गजानन महाराज मंदिर

नारायण नगर, दर्यापूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात, नारायण नगर परिसरात श्री गजानन महाराज मंदिर आहे. विदर्भाच्या संतपरंपरेतील विदेही संत गजानन महाराजांचे हे एक उपासना केंद्र मानले जाते. हे देवस्थान शेगावच्या मुख्य पीठाचे उपपीठ म्हणून ओळखले जाते. ज्या भाविकांना नित्य दर्शनासाठी शेगावला जाणे शक्य होत नाही, त्यांच्या सोयीसाठी या देवस्थानाची उभारणी केली गेली. दर्यापूर आणि परिसरातील भाविकांसाठी हे एक श्रद्धास्थान बनले आहे. या मंदिरात गजानन महाराजांच्या प्रकटदिनासह विविध उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात.

दर्यापूर परिसराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अमरावती जिल्हा गॅझेटिअरमधील ऐतिहासिक नोंदींनुसार, इसवी सन १५०० च्या सुमारास हा भूभाग वऱ्हाडच्या इमादशाही सत्तेखाली होता. इ.स. १५२९ मध्ये अलाउद्दीन इमादशहाच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेल्या दर्या इमादशहाने (इ.स. १५२९ ते १५६२) पूर्णा नदीची उपनदी असलेल्या चंद्रभागा नदीच्या काठी हे नवे शहर वसवले. त्याच्याच नावावरून या गावाला दर्यापूर असे नाव पडले. इ.स. १५६२ नंतर इमादशाही लयास गेली. पुढील काळात वऱ्हाड प्रांतात मुघल तसेच निजामाची सत्ता प्रस्थापित झाली. सत्तासंघर्षाच्या या काळातही दर्यापूरची कृषी परंपरा अबाधित राहिली. कापसाचे उत्पादन आणि व्यापार यामुळे शहराचा विकास होत गेला. इ.स. १९०५ च्या प्रशासकीय पुनर्रचनेनंतर दर्यापूर हा अमरावती जिल्ह्याचा भाग बनला. अचलपूर-मूर्तिजापूर या नॅरो गेज रेल्वेमार्गामुळे शहराच्या व्यापारी विकासाला गती मिळाली. विसाव्या शतकात कापूस, जिनिंग, सरकी काढणे आणि हातमाग हे या शहराच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख अंग बनले. इ.स. १९३७ मध्ये येथे नगरपालिका अस्तित्वात आली. इ.स. २००० पर्यंत दर्यापूर-बनोसा हे अमरावती जिल्ह्यातील प्रमुख कृषी, व्यापारी आणि प्रशासकीय केंद्र म्हणून वेगाने विकसित झाले. याच काळात नारायण नगर ही नवी वसाहत आकाराला आली.
दत्तात्रेय आणि नाथ परंपरेत श्री गजानन महाराजांना उच्च कोटीचे अवतारी पुरुष मानले जाते. महाराजांचे प्रथम दर्शन शके १८०० मध्ये, म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजी माघ वद्य सप्तमीला शेगाव येथे झाले. ते दिगंबर अवस्थेत उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण खात असताना गावच्या पाटलांना दिसले. त्यांचे दिव्य तेज पाहून पाटलांनी ते अवतारी पुरुष असल्याचे ओळखले. महाराजांनी त्यांच्या सुमारे ३२ वर्षांच्या शेगाव वास्तव्यात नामस्मरण, ईश्वरभक्ती, सदाचार आणि सेवाभाव या तत्त्वांचा अंगीकार व प्रसार केला. ८ सप्टेंबर १९१० रोजी, भाद्रपद शुक्ल पंचमीला (ऋषिपंचमी) त्यांनी शेगाव येथे संजीवन समाधी घेतली. त्यानंतर शेगावात त्यांचे समाधी मंदिर उभे राहिले. त्यांच्या समाधी दर्शनाने भौतिक जीवनातील संकटे दूर होतात, या भाविकांच्या श्रद्धेतून विदर्भात अनेक ठिकाणी गजानन महाराजांच्या मंदिरांची निर्मिती झाली. दर्यापूर शहरात नारायण नगर वसाहतीचा विस्तार होत असताना परिसरातील गजानन महाराजांच्या स्थानिक भक्त परिवाराने एकत्र येऊन या मंदिराची उभारणी केली. भाविकांनी लोकसहभागातून मंदिरासाठी जागा निश्चित करून बांधकामाला सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने प्रांगण, सभामंडप आणि गर्भगृहाची निर्मिती करून मूर्तीची शास्त्रोक्त प्रतिष्ठापना करण्यात आली.

