कलेश्वर म्हणजे कलेचा ईश्वर. कोकणातील सुप्रसिद्ध लोककला दशावतार, तसेच होलिकापौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा होत असलेला ‘रोंबाट’ हा पारंपरिक सांस्कृतिक प्रकार, पौराणिक देखावे आदी कलाप्रकारांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या नेरूर या गावचे कलेश्वर हे ग्रामदैवत आहे. येथील कलेश्वर प्राचीन देवस्थान हे हरि आणि हर यांत अभेद असल्याचे दर्शविणारे आहे. हे एक जागृत देवस्थान आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे येथे दर्शनासाठी भाविक सतत येत असतात. विशेषतः शिवरात्रीस येथे मोठा जत्रोत्सव भरतो. त्या दिवशी कलेश्वराच्या दर्शनासाठी व येथील रथोत्सव पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.
कलेश्वर मंदिर अत्यंत प्राचीन आहे. त्या विषयीची आख्यायिका अशी की फार पूर्वी नेरूर गावामध्ये एक ब्राह्मण राहात होता. त्याच्याकडे पुष्कळ गायी–गुरे होती. एकदा त्याचा नोकर गुरांना घेऊन नेरूरमधील चिंचेची राई या भागात गेला होता. तो दिवस सोमवारचा होता. बाकीची गुरे चरत असताना त्यातील एक गाय एका ठिकाणी गेली व तेथे आपल्या आचळातील दूध सोडू लागली. ते पाहून तो नोकर अचंबित झाला. या नंतर नित्याप्रमाणे पुढच्या सोमवारीही तो त्या ठिकाणी गुरे घेऊन गेला. त्यावेळी त्याने सोबत एक कुदळ आणली होती. नेहमीप्रमाणे ती गाय त्या विशिष्ट स्थानी आचळातून दूध सोडू लागताच त्याने त्या ठिकाणी खणण्यास सुरुवात केली. अचानक त्याला खण् असा आवाज आला. पाहतो तर तेथून जमिनीतून रक्ताचा ओघळ सुरू झाला होता. त्याने आजुबाजूची माती दूर करून पाहिले, तर तेथे शंकराची पिंडी होती. ती पिंडी म्हणजेच कलेश्वर होय, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यानंतर कलेश्वराचे मंदिर बांधून गावकरी त्याची पूजा करू लागले.
गावाच्या बाहेर निसर्गरम्य परिसरात, कमळाच्या तळ्याकाठी हे मंदिर आहे. मंदिराचे आवार विस्तीर्ण आहे व त्यास मोठी आवारभिंत आहे. या आवाराच्या बाहेर, मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्यालगत, एक छोटेसे पायऱ्या असलेले बांधीव चौकोनी तळे आहे. मंदिराचे प्रवेशद्वार द्रविडी पद्धतीच्या मंदिरांच्या गोपुरासारखे आहे. त्याच्या छतावर उंच रंगीत देवळीमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांच्या मूर्ती आहेत. येथून आत प्रवेश करताच समोर दिसते ते कोकणी स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना असलेले कलेश्वराचे प्राचीन व भव्य मंदिर. त्या समोरच दगडी चबुतऱ्यावर सहा स्तरीय दीपस्तंभ व छोटेसे तुळशी वृंदावन आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत जाताच समोर प्रशस्त असा सभामंडप दिसतो. सभामंडप खुल्या प्रकारचा आहे व त्यातील बाह्यभिंतीच्या ठिकाणी सिमेंटचे स्तंभ आणि त्यांमध्ये कक्षासने अशी रचना आहे. कोकणी स्थापत्यशैलीस अनुसरून सभामंडपाच्या कक्षासनापासून काही अंतर आत लाकडी स्तंभ आहेत. दोन्ही बाजूंस असलेल्या या स्तंभांच्या मधील भूमी काही इंच खोलगट आहे. या मंदिरातील सभामंडपाचे दोन भाग पडतात. बाह्य सभामंडपातून चार पायऱ्या चढून एका दुसऱ्या छोट्या सभामंडपात प्रवेश होतो. हा सभामंडपही खुल्या स्वरूपाचा आहे. त्यास दोन्ही बाजूंनी कक्षासने आहेत. त्यामध्ये असलेले काळ्या पाषाणाचे स्तंभ हे बारीक नक्षीकाम केलेले आहेत. खालच्या बाजूस चौकोनी, तर मध्यभागी षट्कोनी आणि शीर्षस्थानी पानांची नक्षी असलेला कलशासारखा आकार असे हे स्तंभ आहेत. या स्तंभांच्या मध्यावर गणेशाच्या विविध रूपांतील मूर्ती कोरलेल्या आहेत. या मंडपावर पिरॅमिडच्या आकाराचे शिखर आहे.
