दत्त मंदिर

शिंगवे दत्ताचे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिंगवे हे गाव येथील प्रसिद्ध स्वयंभू श्रीदत्त देवस्थानामुळे शिंगवे दत्ताचे म्हणून प्रसिद्ध आहे. गाणगापूर येथील श्रीदत्त येथे प्रकट झाले त्यांनी येथे वास्तव्य केले, अशी मान्यता आहे. येथील प्राचीन औदुंबराच्या झाडाला जमिनीपासून फुटलेल्या फांद्या हे श्रीदत्तांचे मूळ स्थान समजले जाते. फांद्यांवर चांदीचे मुखवटे लावून त्यांची येथे पूजा होते. राज्यभरातील अनेक ठिकाणांहून पीडित, मनोरुग्ण येथे आल्यावर काही दिवसांनी बरे होऊन जातात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे हे देवस्थान हजारो भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे.

या स्थानाबाबतची आख्यायिका अशी की वत्सलाबाई साबळे ऊर्फ आक्का या वयाच्या व्या वर्षी (१९६३ साली) मामाच्या लहान मुलाचा सांभाळ करण्यासाठी शिंगवे गावात आल्या होत्या. मामाच्या मुलाला झोका देत असताना जवळच असलेल्या औदुंबराच्या झाडातून त्यांना वीज चमकल्याचा भास झाला. त्यावेळी त्या झाडाजवळ आल्या असता त्यांना साक्षात श्रीदत्त झाडातून प्रकट झाल्याचे दिसले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे आक्का घाबरल्या तेथेच त्यांची शुद्ध हरपली. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी हा प्रकार मामासह ग्रामस्थांना सांगितला. ग्रामस्थांनीही आक्काच्या सांगण्यावर विश्वास ठेवून त्या झाडाभोवती श्रीदत्तांचे स्थान तयार केले. दिवसेंदिवस येथील देवस्थानाची ख्याती पंचक्रोशीतून तालुक्यात जिल्ह्यात पसरली. त्यामुळे दररोज हजारो भाविक येथे दर्शनाला येऊ लागले. आज ६० वर्षांनंतरही आक्का ब्रह्मचर्य स्वीकारून या ठिकाणी श्रीदत्तांची भक्ती भाविकांची सेवा करत आहेत.

महिन्यातील अमावस्या पौर्णिमेला आक्का येथे समस्याग्रस्त भाविकांना मार्गदर्शन करून त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी उपाय सुचवितात. त्यानुसार मानसिक दुर्बल पीडित व्यक्तींना येथे सेवा केल्यानंतर गुण आल्याचे सांगितले जाते. दर गुरुवारी, अमावस्या पौर्णिमेला येथे हजारो भक्त दर्शनाला येतात. या दिवशी आलेल्या भाविकांना येथे अन्नदान करण्यात येते.

शिंगवे दत्ताचे येथील श्रीदत्त मंदिर परिसर प्रशस्त असून भाविकांच्या सुविधेसाठी मंदिरासमोर मोठी पत्र्याची शेड उभारण्यात आली आहे. परिसरात फरसबंदी असून मंदिराच्या आत प्रवेश केल्यावर प्रथम श्रीदत्तांच्या पितळी पादुकांचे दर्शन होते. येथील मंदिर हे रूढार्थाने मंदिर नसून तेथील औदुंबराच्या झाडाच्या फांद्यांना वस्त्र अलंकार घालून सजविण्यात येते त्यावर ब्रह्मा, विष्णू महेश या श्रीदत्तांच्या रुपांचे मुखवटे लावले जातात. भाविकांकडून याच झाडाची पूजा होते. त्याच्या बाजूलाच पितळी त्रिशूळ डमरू आहे. या औदुंबराभोवती रेलिंग लावण्यात आले असून प्रदक्षिणा मार्ग बनविण्यात आला आहे. भाविकांना या रेलिंगच्या बाहेरून श्रीदत्तांचे दर्शन घ्यावे लागते. उत्सवाच्या वेळी सोवळ्यात भाविकांना या झाडाजवळ जाऊन श्रीदत्तांचे दर्शन घेता येते. या औदुंबराच्या मागच्या बाजूला नव्याने श्रीदत्तांचे मंदिर बांधण्यात आले असून त्यामध्ये संगमरवरी श्रीदत्तांची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. या मंदिराचा कळस सोन्याचा आहे.

दररोज दुपारी १२ वाजता मंदिरात आरती होते. या आरतीसाठी शेकडो भाविक उपस्थित असतात. आरतीच्या आधी शंखनाद होतो त्यानंतर आरती सुरू होते. पारंपरिक वाद्यांसोबतच आरतीच्या वेळी नगाऱ्याचे वादनही होते. मंदिर परिसरात दररोज शेकडो भाविक गुरुचरित्राचे पारायण करीत असतात.

त्रिपुरारी पौर्णिमा (कार्तिक पौर्णिमा) या दिवशी येथे श्रीदत्तांचा वाढदिवसाचा उत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्ताने पुढील दिवस येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. दत्त जयंतीनिमित्त येथे यात्रा भरते. यावेळी गोदावरी नदीतून आणलेल्या कावडीच्या पाण्याने श्रीदत्तांना अभिषेक घालण्यात येतो त्यानंतर यात्रोत्सव सुरू होतो. आषाढ महिन्यात दत्त देवस्थान ते पंढरपूर असा पालखी सोहळा असतो. या पायी दिंडीत हजारो वारकरी भाविकांचा समावेश असतो.

देवस्थानतर्फे येथे येणाऱ्या पीडित भाविकांना राहण्यासाठी भक्त निवास बांधण्यात आले आहे. त्यांच्या राहण्याची जेवणाची सर्व व्यवस्था मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात येते. दत्तमंदिराशिवाय शिंगवे दत्ताचे या गावात पुरातन केशव गोविंद मंदिर, काळभैरवनाथ मंदिर, लक्ष्मीमाता मंदिर श्रीराम मंदिर अशी मंदिरे आहेत. राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्राच्यादर्जाच्या यादीत श्रीदत्त देवस्थानाचा समावेश झालेला आहे. (ज्या देवस्थानाच्या दर्शनासाठी वर्षातून एक लाखांहून अधिक चार लाखांपर्यंत भाविक येतात, अशा देवस्थानाला राज्य सरकारकडून तीर्थक्षेत्राचादर्जा प्राप्त होतो.)

उपयुक्त माहिती:

  • पाथर्डीपासून ३५, तर शेवगावपासून ३५ किमी अंतरावर
  • पाथर्डी शेवगावपासून गावात एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत थेट जाऊ शकतात
  • गुरुवार, अमावस्या पौर्णिमेव्यतिरिक्त येथे न्याहरीची सुविधा नाही
  • परिसरात राहण्याची सुविधा नाही
Back To Home