लेण्यांच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातील समृद्ध राज्य मानले जाते. देशभरात एकूण १००० लेण्या असून त्यातील ८०० हून जास्त लेण्या या केवळ महाराष्ट्रात आहेत. त्यातील अजिंठा, वेरूळ व एलिफंटा या तीन लेण्यांचा जागतिक वारसा शिल्पस्थानात (UNESCO) समावेश झालेला आहे. राज्यातील सर्वाधिक लेण्या पुणे जिल्ह्यात असल्या तरी अहमदनगर जिल्ह्यातही काही वैशिष्ट्यपूर्ण लेण्या आहेत. त्यापैकीच पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर लेणी ‘गुहा मंदिर’ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे महादेवाचे मंदिर व प्राचीन लेणी असा संगम पाहायला मिळतो.
कल्याण–नगर मार्गावर पारनेर तालुक्यात टाकळी ढोकेश्वर हे गाव आहे. या गावाबाहेर असलेल्या डोंगरात ही लेणी आहेत. इतिहास संशोधकांच्या मते ५व्या ते ६व्या शतकादरम्यान ती कोरली गेली असावीत. एका आख्यायिकेनुसार अज्ञातवासाच्या काळात पांडवांनी ही लेणी कोरली असून त्यांना येथे महादेवांची स्वयंभू पिंडी सापडली. तेव्हापासून हे स्थान श्री क्षेत्र ढोकेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. हे जागृत स्थान असून ढोकेश्वर नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
ढोकेश्वर गुहा मंदिर ज्या डोंगरात आहे तेथील विशेष बाब म्हणजे त्या डोंगराचा आकारही शिवलिंगासारखा आहे. स्थापत्यकलेचा सुंदर नमुना म्हणून हे मंदिर ओळखले जाते. मंदिरात जाण्यासाठी डोंगराच्या पायथ्यापासून पायरी मार्ग आहे. या मार्गाच्या बाजूला मुख्य प्रवेशद्वाराच्या अलीकडे २ समाधी मंदिरे असून तेथे एक शरभ शिल्प आहे. (शरभ म्हणजे एक प्रकारचा अक्राळविक्राळ प्राणी. हिरण्यकश्यपूच्या वधानंतर नरसिंहाला शांत करण्यासाठी महादेवांनी शरभ प्राण्याचा अवतार घेतला होता, असे मानले जाते.)
पायरी मार्ग संपून तटबंदीच्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करताना एखाद्या किल्ल्यात प्रवेश करीत असल्याचा भास होतो. मंदिराच्या प्रांगणात दीपमाळ आहे. ढोकेश्वर मंदिराच्या दालनासमोर दोन चौकोनी स्तंभ व दोन अर्धस्तंभ आहेत. तेथील भिंतीवर गजलक्ष्मी व हातात फुले घेतलेल्या दोन द्वारपालांची शिल्पे आहेत.
सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या मध्यभागी दगडी नंदी स्थानापन्न असून एका भिंतीवर वृक्षांखाली बसलेल्या सप्तमातृकांच्या मूर्ती त्यांच्या वाहनांसह कोरलेल्या आहेत. सप्तमातृका या विविध देवांच्या शक्ती होत. त्या मातृकांच्या हातात असलेल्या आयुधांवरून आणि पायाशी असलेल्या वाहनावरून त्या कोणत्या देवाच्या शक्ती आहेत हे समजते. हत्तीवरून ऐन्द्री (इंद्राची शक्ती), वराहमुखावरून वाराही (विष्णूची शक्ती), नंदीवरून पार्वती (शिवाची शक्ती) अशी त्यांची ओळख आहे. या सप्तमातृकांच्या एका बाजूला गणपती व दुसऱ्या बाजूला वीरभद्र यांच्या मूर्ती आहेत. सप्तमातृकापटाच्या शेजारी काळाची नग्नप्रतिमा आहे. याशिवाय येथील भिंतीवर भैरव, नागदेवता, आयुधपुरुष आणि त्रिशूळ पुरुष या मूर्ती आहेत.
मंदिराचा गाभारा वैशिष्ट्यपूर्ण आहे. गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा मार्ग कोरलेला आहे. या मार्गात एक गुहा असून त्यातही अनेक शिल्पे आहेत. प्रदक्षिणा मार्गावर वीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोरण्यात आलेली वीरगळ, शिवलिंग आणि मोठा नंदी आहे. गर्भगृहातील चौथऱ्यावर शिवलिंग आहे. पुरातत्त्व खात्याने ढोकेश्वर मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
मंदिराच्या वरच्या बाजूने वाहत येणारे पाणी नैसर्गिकरीत्या एका दगडातील कुंडात साठवले जाते. पाणी साठवण्याची ही प्राचीन पद्धत आजच्या काळातही या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची तहान भागवण्यासाठी उपयुक्त ठरते. डोंगरावरील पाणी खालील कुंडात येण्यासाठी दगड कोरून त्यासाठी मार्ग तयार करण्यात आला आहे. या कुंडाच्या वरील बाजूला आणखी एक पाण्याचे टाक आहे, त्याला ‘सीता न्हाणी’ असे म्हटले जाते. या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी दगडांत पायऱ्या बनविण्यात आल्या आहेत. येथून टाकळी ढोकेश्वर व आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते.
श्रावण महिन्यात हा परिसर नयनरम्य भासतो. याच महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी ढोकेश्वराची मोठी यात्रा भरते. यावेळी हजारो भाविक पहाटेपासून दर्शनाला येतात. पहाटे शिवलिंगाला अभिषेक करून यात्रा सुरू होते. दुपारी छबिन्याची (पालखी) मिरवणूक काढली जाते. त्यानंतर कुस्त्यांच्या स्पर्धा होतात. या स्पर्धेसाठी राज्यातील विविध भागांतून शेकडो मल्ल येतात. यात्रेसाठी आलेल्या भाविकांना खिचडीचा महाप्रसाद देण्यात येतो.