देवनाथ महाराज मठ

अंजनगाव सुर्जी, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे शहानूर नदीच्या तीरावर श्री देवनाथ महाराज मठ वसला आहे. हे ठिकाण दत्तात्रेय आणि जनार्दन स्वामी यांच्या नाथ संप्रदायातील प्रमुख गुरुपीठ मानले जाते. या मठात प्रामुख्याने दत्तप्रभू, श्रीराम, जानकीमाता आणि हनुमंताची नित्य उपासना चालते. पीठाचे संस्थापक देवनाथ महाराज यांना परंपरेने हनुमानाचा अवतार मानले जाते. मठाच्या संकुलात देवनाथ महाराजांच्या मुख्य स्थानासह परंपरेतील अन्य संतांच्या समाध्या आणि विविध देवतांची मंदिरे उभारली आहेत. माघ वद्य तृतीयेला होणारा देवनाथ महाराजांचा पुण्यतिथी सोहळा आणि मार्गशीर्ष महिन्यातील दत्तजयंती महोत्सव हे येथील मुख्य उत्सव आहेत.

अंजनगाव सुर्जी परिसराला ऐतिहासिक आणि व्यापारी पार्श्वभूमी लाभली आहे. सोळाव्या शतकात अबुल फजल याने लिहिलेल्या ‘आइन-ए-अकबरी’ ग्रंथातील नोंदीनुसार वऱ्हाड सुभ्यातील प्रमुख ४६ महालांपैकी अंजनगाव हा ३२ लाख दाम महसुलाचा महाल होता. अठराव्या शतकात विठोजी नारायण यांना अंजनगावची वतनदारी मिळाल्यावर त्यांना ‘सुर्जी’ ही पदवी बहाल करण्यात आली. मराठ्यांच्या इतिहासात ३० डिसेंबर १८०३ रोजी याच ठिकाणी दौलतराव शिंदे आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात ‘सुर्जी-अंजनगावचा तह’ झाला. मठाच्या शेजारून वाहणाऱ्या शहानूर नदीबाबत स्थानिक आख्यायिका सांगितली जाते. पांडव वनवास काळात या भागात आल्यावर येथे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले होते. धर्मराज युधिष्ठिराच्या आज्ञेवरून अर्जुनाने जमिनीत बाण मारला. या बाणाने जल निर्माण झाल्यामुळे नदीला ‘शरनीरा’ हे नाव मिळाले आणि पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ‘शहानूर’ नाव पडले. मठाजवळ ही नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे येते, मठासमोर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते आणि पुढे दक्षिणेकडे वळते. याच नदीकाठी देवनाथ महाराजांनी बालपणी तपश्चर्या केली.

स्थानिक जहागीरदार देशपांडे घराण्यात इ.स. १७५३ च्या सुमारास जन्मलेल्या देवनाथ महाराजांची पुढे सद्‌गुरू गोविंदनाथ महाराजांशी भेट झाली. इ.स. १७७९ मध्ये जालना येथील मठात त्यांचा दीक्षा व पट्टाभिषेक सोहळा पार पडला. या मठाची गुरुपरंपरा नृसिंह सरस्वती, जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, नित्यानंदनाथ, कृष्णानंदनाथ, विश्वनाथ, मुऱ्हारनाथ, रंगनाथ, गोपाळनाथ आणि गोविंदनाथ महाराज अशी अखंड चालत आली आहे. देवनाथ महाराजांनी भारतभ्रमण करून नाथ संप्रदायाचा प्रसार केला. वयाच्या ६८ व्या वर्षी इ.स. १८२१ मध्ये ग्वाल्हेर येथील शिंदे संस्थानच्या फुलबाग परिसरात त्यांनी योगाग्नी समाधी घेतली. त्यानंतर या पीठावर दयाळनाथ, जयकृष्णनाथ, रामकृष्णनाथ, भालचंद्रनाथ, मारोतीनाथ, द्वितीय गोविंदनाथ आणि मनोहरनाथ महाराज यांनी कार्यभार पाहिला.

