
नेवासे तालुक्यातील मुरमे ही श्री बालसंन्यासी किसनगिरी महाराज यांची तपोभूमी. प्रवरेच्या काठावरील गोधेगाव येथे १९०७ मध्ये जन्मलेल्या किसनगिरी महाराजांनी या परिसरात आपली अध्यात्मसाधना केली. नेवासे येथील सिद्धसत्पुरुष श्रीनाथबाबा यांचे गुरुत्व त्यांना लाभले. प्रवरेच्या तीरावरील एका औदुंबराच्या वृक्षाखाली त्यांना श्रीदत्तांचा साक्षात्कार झाला. त्यानंतर श्रीदत्त महाराजांचा अंश, अशी त्यांची ख्याती पसरली. अनेक भाविक त्यांच्या भक्तीत लीन होऊ लागले. त्यांच्या सहकार्याने किसनगिरी महाराजांनी आपल्या साधनास्थळी दत्तमंदिर बांधण्याचा संकल्प केला आणि त्यातून १९५७ मध्ये येथे दत्तमंदिर उभे राहिले, ते आता श्री क्षेत्र देवगड म्हणून प्रसिद्ध आहे.
नेवासेहून मुरमे गावाकडे जाताना देवगड फाटा लागतो. तेथे श्री दत्त संस्थानचे पहिले भव्य प्रवेशद्वार आहे. तेथून सुमारे ५ किमी अंतरावर दुसरे व मुख्य प्रवेशद्वार आहे. राजस्थानी पद्धतीच्या वास्तुकलेची, तसेच दाक्षिणात्य गोपुरांची आठवण करून देणाऱ्या या प्रवेशद्वाराच्या उंच, रुंद कमानीखालून देवस्थान परिसरात प्रवेश होतो. या मार्गाच्या दुतर्फा तसेच मध्यभागी, विविधरंगी झाडे लावण्यात आली आहेत. खास निगा ठेवलेली वृक्षराजी, हे या परिसराचे एक वैशिष्ट्य आहे. प्रवेशद्वारासमोर प्रवरा नदीच्या तीरावर, श्रीदत्तांचे सुंदर मंदिर आहे. ते दुमजली असून मंदिराच्या शिखरावर चार फूट उंचीचा सोन्याचा कळस आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गजराजांच्या उंच आणि सुबक मूर्ती आहेत. मंदिराचे बांधकाम राजस्थानी शैलीशी मिळते जुळते असून येथील सर्व वास्तूंवर याच शैलीचा प्रभाव दिसतो. मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीदत्तप्रभूंच्या संगमरवरी पाषाणात साकारलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे.
मंदिराच्या डाव्या बाजूस अजानवृक्षांची बाग आहे. ज्ञानोबा माऊलींनी समाधिस्थ होताना विवराच्या मुखावर हातातील भिक्षुदंड रोवला होता. पुढे या दंडास पालवी
फुटली, तो अजानवृक्ष. वारकरी संप्रदायात या झाडाला विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे दत्त संप्रदायात औदुंबराच्या झाडाला महत्त्व आहे. किसनगिरी महाराजांनी ज्या औंदुंबराखाली साधना केली, त्याचा अंश म्हणून येथे त्या वृक्षांचेही संवर्धन केले जात आहे. अनेक वारकरी या बागेत ज्ञानेश्वरीचे पारायण करतात. मंदिर प्रांगणात पंचमुखी श्रीसिद्धेश्वर मंदिर आहे. त्यामध्ये गणपती, कार्तिक स्वामी आणि पार्वती यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहासमोर नंदीची देखणी संगमरवरी मूर्ती आहे.
दत्तमंदिराच्या उजव्या बाजूस सद्गुरू किसनगिरी महाराज यांचे समाधीस्थळ आहे. १९८३ मध्ये त्यांचे देहावसान झाले. त्यानंतर पुढच्याच वर्षी किसनगिरी महाराजांचे उत्तराधिकारी श्रीक्षेत्र महंतनगर, मेहूणचे भास्करगिरी महाराज यांच्या देखरेखीखाली हे समाधी मंदिर उभारण्यात आले. मंदिराच्या तळघरात मुख्य समाधीस्थळ असून तेथे महाराजांची समाधिस्थ मूर्ती प्रतिष्ठापित आहे. या शिवाय परिसरात किसनगिरी महाराजांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंचा संग्रह असलेली गुरू भवनची देखणी वास्तू आहे. शनिदेव, मारुती यांचीही येथे मंदिरे आहेत.
अखंड गुरुनाम, भजनाचे सूर आणि टाळ-मृदंगांच्या मंगलध्वनीने दुमदुमणाऱ्या या परिसराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रवरा नदीवर बांधलेला दगडी घाट. अनेक पायऱ्या असलेल्या या घाटावरून प्रवरेच्या पात्रात उतरता येते. श्रीदत्त संस्थानतर्फे येथे नौकाविहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. संस्थानात कीर्तन-प्रवचनासाठी विस्तृत असा मंडप आहे. त्याचप्रमाणे भक्तनिवासाची, तसेच भक्तांसाठी भोजनाची सुविधा आहे. तसेच येथे गोशाळाही बांधण्यात आली आहे.
मार्गशीष पौर्णिमेला श्रीदत्तात्रेय जन्म उत्सवास हजारो भाविक या क्षेत्री येतात. या काळात देशभरातून आलेल्या साधू-संतांच्या उपस्थितीत येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय प्रत्येक गुरुवारी व एकादशीला येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. दररोज सकाळी ६.१५ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात जाऊन श्रीदत्तांचे दर्शन घेता येते.