चांगदेव महाराज मंदिर,

पुणतांबा, ता. राहता, जि. अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात गोदावरीच्या तीरावर वसलेल्या पुणतांबे या गावास धार्मिक, पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या धार्मिक क्षेत्रांत या गावाचा समावेश होतो. गोदावरीच्या त्र्यंबकेश्वर येथील उगमापासून ते बंगालच्या उपसागराला जाऊन मिळेपर्यंतच्या प्रवासात ती केवळ पुणतांबा येथे दक्षिणवाहिनी होते. पूर्व-पश्चिम वाहणारी नदी ज्या ठिकाणी दक्षिणवाहिनी होते ते स्थान धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र समजले जाते. या पवित्र स्थानावर महायोगी चांगदेव महाराज यांचे समाधी मंदिर आहे.

प्राचीन काळात पुण्यस्तंभ, तांबीलिंदनापूर या नावाने प्रसिद्ध असलेल्या आताच्या पुणतांबे या गावात चांगदेव महाराज समाधी मंदिराशिवाय सोमेश्वर मंदिर (चांगदेव महाराज संजीवन समाधी घेताना प्रत्यक्ष पांडुरंग, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत नामदेव व संत गोरोबा या मंदिरात वास्तव्यास होते), कार्तिक स्वामी मंदिर (राज्यातील कार्तिक स्वामींच्या मोजक्या मंदिरांपैकी हेमाडपंथी शैलीतील मंदिर), शैनेश्वर मंदिर (राजा विक्रमादित्य यांच्या काळातील मंदिर), यज्ञसेनी देवी मंदिर (यज्ञामधून प्रकट झालेल्या देवीचे मंदिर), काशी विश्वेश्वर (राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी यांनी जीर्णोद्धार केलेले मंदिर) याशिवाय श्रीराम मंदिर, बारा ज्योतिर्लिंग मंदिर, भैरवनाथ मंदिर, चक्रधर स्वामी मंदिर व मामाभाचे मंदिर अशी महत्त्वाची धार्मिक स्थळे असल्यामुळे या गावास ‘मंदिरांचे गाव’ असे म्हटले जाते.

एका आख्यायिकेनुसार, इंद्राच्या दरबारात असलेल्या अनेक गणांपैकी मरुद्‌गणाकडून (वाऱ्यावर ताबा असणारा) इंद्राचा अपमान झाला. त्यामुळे इंद्राने क्रोधित होऊन ‘भूलोकी जन्म घ्यावा लागेल’ असा शाप दिला. मरुद्‌गणाने चूक मान्य करून इंद्राकडे क्षमा मागितली असता ‘ब्रह्मा, विष्णू, महेश व आदिमाया अवतार घेतील, त्यांच्याकडून तुझा उद्धार होईल’ असा उःशाप दिला. त्याप्रमाणे मरुद्‌गणाने चांगदेवाच्या रूपात व देवतांनी ज्ञानेश्वरादी भावंडांच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतले.

महायोगी चांगदेव हे महाराष्ट्रातील नाथपंथी कवी आणि संत होते. त्यांनी कठोर तप करून अनेक सिद्धी प्राप्त केल्या होत्या. वेद, शास्त्रे, पुराणे, १४ विद्या व ६४ कला त्यांना अवगत होत्या. मृतात्म्यांस संजीवनी देण्याचे त्यांच्यात सामर्थ्य होते. आपल्या योगसामर्थ्याने ते काळावर विजय मिळवून १४०० वर्षे जगले होते. प्रत्येक १०० वर्षांनी काळ त्यांना घ्यायला आल्यावर योगसामर्थ्याच्या बळावर ते ६ महिने समाधी लावून बसत. त्यामुळे काळ परत जात असे व त्यानंतर ते आपले नाव बदलत असत. अशी त्यांनी १२ नावे धारण केली होती.

ज्ञानेश्वरादी भावंडे एकदा नेवासे येथून आळंदीकडे जाताना पुणतांब्यात थांबली होती. तेव्हा चांगदेवांची अशी ख्याती होती की ते समाधीतून उठल्यावर मृत माणसे जिवंत करीत असत. त्यामुळे लोक मृत माणसांचा देह त्यांच्यासमोर आणून ते समाधीतून बाहेर येण्याची वाट पाहत असत. संत मुक्ताबाईंना हे समजल्यावर त्यांनी तेथे पडलेले कुत्र्याचे हाड उचलून त्या मृतदेहांवरून फिरविले असता सर्वजण जिवंत झालेच, शिवाय ज्याचे हाड होते तो कुत्राही जिवंत झाला.

