वनाथ मंदिरावरील भिंतीवर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. नंदीमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. नंदीमंडपातील नंदीशिवाय येथील सभामंडपातही नंदी आहे. सभामंडपाच्या भिंतींमध्ये अनेक विरगळ (युद्धामध्ये शहीद वा वीरगती प्राप्त झालेल्या वीरांचे स्मरण करण्यासाठी दगडावर केलेले कोरीव काम) आहेत. महाराष्ट्रात साधारणतः या विरगळ प्राचीन मंदिरांच्या दर्शनी भागात ठेवलेल्या आढळतात. सभामंडपातून गर्भगृहात जाताना तेथील प्रवेशद्वारावर अनेक कोरीव शिल्पे, तर ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहात काळ्या दगडातील शिवपिंडी आहे.
विश्वनाथ मंदिराच्या समोर काशिनाथ मंदिर आहे. विश्वनाथांचे दर्शन घेण्याआधी या मंदिरात दर्शन घेण्याची पद्धत आहे. या मंदिराचा सभामंडप विश्वनाथ मंदिराच्या तुलनेने प्रशस्त आहे. तेथे दोन प्राचीन नंदी आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर उजवीकडे गणेशाची मूर्ती, तर गर्भगृहात प्राचीन शिवपिंडी आहे. या शिवपिंडीवर उत्सवाच्या वेळी काशिनाथांचा मुखवटा लावला जातो. मंदिराचा कळस वैशिष्ट्यपूर्ण आहे. कळसावरील देवड्यांमध्ये अनेक देव-देवतांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. या मंदिरांच्या परिसरात दोन भुयारे आहेत. या भुयारांमध्ये अनेक ऋषी तप करण्यासाठी बसत असत. त्यामुळे या परिसराला तपोभूमी, असेही म्हटले जाते.
काशिनाथ मंदिराच्या शेजारी एक शिवपिंडीच्या आकाराची दगडी बारव आहे. यामध्ये बाराही महिने पाणी असते. दरवर्षी श्रावणातील पहिल्या सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. असे सांगितले जाते की पहिल्या श्रावणी सोमवारी येथे गंगा प्रकट होते. ही गंगा प्रकट होण्याची निश्चित वेळ नसल्यामुळे गंगातीर्थ घेण्यासाठी पहाटे ३ वाजल्यापासून हजारो भाविक येथे येतात. प्रकट झाल्यानंतर साधारणतः अडीच तासानंतर गंगा लुप्त होते. गंगा प्रकट झाल्यानंतर गावातील अनेक दाम्पत्य त्या तीर्थाने शिवलिंगावर अभिषेक करतात. गंगेचे हे पाणी कोठून येते, ते श्रावणातील पहिल्या सोमवारीच कसे येते, अडीच तासानंतर ते बंद कसे होते, या रहस्यांचा उलगडा अजूनही कोणाला झालेला नाही.