महाराष्ट्रात महादेवांची अनेक मंदिरे आहेत. त्या त्या ठिकाणी असलेल्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यांमुळे ती प्रसिद्ध आहेत. श्रीरामपूर तालुक्यात बेलापूर येथे असलेले हरिहर केशव गोविंद देवस्थान हे एक प्राचीन मंदिर आहे. जेथे लाकडी स्तंभ रूपात महादेवांचे व श्रीविष्णूंचे एकत्रित स्थान आहे. अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या किनाऱ्यावर बिल्ववनात स्थित असलेले हे जागृत तीर्थक्षेत्र लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पूर्वी या ठिकाणी अनेक बेलाची झाडे असल्यामुळे या गावाला ‘बेलापूर’ नाव पडल्याचे सांगितले जाते.
पुराणांतील उल्लेखानुसार, श्रीशंकर आणि पार्वती एकदा विहारासाठी या भागात आले असताना पार्वतीला तहान लागली. त्यावेळी श्रीशंकरांनी बेलाच्या झाडाचे पान (बेलपत्र) जमिनीवर टाकले आणि तिथे कुंडाची निर्मिती झाली, हेच ते बिल्वकुंड. या कुंडातील पाणी प्राशन करून पार्वती मनोमन प्रसन्न झाली. या कुंडात जे कोणी स्नान करतील, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, असे शुभ वचन पार्वतीने उच्चारले. तेव्हापासून हे स्थान बिल्वतीर्थ (सध्याचे बेलापूर) नावाने प्रसिद्ध आहे. मंदिराला भेट देणारे भाविक या सरोवरात आवर्जून स्नान करतात.
एका आख्यायिकेनुसार, त्रिपुरासुर राक्षसाने ब्रह्मदेवाकडून वर मिळविल्यानंतर तो देव, ब्राह्मण व ऋषी–मुनींचा संहार करू लागला. यज्ञकार्यांमध्ये अडथळे आणू लागला. त्रिपुरासुराचा बंदोबस्त करण्यासाठी सर्व देव श्रीविष्णूंकडे गेले. या समस्येवर विचार सुरू असतानाच आकाशवाणी झाली की देवहो, पृथ्वीवरील बिल्वपुरी येथील बिल्वतीर्थामध्ये स्नान करून शिवोपासना केल्यास तुमच्यावरचे विघ्न टळेल. त्यानुसार श्रीविष्णूंसहित सर्व देवांनी बिल्वतीर्थावरील सरोवरात स्नान करून शिवलिंग स्थापन केले. त्यापैकी श्रीविष्णूंनी स्थापन केलेल्या शिवलिंगाला केशव, तर इंद्राने स्थापन केलेल्या शिवलिंगाला गोविंद या नावाने संबोधले गेले. त्यानंतर महादेवांनी त्रिपुरासुराचा वध केला व हरिहर केशव गोविंदाचे दर्शन करणाऱ्यास सर्व पापांतून मुक्ती मिळेल, असा आशीर्वाद दिला.
समुद्रमंथनाच्या वेळी श्रीविष्णूंनी घेतलेले मोहिनेचे रूप श्रीशंकरांच्या सतत नजरेपुढे येई. त्यामुळे ते रूप पुन्हा पाहण्यासाठी व्याकुळ झालेल्या श्रीशंकरांनी बिल्वतीर्थ येथे असलेल्या गुहेत तपसाधना सुरू केली. महादेव अनेक दिवस समाधीत राहिल्याने कैलास पर्वतावर चिंतेचे वातावरण पसरले. त्यानंतर पार्वतीने दोन शिवगण महादेवांना शोधण्यासाठी पाठविले. शिवगणांना महादेव बिल्वतीर्थाजवळ असलेल्या गुहेत समाधीस्थ असल्याचे आढळले. तेथे आल्यावर दोघे शिवगण वीर रक्ष व वीर दक्ष हे देखील समाधीत लीन झाले. अखेरीस माता पार्वतीने ब्रह्मदेव व श्रीविष्णू यांच्यासह बिल्वतीर्थाच्या गुहेत जाऊन महादेवांना समाधीतून जागृत केले. समाधीतून बाहेर आल्यावर श्रीविष्णूंनी महादेवांना मोहिनी रूपाचे पुन्हा दर्शन दिले. या सुंदर रूपाच्या दर्शनानंतर महादेव पुन्हा कैलासावर गेले; परंतु भावसमाधीस्थ असलेले गण रक्ष व दक्ष याच ठिकाणी समाधीस्थ राहिले. हे दोघे वीर पुढे ‘वीरसाहेब’ म्हणून प्रसिद्ध झाले. असे सांगितले जाते की या हरिहर केशव गोविंद बनाचे रक्षण आजही हे वीरसाहेब करीत आहेत. या वीरसाहेबांचे मुखवटे दररोज मंदिरात पुजले जातात. माघ शुद्ध अष्टमीला वीरसाहेबांचा प्रकट दिन असतो. गोडी शेव व मुगाडंचा (दुधी भोपळा) नैवेद्य दाखवून त्यांचा सन्मान केला जातो.