मुक्ताबाईंची ही कीर्ती ऐकून चांगदेवांनी ज्ञानेश्वरादी भावंडांना भेटण्याचे ठरविले. या भेटीत त्यांना आपणच श्रेष्ठ आहोत हे दाखवायचे होते. त्यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरांकडे शिष्याकरवी नमस्कार सांगून एक कोरे पत्र पाठवून भेटण्याचे ठरविले. त्यांच्या या कोऱ्या पत्राचे उत्तर म्हणून ज्ञानेश्वरांनी ६५ ओव्या लिहून ते पत्र चांगदेवांकडे पाठविले. या ६५ ओव्यांतील उपदेश ‘चांगदेव पासष्टी’ म्हणून प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वरांच्या त्या पत्राचा चांगदेवांना अर्थबोध होत नव्हता. म्हणून ज्यांची कीर्ती ऐकली त्यांना डोळ्याने पाहावे, असा त्यांनी निश्चय केला. त्यानुसार ज्ञानेश्वरांच्या भेटीसाठी जात असताना हातात सर्पाचा चाबूक घेत वाघावर ते स्वार झाले. त्यावेळी ज्ञानेश्वरादी भावंडे आळंदीत एका भिंतीवर बसलेली होती. चांगदेवांना पाहून त्यांच्यातील अहंकाराची त्यांना जाणीव झाली. यातून चांगदेव मुक्त व्हावेत, यासाठी ज्ञानेश्वरांनी आपल्या साधनेच्या बळावर भिंतीला पुढे चालण्याचे आदेश दिले आणि आश्चर्य म्हणजे भिंत आपल्या जागेवरून पुढे सरकू लागली. हा चमत्कार पाहून चांगदेव खजिल झाले व ज्ञानेश्वरांना शरण गेले. पुढे निवृत्तीनाथांनी चांगदेवांना आपल्या धाकट्या बहिणीचे शिष्य व्हावे, अशी आज्ञा दिल्याने त्यांनी मुक्ताबाईंचे शिष्यत्व स्वीकारले.

ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे व सोपान काकांनी सासवड येथे समाधी घेतल्यानंतर पांडुरंगासह सर्व संत पुणतांबे येथे जमा झाले. या पवित्र ठिकाणी गोदावरीच्या तीरावर वयाच्या १४०० व्या वर्षी चांगदेवांनी समाधी घेण्याचे निश्चित केले. गुरू मुक्ताबाईंचा आशीर्वाद घेऊन चांगदेव समाधी विवरात उतरले. माघ वद्य १३ शके १२१८, महाशिवरात्रीच्या दिवशी येथे ते समाधिस्थ झाले.

पुणतांबे गावात गोदावरीच्या तीरावर निसर्गरम्य परिसरात योगीराज चांगदेव महाराजांचे समाधी मंदिर आहे. मंदिराभोवती असलेल्या तटबंदीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर प्रथम गणपतीचे दर्शन होते. त्यापुढे मंदिराचा सभामंडप आहे. असे सांगितले जाते की इंग्रजांनी येथील गोदावरी नदीवर पूल बांधला तेव्हा जी लाकडे शिल्लक राहिली, त्यातून या मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले. सभामंडपातून गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर गर्भगृहातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, ज्ञानेश्वर माऊली यांच्या मूर्तींचे दर्शन होते. या गर्भगृहाच्या मागील बाजूस चांगदेव महाराजांचे समाधिस्थळ व त्यांची संगमरवरी मूर्ती आहे. चांगदेव महाराजांच्या गुरू मुक्ताईंचेही येथे मंदिर आहे.

महाशिवरात्री व आषाढ वद्य एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. असे सांगितले जाते की चांगदेव महाराज समाधिस्थ होताना पांडुरंगाने वचन दिले होते की आषाढ वद्य एकादशीस या समाधिस्थळी माझे वास्तव्य असेल. या श्रद्धेपोटी शेकडो भाविक या दिवशी या मंदिरात दर्शनासाठी येतात. याशिवाय भाद्रपद महिन्यात येणाऱ्या पंचमीला (ऋषी पंचमी) गंगास्नान केल्याने विशेष पुण्य लाभते, अशी श्रद्धा असल्यामुळे ऋषी-मुनींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक भाविक येथे येतात. सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत भाविकांना या मंदिरात जाऊन चांगदेव महाराजांचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • राहतापासून १९ किमी, तर शिर्डीपासून १७ किमी अंतरावर
  • राहता व शिर्डीपासून येथे एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा
Back To Home