गोरक्षनाथ मंदिर,

धामापूर (धामोरी), ता. कोपरगाव, जि. नगर

कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील गोरक्षनाथ मंदिर परिसर अडबंगीनाथांची (माणिकनाथ) जन्मभूमी, तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अडबंगीनाथांनी १२ वर्षे तपश्चर्या केल्यानंतर गोरक्षनाथांनी त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली व पुढील कार्यासाठी आपल्यासोबत नेले. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे गोरक्षनाथ मंदिरासमोर असलेला गोरक्ष चिंचेचा महाकाय वृक्ष. अतिप्राचीन असलेल्या या वृक्षाला नऊ विराट फांद्या आहेत, त्यामुळे या वृक्षाला ‘नवनाथांची चिंच’ असेही म्हटले जाते. आयुर्वेद शास्त्रानुसार ‘बहुरोग नाशक’ असे हे झाड आहे.

या स्थानाची आख्यायिका अशी की पूर्वीच्या काळी माणिक नावाचा शेतकरी शेतामध्ये काम करीत असताना गोरक्षनाथ तेथे आले. त्यांनी माणिकजवळ काहीतरी खाण्यास मागितले. माणिकनेही त्वरित आपल्याजवळ असलेली शिदोरी व पाणी त्यांना दिले. स्वतःसाठी आणलेली शिदोरी दिल्याने गोरक्षनाथ माणिकवर प्रसन्न झाले व तुला काही वर मागायचा असेल तर माग, असे म्हणाले. त्यावर माणिक म्हणाला, मीच तुला माझी शिदोरी दिली, तू मला काय वर देणार? तुझे पोट भरले असेल तर आता तू येथून निघून जा. त्यावर गोरक्षनाथ माणिकला म्हणाले, तुला जर माझ्याकडून वर नको असेल तर तूच मला वर दे. माणिकने त्याला संमती दिली. त्यावर गोरक्षनाथांनी सांगितले की इच्छेला जे येईल ते तू करू नकोस. माणिकला वाटले त्यात काय असे अवघड आहे, म्हणून त्याने गोरक्षनाथांना होकार दिला.

सूर्य अस्ताला जाण्याची वेळ झाल्यानंतर गोरक्षनाथ तेथून निघून गेले. संध्याकाळ झाल्यावर माणिकने आपले औत (नांगर) सोडले व ते डोक्यावर घेतले. त्यानंतर घराकडे जावे, अशी इच्छा त्याच्या मनात येताच त्याला गोरक्षनाथांना दिलेले शब्द आठविले. तो तसाच डोक्यावर औत घेऊन तेथेच एक तप तटस्थ उभा राहिला. १२ वर्षे एकाच जागेवर राहिल्याने माणिकच्या शरीरात त्राण उरले नव्हते.

एके दिवशी गोरक्षनाथ गुरू मच्छिंद्रनाथ व चौरंगीनाथांसह येथे आले. गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना माणिकबद्दल सांगितले. दिलेल्या शब्दाला माणिक जागला होता. मच्छिंद्रनाथ व चौरंगीनाथ येथे असलेल्या गोरक्ष चिंचेखाली आसनावर बसले. मच्छिंद्रनाथ म्हणाले, खरोखरच तू महान तपस्वी आहेस. तुझ्यासारख्यांचा गुरू करून अनुग्रह घ्यावा, अशी माझी इच्छा आहे. त्यावर माणिकने स्वभावानुसार प्रत्युत्तर केले की मी का गुरू होऊ तुमचा, त्याऐवजी तुम्हीच माझे गुरू व्हा. त्यानंतर गोरक्षनाथांनी माणिकच्या कानावर आपले मुख लावत कान फुंकताच तो सज्ञान झाला. त्यांच्या मंत्राने माणिकच्या कानात प्रवेश करताच तो ब्रहस्पतीसमान (देवांचे गुरू) विद्वान झाला. गोरक्षनाथांनी माणिकला हात धरून चिंचेखाली आणले आणि मच्छिंद्रनाथाला सांगितले की हा अडबंग आहे, त्यास ‘अडबंगीनाथ’ असे ओळखले जावे. अडबंगीनाथाला या चिंचेच्या झाडाखाली नाथ संप्रदायाची दीक्षा देऊन निर्धारित यात्रेस गोरक्षनाथ आपल्यासोबत घेऊन गेले.

या परिसरात छोटेखानी गोरक्षनाथ मंदिर, अडबंगीनाथांचे मंदिर व जेथे त्यांनी दीक्षा घेतली ते महाकाय चिंचेचे झाड आहे. एका उंच जगतीवर (जोते) असलेल्या गोरक्षनाथांच्या मंदिराचे सभामंडप व गर्भगृह असे स्वरूप आहे. सभामंडपात नाथांची पालखी ठेवण्यात आली आहे, उत्सवाच्या वेळी या पालखीतून नवनाथांची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. गर्भगृहात ९ नाथांच्या मूर्ती स्थानापन्न आहेत. मंदिराभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. या मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही.

गोरक्षनाथ मंदिराच्या समोरील बाजूस गोरक्ष चिंचेच्या झाडाखाली अडबंगीनाथ यांचे मंदिर आहे. याच ठिकाणी अडबंगीनाथ यांनी तप केले होते व या चिंचेच्या झाडाखाली त्यांना गोरक्षनाथांनी दीक्षा दिली होती. या चिंचेचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या भल्यामोठ्या खोडामध्ये चार व्यक्ती बसू शकतील अशी जागा आहे. या चिंचेच्या खोडात पूर्वेकडून पश्चिमेकडे निघण्याचा भुयारी मार्गही आहे.

अशी आख्यायिका आहे की पूर्वीच्या काळी लग्न वा धार्मिक कार्यासाठी या भुयारातून भांडी उपलब्ध होत असत. काम झाल्यावर ती भांडी या भुयाराजवळ ठेवल्यास ती आत जात असत. हे झाड पानगळ प्रकारातील आहे, परंतु याच्या नऊ फांद्यांपैकी आठ फांद्यांची पाने गळून जोपर्यंत नवीन पालवी फुटत नाही, तोपर्यंत नवव्या फांदीची पाने गळत नाहीत. असे सांगितले जाते की या झाडाची पाने, फळे व साल औषधी असून त्यामुळे अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. या झाडाच्या बियांपासून वा फांद्यांपासून पुन्हा नवीन रोपे तयार होत नाहीत, हे एक आश्चर्य समजले जाते. (इतर ठिकाणी असलेल्या गोरक्ष चिंचेच्या झाडांच्या बियांतून नवीन रोपे तयार होतात.)

श्रीमच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, चौरंगीनाथ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले व अडबंगीनाथ यांची जन्मभूमी व तपोभूमी असलेले हे स्थान नाथ संप्रदायात विशेष प्रिय समजले जाते. माघ शुद्ध द्वितीया या दिवशी येथे धर्मबीज उत्सव साजरा केला जातो. (या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली होती, त्यामुळे नाथपंथात या तिथीला महत्त्व आहे.) या दिवशी हजारो नाथपंथीय व भाविक उत्सवात सहभागी होतात.


उपयुक्त माहिती:

  • कोपरगावपासून २३ किमी, तर अहिल्यानगरपासून १२० किमी अंतरावर
  • कोपरगाव व येवला येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • निवास व न्याहरीसाठी येथे सुविधा नाहीत
  • कोपरगाव, येवला या शहरात निवासासाठी अनेक पर्याय
Back To Home