देवनाथ महाराज मठ ही मराठा वास्तुकलेतील गढीसदृश रचना आहे. मठाभोवती दगडी तटबंदी आहे. प्रवेशद्वारावर जाड लाकडी झडपा आहेत. या दरवाजाच्या पहिल्या मजल्यावर नगारखाना बांधलेला आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर चौकोनी आकाराचे मोकळे प्रांगण दिसते. या प्रांगणाच्या चारही बाजूंना नक्षीकाम केलेले सागवानी लाकडी खांब आणि महिरपी कमानी असलेल्या दुमजली ओवऱ्या उभारल्या आहेत. प्रांगणात प्राचीन वटवृक्ष, औदुंबर आणि पिंपळाचा पार आहे. या पाराजवळ पूर्वी मठाचे रक्षण करताना प्राणार्पण करणाऱ्या ‘जगू-गणू’ या दोन वीरांची समाधी आहे. मंदिराच्या दर्शनी भागात तुळशीवृंदावने आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या देवकोष्टकांमध्ये द्वारपालांची शिल्पे आहेत. प्रवेशद्वारावर महिरपी तोरण कोरलेले आहे.

आतील सभामंडपात लाकडी नक्षीदार खांब एकमेकांना कमानींनी जोडले आहेत. मध्यभागी लाकडी मखरात गुरुगादी व पादुकापीठ आहे. सभामंडपाच्या पुढे दगडी गर्भगृह आहे. या गर्भगृहातील वेदीवर पद्मासनात ध्यानस्थ बसलेली सद्‌गुरू देवनाथ महाराजांची मूर्ती आहे. मूर्तीच्या मागे असलेल्या चांदीच्या प्रभावळीवर सूर्य, चंद्र आणि पानाफुलांची नक्षी कोरली आहे. या मुख्य स्थानाभोवती भिंतींवर पूर्वीच्या पीठाधीशांची चित्रे लावली आहेत. गर्भगृहाच्या परिसरात श्रीराम, जानकीमाता आणि त्रिमुखी दत्तात्रेयांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. मठाच्या एका स्वतंत्र देवकक्षात नाथ संप्रदायाचे प्रतीक मानली गेलेली अखंड धुनी देवनाथ महाराजांच्या काळापासून प्रज्वलित ठेवलेली आहे. मठात जुनी हस्तलिखिते, पोथ्या आणि ऐतिहासिक पत्रव्यवहारांचा संग्रह जतन केलेला आहे. संकुलात गोशाळा, अन्नछत्र, वेदपाठशाळा आणि भक्तनिवास यांच्या इमारती आहेत.

मठाची दिनचर्या पहाटे पाच वाजता काकड आरती व भूपाळीने सुरू होते. त्यानंतर सद्‌गुरूंच्या चरणपादुकांवर पंचामृत अभिषेक, चंदनलेपन व पूजा चालते. सकाळी सहा ते दुपारी बारा या वेळेत भाविकांना येथे दर्शन घेता येते. दुपारी बारा वाजता महानैवेद्य अर्पण करून माध्यान्ह आरती केली जाते. दुपारी एक ते तीन या वेळेत गर्भगृह बंद राहते. दुपारी तीन वाजता मठाचे दरवाजे पुन्हा दर्शनासाठी खुले होतात. सायंकाळी सात वाजता सांध्यधूपारती होते. रात्री आठ ते नऊ या वेळेत भाविक हरिपाठ, भजन आणि नाथ परंपरेतील पदांचे गायन करतात. रात्री साडेनऊच्या सुमारास शेजारती करून मठाचे दरवाजे बंद केले जातात. नवरात्र, विजयादशमीचा श्रीराम रथोत्सव, महाशिवरात्रीचा महारुद्राभिषेक आणि फाल्गुन महिन्यात निघणारी पारंपरिक श्रीनाथ महाभिक्षा फेरी हे येथील नियमित विधी आहेत.

उपयुक्त माहिती

  • अंजनगाव सुर्जी बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • अमरावती शहरापासून ८२ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून बसची सुविधा उपलब्ध
  • खासगी वाहने मठापर्यंत येऊ शकतात
  • मठ संकुलात भक्तनिवास आणि महाप्रसादाची सोय उपलब्ध
  • संपर्क मठ कार्यालय, मो. ९०९६२७९०८९, ९८८११९०२१०
Back To Home