काळभैरव मंदिर

इंडिया नगर, लातूर, ता. जि. लातूर

मराठवाड्यातील लातूर हे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे क्षेत्र गणले जाते. या शहरात वसलेले काळभैरव मंदिर हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. काळभैरव हे भगवान शिवाचे एक उग्र रूप मानले जाते. ते काळ म्हणजेच ‘समय’ आणि भैरव म्हणजे ‘रक्षक’ या संकल्पनेचे प्रतीक आहे. काळभैरवाच्या या मंदिरात दरवर्षी हजारो भक्त दर्शनासाठी येतात. विसाव्या शतकात उभारलेल्या या मंदिराच्या गर्भगृहात अखंड शाळिग्रामात घडवलेली काळभैरवाची चतुर्भुज मूर्ती विराजमान आहे. येथे कार्तिक वद्य अष्टमी हा दिवस काळभैरव जयंती म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

काळभैरवास ‘काशीचा कोतवाल’ असेही म्हणतात. पापभक्षण, आमर्दक, काळराज ही त्यांची नावे आहेत. काळभैरवाविषयी पौराणिक कथा अशी की भगवान शंकराच्या क्रोधातून मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीस काळभैरवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाने एकदा शंकराचा अपमान केला, त्यामुळे शंकर क्रोधित झाले. त्या क्रोधाग्नीतूनच काळ्या रंगाचा भैरव जन्माला आला व त्याने ब्रह्मदेवाचे शिवनिंदा करणारे मस्तक तोडले. मात्र, त्यामुळे त्यांच्या हातून ब्रह्महत्येचे पाप घडले. सर्व तीर्थांना जाऊनही त्याचे पापक्षालन झाले नाही. अखेरीस काशी येथे त्यांना पापमुक्ती मिळाली आणि तेथे ब्रह्मदेवाचे मस्तक गळून पडले. कालभैरवाने ब्रह्मदेवाचे मस्तक जेथे ठेवले, त्या स्थानास ‘कपालमोचन तीर्थ’ म्हणतात.

कालिकापुराणात अशी कथा सांगितली जाते की पार्वतीच्या शापाने महाकाल हा गण भैरवाच्या रूपाने जन्मला होता. काशीच्या तीर्थात स्नान केल्याने दोषमुक्त झालेले काळभैरव काशीचे कोतवाल, म्हणजे संरक्षक बनले. त्यामुळे काळभैरव हे शहरांचे वा गावांचे संरक्षक मानले जातात. भारतात अनेक ठिकाणी काळभैरवाची मंदिरे आहेत. यात प्रामुख्याने उज्जैन आणि वाराणसीतील मंदिरे प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील सोनारी, म्हसवड, खुरसुंडी, वीर, कोडीत, आबापुरी ही भैरव सिद्धपीठे मानली जातात. कालभैरवाची मंदिरे ही बहुतांशी तांत्रिक परंपरेशी जोडलेली असतात. त्यांची उपासना सात्त्विक, राजस आणि तामस अशा तीनही पद्धतींनी केली जाते. तामस पद्धतीची उपासना अत्यंत उग्र मानली गेल्याने ती गृहस्थधर्म पाळणाऱ्यांसाठी निषिद्ध मानली जाते. लातूरमधील या काळभैरव मंदिरात मात्र सात्त्विक पद्धतीने उपासना केली जाते. रविवार, मंगळवार, कृष्ण पक्षातील अष्टमी आणि चतुर्दशी हे दिवस काळभैरवाच्या उपासनेसाठी उत्तम आणि फलदायी मानले जातात.