रस्त्यालगत असलेल्या या मंदिराभोवती तटबंदी उभारलेली आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर पेव्हर ब्लॉक बसवलेले प्रांगण लागते. प्रांगणात तुळशीवृंदावन, पाणपोई आणि भाविकांना बसण्यासाठी तटबंदीच्या भिंतीलगत आसने आहेत. मुख्य मंदिरासमोर एका उंच चौथऱ्यावर हनुमानाचे देवालय आहे. त्यात जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. या चौथऱ्याच्या चारही बाजूंनी संरक्षक कठडा आहे. या मंदिरात वज्रपीठावर मारुतीची उभ्या स्थितीतील मूर्ती आहे. मूर्तीच्या डाव्या खांद्यावर गदा आहे व तिचा उजवा हात आशीर्वाद मुद्रेत आहे. हनुमान मंदिराच्या प्रवेशद्वारावर अलंकरण कोरलेले आहे. छतावर घुमटाकार शिखर आहे. मुख्य गजानन महाराज मंदिराची वास्तू सभामंडप आणि गर्भगृह अशी दोन भागांत विभागलेली आहे. प्रांगणापेक्षा उंचावर असलेल्या सभामंडपात येण्यासाठी पायऱ्यांची रचना आहे. बंदिस्त सभामंडपात हवा आणि प्रकाश येण्यासाठी भिंतींमध्ये वातायने आहेत. येथील भिंतींवर ‘श्री गजानन दिग्विजय’ ग्रंथातील महाराजांच्या चरित्रावरील प्रसंगचित्रे लावली आहेत. प्रत्येक चित्राखाली त्या प्रसंगाचे वर्णन लिहिले आहे. याच मंडपात उत्सवात वापरली जाणारी पालखी ठेवलेली असते.

गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवरील दोन देवकोष्टकांपैकी एका देवकोष्टकात विठ्ठल-रुक्मिणी आणि दुसऱ्या देवकोष्टकात श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाजवळ महाराजांची गुरुगादी व तसबीर आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर नक्षीदार द्वारशाखा कोरलेली आहे. आतील वज्रपीठावर श्री गजानन महाराजांची ध्यानस्थ मुद्रेतील बैठी मूर्ती आहे. महाराजांच्या हातात चिलीम दर्शवली आहे. मूर्तीच्या मागे पाठशिळेवर महिरपी तोरण कोरलेले आहे. मूर्तीसमोरील वज्रपीठावर संगमरवरी पद्मपादुका स्थापित केल्या आहेत. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने सभामंडपातून जाणारा प्रदक्षिणामार्ग आहे. गर्भगृहाच्या छतावर षटकोनी आकाराचे शिखर बांधलेले आहे. शिखराचा मध्यभाग फुगीर आणि शीर्षभाग निमुळता होत गेलेला आहे. त्याच्या माथ्यावर आमलक व कळस उभारलेला आहे.
मंदिरात दररोजची दिनचर्या शास्त्रोक्त पद्धतीने पार पडते. पहाटे सहा वाजता मंदिराचे कवाड उघडल्यानंतर काकड आरती आणि मूर्तीवर महाअभिषेक केला जातो. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले राहते. दुपारी महानैवेद्य अर्पण करून माध्यान्ह आरती होते. सायंकाळच्या वेळी धूपारती व संध्या आरती केली जाते. रात्री शेजारती झाल्यावर नऊ वाजता दैनंदिन विधींची सांगता होते. नित्यपूजेत आणि भजनाच्या वेळी भाविकांकडून ‘गण गण गणात बोते’ या मंत्राचा जप केला जातो. दर गुरुवारी मंदिरात भाविकांची विशेष गर्दी असते.

माघ वद्य सप्तमीला येणारा श्री गजानन महाराज प्रकटदिन हा येथील सर्वांत मोठा वार्षिक उत्सव मानला जातो. या दिवशी मंदिरात अभिषेक, महापूजा, अखंड नामजप आणि भजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रकटदिनानिमित्त ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत महाराजांच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा निघते. यावेळी परिसरातील भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. यावेळी अनेक भक्त मंदिरात येऊन दर्शन घेतात. भाद्रपद महिन्यात मंदिरात पार्थिव गणेशाची स्थापना करून दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. भाद्रपद शुक्ल पंचमीला महाराजांचा संजीवन समाधी दिन म्हणजेच ऋषिपंचमी उत्सव भक्तीभावाने पार पडतो. या सर्व उत्सवांच्या काळात मंदिरात ग्रंथपारायण, नामस्मरण व कीर्तनाचे आयोजन केले जाते.

उपयुक्त माहिती :

  • दर्यापूर बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • अमरावती शहरापासून ५२ किमी अंतरावर
  • शहरातील विविध भागांतून ऑटोरिक्षांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या प्रांगणापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
Back To Home