बिल्वपूर येथील नागू व डांगू ही भावंडे वयाच्या आठ ते नऊ वर्षांपासून खांद्यावर भगवी पताका घेऊन पंढरीची वारी करत असत. या दोघा बंधूंना पुढे शरीर थकल्यामुळे वारीला जाणे शक्य होईना म्हणून त्यांनी विठ्ठलाला आपल्याबरोबर येण्याचे साकडे घातले. त्याच वेळी त्यांना स्वप्नदृष्टांत झाला की चंदनाचे दोन स्तंभ नदीत वाहत येताना दिसतील. त्याप्रमाणे त्यांना असे स्तंभ नदीतून वाहत येताना सापडले आणि त्यांनी त्यांची पूजा करून यथोचित प्राणप्रतिष्ठा केली. आजही या मंदिरात या स्तंभांवर रोज रुद्राभिषेक केला जातो. हरी (विष्णू) आणि हर (शंकर) यांचे मुखवटे त्यावर लावून त्यांची विधिवत पूजा केली जाते. हे ठिकाण पुढे ‘हरिहर केशव गोविंद बन’ म्हणून प्रसिद्ध झाले. आजही भाविक या चंदनाच्या स्तंभांचे दर्शन घेतात. संत नागू व डांगू यांनी याच परिसरात शरीराचा त्याग करून जगाचा निरोप घेतला. मंदिराच्या बाजूला त्यांच्या समाध्या आहेत.
श्रीरामपूरमधील बेलापूर या गावात प्रशस्त परिसरात हरिहर केशव गोविंद बन स्थित आहे. मंदिर परिसरात अनेक प्राचीन वृक्ष असल्यामुळे येथील वातावरण निसर्गरम्य व शांत भासते. मंदिर हेमाडपंती शैलीचे असून मूळ मंदिरापुढे नव्याने सभामंडप उभारला आहे. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. जमिनीपासून साधारण सात ते आठ फूट उंचीवर असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात जाण्यासाठी १० ते १२ पायऱ्या चढून जावे लागते. सभामंडपाच्या समोरच प्राचीन दीपमाळ असून या दीपमाळेच्या वरच्या बाजूला जाण्यासाठी तिच्या आतून अरुंद जिना आहे. केशव गोविंद बन व आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी आवर्जून भाविक या दीपमाळेच्या टोकावर जातात.
मंदिराच्या मुखमंडपात लहानसे शिवलिंग व नंदी आहे. तेथून पुढे सभामंडप असून सभामंडपाच्या मध्यभागी मूळ प्राचीन हेमाडपंती स्थापत्यरचनेचे संपूर्ण दगडातील मंदिर आहे. गर्भगृहात दोन चंदनाच्या लाकडांवर केशवराज व गोविंदराज यांचे चांदीचे मुखवटे लावले असून भाविक त्या मुखवट्यांची पूजा करतात. मंदिराच्या परिसरात बारव (विहीर) आहे तीच बिल्वकुंड म्हणून प्रसिद्ध आहे. याशिवाय मंदिराशेजारी परमहंस विद्यानंद स्वामी, केशवदास स्वामी, भक्तराज नागू व भक्तराज डांगू यांची समाधीस्थाने आहेत.
श्रावण महिन्यात दर सोमवारी या देवस्थानाची यात्रा भरते. पहाटे काकड आरती, संध्याकाळी शेजारती पार पडते. बेलापूर बन, बेलापूर बुद्रुक आणि उक्कलगाव या तीन ठिकाणी हरिहराचे शिवलिंग असून या ठिकाणची पायी यात्रा केल्यास काशी विश्वेश्वराची यात्रा केल्याचे पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. महाशिवरात्र, आषाढी एकादशी, धूलिवंदन या दिवशी येथे उत्सव साजरे होतात. चैत्र शुद्ध षष्ठीला देवाचा प्रकटदिन साजरा केला जातो. त्या दिवशी आलेल्या भाविकांना महाप्रसाद दिला जातो. भाविकांसाठी प्रसादालय आणि भक्त निवासाची येथे सुविधा आहे. या देवस्थानाला राज्य सरकारने तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा दिलेला आहे.