गुरू शुक्राचार्य यांचे वास्तव्य व तपसामर्थ्यामुळे पावन झालेल्या कोपरगाव बेट येथे शुक्राचार्यांचे परमशिष्य व बृहस्पतीपुत्र कचदेव यांचे प्राचीन कचेश्वर मंदिर आहे. शुक्राचार्यांकडून कचदेवांनी संजीवनी मंत्राचे ग्रहण केले, तेव्हा या ठिकाणी महादेव गुप्त रूपाने कचदेवास आशीर्वाद देण्यासाठी आले होते. त्यामुळे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे केलेल्या नवसाची पूर्तता कोपरगावातील कचेश्वर मंदिरात करता येते, अशी भाविकांची मान्यता आहे.
पौराणिक ग्रंथांमधील उल्लेखांनुसार, देव–दानव यांच्या युद्धात दैत्य गुरू शुक्राचार्य दैत्यांना मदत करतात. युद्धात बळी पडलेल्या दैत्यांना आपल्याकडे असलेल्या संजीवनी मंत्राद्वारे ते पुन्हा पुन्हा जिवंत करत असत. त्यामुळे सर्व देव चिंताग्रस्त होऊन त्यांनी महादेवांना यावर उपाय शोधण्याची विनंती केली. त्यावर महादेवांनी सांगितले की मी शुक्राचार्यांना दिलेला संजीवनी मंत्र जर षटकर्णी झाला (सहा कानांनी ऐकला गेला) तरच त्याचा प्रभाव लोप पावेल. यावर उपाय म्हणून सर्व देवांनी बृहस्पतीपुत्र कचदेव यांना संजीवनी मंत्र प्राप्त करण्यासाठी गुरू शुक्राचार्यांकडे विद्याभ्यासासाठी पाठविले.
सर्व देवांनी सुचविल्यानुसार कचदेव गुरू शुक्राचार्यांकडे विद्याभ्यासाचे धडे घेऊ लागले. गोदावरी नदीच्या उत्तर तीरावरील आश्रमात (सध्या असलेले कचेश्वर मंदिर) इतर शिष्यांसोबत कचदेव राहत असत व तेथून गोदावरीच्या दक्षिण तीरावर (सध्याचे गुरू शुक्राचार्य मंदिर) विद्याभ्यासासाठी गुरू शुक्राचार्यांकडे येत असत. त्यासाठी कचदेवांना दक्षिण गंगा म्हणून प्रसिद्ध असलेली गोदावरी नदी ओलांडून यावे लागत असे. नदी ओलांडून येणे धोकादायक होते ही अडचण लक्षात घेऊन गुरू शुक्राचार्यांनी कचदेवांसाठी आपल्या कोपराने गोदावरीचा प्रवाह बदलला व त्यांचा आश्रमात येण्याचा मार्ग सुकर केला. असे सांगितले जाते की गुरू शुक्राचार्यांनी हाताच्या कोपराने गोदावरीचा प्रवाह बदलल्याने या भागास कोपरगाव असे नाव पडले.