येथून तीन पायऱ्या चढून मुख्य गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहाच्या द्वारास रुंद अशी चौकट आहे. तेथे तीन द्वारशाखा दिसतात. त्यावर वेलबुट्टीची नक्षी तसेच गणेश, हनुमान, द्वारपाल यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. या द्वारशाखांलगत भिंतीत रोवलेले नक्षीदार अर्धस्तंभ आहेत व त्यांच्या शीर्षस्थानी व्यालमूर्ती आहेत. चौकटीच्या वरील भागात ललाटबिंबाच्या वर शैव मंदिरातील एक वैशिष्ट्य असलेल्या नागमूर्ती कोरलेल्या आहेत. या मंडपापुढे प्रशस्त असे अंतराळ आहे. येथील बारीक कोरीव काम केलेले वैशिष्ट्यपूर्ण पाषाण स्तंभ मंदिराचे प्राचीनत्व दर्शवतात. या स्तंभांवर मधल्या भागावर म्हणजेच स्तंभदंडावर विविध देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यावर घटपल्लव व त्यावर लाकडी कोरीवकाम केलेले तरंगहस्त आहेत. अंतराळातच नंदीची पाषाणमूर्ती आहे.
गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर, प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस गणेशाची सुंदर पाषाण मूर्ती आहे. उजवीकडे कर्कोटक नागाची प्रतिमा आहे. गाभाऱ्यामध्ये जमिनीपासून थोडी उंच अशी शिवपिंडी आहे. विशेष म्हणजे या पिंडीची शाळुंका चौकोनी आकाराची आहे. शाळुंकेतील शिवलिंगावर फणा काढलेल्या नागाची पितळी मूर्ती आहे. शेजारी शिवशंकराची मुखमूर्ती आहे. या प्रसन्नवदन मूर्तीतील शंकरास मिशा आहेत व त्याने मस्तकी गंगा धारण केलेली आहे.
कलेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूस वेतोबा आणि भद्रकालीचे छोटे मंदिर आहे. या शिवाय मंदिराच्या आवारात गावडोबा, रवळनाथ, सातेरी देवी या लोकदेवतांचीही मंदिरे आहेत. सातेरी देवी वारूळ स्वरूपात पूजली जाते. या मंदिरातही एक उंच वारूळ आहे. या देवस्थानचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेले ब्रह्मनाथाचे मंदिर. हे मंदिरही कोकणी स्थापत्यशैलीतील आहे. ते उंच जोत्यावर बांधलेले आहे. सभामंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडप प्रशस्त असून त्यात आतल्या बाजूस काळे पाषाणस्तंभ आहेत. गर्भगृहाच्या दर्शनीभिंतीवर डाव्या बाजूस शिवपिंडी, तसेच भैरोबाची मूर्ती आहे. उजव्या बाजूस सतीशिळा आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार बहुशाखीय आहे. त्यावर वेलबुट्टीची कलाकुसर करण्यात आलेली आहे. आत मकरतोरण असलेल्या सोनेरी मखरामध्ये ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणातील व त्रिमुखी आहे. तिन्ही मस्तकांवर सोनेरी मुकुट आहे. या मूर्तीच्या बाजूस लोकदैवतांच्या मूर्ती आहेत. लोकांमध्ये असा समज आहे की देशामध्ये फक्त राजस्थानातील पुष्कर येथेच ब्रह्मदेवाचे मंदिर आहे. वस्तुतः देशात राजस्थानातील बारमेर जिल्ह्यातील असोत्रा, हिमाचल प्रदेशातील खोखान, कुल्लु घाटी, तामिळनाडूतील कुंभकोणम व तिरुपत्तूर तसेच पणजी येथेही ब्रह्मदेवाची मंदिरे आहेत. असेच एक ब्रह्मदेवाचे मंदिर महाराष्ट्रातही आहे, ते म्हणजे नेरूरमधील हे ब्रह्मनाथ मंदिर. कलेश्वराच्या दर्शनानंतर ब्रह्मनाथाचे दर्शन घेण्याची परंपरा येथे पाळली जाते.
कलेश्वर देवस्थानच्या आवारातच एका मंडपामध्ये कलेश्वराचा रथ झाकून ठेवलेला आहे. हा लाकडी रथ २१ फूट उंचीचा आहे. तो मंदिराच्या शिखराच्या आकाराचा आहे. त्यावर ठिकठिकाणी कोरीवकाम करण्यात आलेले आहे. कलेश्वर देवस्थानात महाशिवरात्र उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. हा पाच दिवसांचा जत्रोत्सव असतो. त्यावेळी ढोल–ताशांच्या गजरात आणि ‘पार्वतीपतये हरहर महादेव’च्या घोषात कलेश्वराची रथयात्रा काढली जाते. महाशिवरात्री महोत्सवात दशावतार, कीर्तन व भजन असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. परिसरातील हजारो लोक या यात्रोत्सवास जमतात. या शिवाय मंदिर परिसरात माघी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दीपावली आदी सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.