असे सांगितले जाते की लातूर परिसरातील भैरवभक्त संत निवृत्तीनाथ महाराज चिंचोलीकर यांना काळभैरवाचा दृष्टांत झाला होता. त्या दृष्टांतात त्यांना ज्या रूपात दर्शन झाले, त्याच रूपात त्यांनी शाळिग्राम शिळेतून ही मूर्ती घडवून घेतली. पुढे १९८० मध्ये त्यांनी हे मंदिर उभारून त्यात या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. दाट लोकवस्तीत असलेल्या या ठिकाणाला ‘नाथ आश्रम’ असेही संबोधले जाते. सभोवताली घरांची गर्दी असली, तरीही मंदिराचे वेगळ्या शैलीतील शिखर लांबूनच लक्ष वेधून येते. आधुनिक बांधकाम असलेल्या या मंदिराचा परिसर आटोपशीर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असल्याने नोव्हेंबर आणि जानेवारी महिन्यात सूर्यकिरणे थेट काळभैरवाच्या मूर्तीच्या चरणांवर पडतात. उन्हाळ्यात या मूर्तीला घाम येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

खुला सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. या सभामंडपात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस हनुमान व गणपतीसह अन्य देवतांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर शाळिग्राम पाषाणातून घडविलेली, सुमारे दोन फूट उंचीची काळभैरवाची चतुर्भुज मूर्ती आहे. मूर्तीच्या मस्तकी जटा, कानात कुंडले, गळ्यात व दंडावर सर्प आणि खांद्यावर मुंडक्यांची माळ आहे. देवाच्या वरच्या उजव्या हातात डमरू व खालच्या हातात खड्ग आहे, तर वरच्या डाव्या हातात त्रिशूळ आणि खालच्या हातात ब्रह्मदेवाचे मस्तक आहे. हे मस्तक पात्र म्हणून वापरले जाते, अशी मान्यता आहे. कमरेला मेखला आणि हाता-पायात कडे असलेल्या या मूर्तीचे रूप मिशांसह प्रौढ दर्शवले आहे. मूर्तीच्या पायाजवळ हत्ती कोरलेला आहे. तो संपत्तीचे प्रतीक असलेल्या ‘स्वर्णाकर्षण भैरवाचे’ वाहन मानला जातो. काळभैरव, बटुक भैरव आणि स्वर्णाकर्षण भैरव या तिन्ही रूपांचे एकत्रीकरण असलेली ही एकमेव मूर्ती असल्याची मान्यता आहे. या मंदिराशेजारील प्रांगणात निवृत्तीनाथ महाराजांचे समाधी मंदिर आहे. ३ ऑगस्ट १९९२ रोजी त्यांचे येथे देहावसान झाल्याची नोंद आहे. मंदिरावर असलेल्या उंच शिखरावर अनेक देवकोष्टके आहेत आणि त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत.

मंदिरातील नित्यपूजेमध्ये दररोज सकाळी धूपारती आणि सकाळी साडेआठ वाजता मूर्तीवर अभिषेक केला जातो. कार्तिक वद्य अष्टमीला मध्यरात्री काळभैरव जन्मोत्सव, तर चैत्र वद्य अष्टमीला ‘विवाहाष्टमी’ साजरी करण्यात येते. विवाहाष्टमी हा येथील मुख्य उत्सव आहे. या दिवशी भगवंत आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न होतो. याच उत्सवाच्या निमित्ताने हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. याव्यतिरिक्त नागपंचमीला श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पुण्यतिथी साजरी होते. सूर्य आणि चंद्र ग्रहणांच्या पुण्यकाळात येथे मंत्रजाप व हवन केले जाते. रविवारचा दिवस भक्तांसाठी विशेष असतो. प्रत्येक रविवारी दुपारी १२ ते ३ आणि रात्री ८.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन असते. तसेच, या दिवशी येथे भाविकांच्या समस्यांवर मार्गदर्शन केले जाते. पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारी मंदिरात वारी असते.

उपयुक्त माहिती:

  • लातूर बस स्थानकापासून १ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क: मंदिर कार्यालय, मो. ८०८७८८६४५८, ९५५२२६९०८६

कालभैरव मंदिर

भारत नगर, लातूर, तालुका। जिला. लातूर

Back To Home