नम्र स्वभाव, अभ्यासू व शिस्तप्रिय या गुणांमुळे काही दिवसांनी कचदेव शुक्राचार्यांबरोबरच त्यांची कन्या देवयानीस मनोमन आवडू लागले. शुक्राचार्यांचा लाडका शिष्य झाल्यामुळे इतर दैत्य मात्र कचदेवाचा तिरस्कार करू लागले. अनेकदा त्यांनी कचदेवास ठार मारले, परंतु संजीवनी मंत्रामुळे शुक्राचार्य त्याला पुन्हा जिवंत करीत असत. आपल्या प्रयत्नांना यश येत नाही हे पाहून दैत्यांनी पुन्हा कचदेवास ठार करून त्याच्या शरीराची राख शुक्राचार्यांना पेयामधून प्राशन करविली. कचदेव आपल्या पोटात आहे हे गुरू शुक्राचार्यांना अंतरज्ञानाने कळले, परंतु आता संजीवनी विद्या वापरली तर आपले पोट फाडून कचदेव बाहेर येईल व त्यात आपला मृत्यू होईल, यासाठी त्यांनी आपल्याकडे असलेली संजीवनी मंत्राची विद्या कन्या देवयानी हिला शिकविली, परंतु हे करीत असताना त्यांच्या पोटात असलेल्या कचदेवांनी ही विद्या ऐकून आत्मसात केली व शुक्राचार्यांचे पोट फाडून ते बाहेर आले. त्यानंतर आपण ग्रहण केलेल्या संजीवनी मंत्राद्वारे त्यांनी गुरूंना जिवंत केले, परंतु तेव्हा हा मंत्र षटकर्णी (शुक्राचार्य, देवयानी व कचदेव यांनी ऐकल्यामुळे) झाल्यामुळे शुक्राचार्यांकडील मंत्राचा प्रभाव लोप पावला. जी विद्या मिळविणे देवांनाही शक्य नव्हते ती दैत्यांच्या एका चुकीमुळे कचदेवांस प्राप्त झाली. संजीवनी विद्येच्या प्राप्तीनंतर सर्व देवांनी आकाशातून कचदेवांवर पुष्पवृष्टी केली. असे मानले जाते की आज जेथे कचेश्वर मंदिर आहे, तेथे प्रत्यक्ष महादेव कचदेवांस आशीर्वाद देण्यासाठी आले होते.
कोकमठाण हद्दीत असलेल्या कचेश्वर मंदिराभोवती तटबंदी आहे. मंदिर परिसर प्रशस्त असून येथे कचेश्वर मंदिर व त्र्यंबकेश्वर मंदिर स्थित आहेत. अष्टकोनी असलेल्या कचेश्वर मंदिरातील चौथऱ्यावर गुरू शुक्राचार्य व कचेश्वर या गुरू–शिष्यांची लिंग स्वरूपात स्थापना केलेली आहे. कोकमठाण येथील महान संत रामदासी महाराज यांनी येथे अनेक वर्षे वास्तव्य करून विविध धार्मिक विधी व महारुद्रयाग केला. महारुद्रयागाच्या वेळी संत रामदास महाराज यांनी या पुरातन मंदिराचे जीर्णोद्धार व छत्रीचे काम केले होते.
श्रीक्षेत्र पुणतांबा येथील संत चांगदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याकरिता जात असताना संत निवृत्तीनाथ, बहीण संत मुक्ताई व प्रत्यक्ष पांडुरंग कचेश्वर मंदिरात एक महिनाभर वास्तव्यास होते, असा उल्लेख काही ग्रंथांमध्ये आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी कोपरगाव बेट येथे ‘गुरू–शिष्याची भेट’ हा मोठा उत्सव असतो. यावेळी गुरू शुक्राचार्यांच्या मंदिरातून रिकामी पालखी शिष्य कचदेवांना घेण्यासाठी या कचेश्वर मंदिरात येते. श्री कचदेव या पालखीत बसून गुरूंना सन्मानाने आपल्याकडे आणण्यासाठी जातात. शुक्राचार्य मंदिरात गुरू–शिष्यांची भेट होऊन श्री कचदेवांबरोबर गुरू शुक्राचार्य कचेश्वर मंदिरात पालखीने वाजत–गाजत येतात. येथे पूजा, रुद्रावर्तन व आरती झाल्यावर शुक्राचार्य आपल्या परम शिष्याला आशीर्वाद देऊन वाजत–गाजत पुन्हा पालखीतून आपल्या मंदिरात जातात. हा सोहळा अनुभवण्यासाठी येथे हजारो भाविक उपस्थित असतात. याशिवाय महाशिवरात्रीचा उत्सवही येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या स्थानावर कालसर्प शांती, गृहशांती, त्रिपिंडी, नारायण–नागबळी तसेच विनामुहूर्त विवाहकार्य केले जातात.