बीड जिल्ह्यातील नामलगावचा आशापुरा गणेश आणि राजुरीचा नवगण ही गणेश मंदिरे अत्यंत प्रसिद्ध आहेत. याच जिल्ह्यातील अकराव्या-बाराव्या शतकातील हेमाडपंती स्थापत्यशैलीतील मंदिरांच्या शिल्पकलेत नानाविध मुद्रांतील गणेशमूर्ती आढळतात. अंबाजोगाई येथील मंदिराच्या शिखरावरील मातृगणेश विशेष प्रसिद्ध आहे. कोकणाप्रमाणेच बीड जिल्ह्यात देखील गणेशपूजनाची प्राचीन परंपरा असल्यामुळे जिल्ह्यात अनेक प्राचीन गणेश मंदिरे आहेत. असेच एक प्राचीन व प्रसिद्ध मंदिर बीड तालुक्यातील लिंबागणेश गावात आहे. प्रत्यक्ष चंद्रदेवाने या गणपतीची स्थापना केली होती, असे मानले जाते. येथील जागृत गणेश भक्तांच्या हाकेला धावून येतो व नवसाला पावतो, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे.
हेमाडपंती स्थापत्यशैलीतील हे मंदिर सुमारे चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचे असावे, असा अंदाज जाणकार व्यक्त करतात. सन १९०८ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार भवानीदास भुसारी यांनी केल्याचा उल्लेख मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शिलालेखात आढळतो. या मंदिराबाबत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. एका आख्यायिकेनुसार, कैलासावर गणपती व कार्तिकेय या दोन भावांचा वाद झाला तेव्हा गणेशाचे रूप पाहून चंद्र कुत्सितपणे हसला. त्यामुळे गणपतीने चंद्राला तेजोहरण होण्याचा शाप दिला. शापाने व्यथित होऊन चंद्र रानोमाळ भटकला आणि शेवटी गणेशी नदीच्या तीरावर गणेशाचे ध्यान करीत बसला. चंद्राच्या तपाने गणपती प्रसन्न झाला आणि त्याने चंद्राला संकष्टी व्रतात मुखदर्शनाचा आशीर्वाद दिला. परंतु गणेश चतुर्थीच्या दिवशी कोणीही तुझे तोंड पाहणार नाही, असेही बजावले. गणपतीचा आशीर्वाद प्राप्त झाल्यावर चंद्राने या ठिकाणी गणेशाची स्थापना केली.
दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, गणेशी नदीच्या तीरावर लिंबासूर राक्षसाच्या त्रासाने व्यथित झालेल्या भक्तांनी गणेशाची प्रार्थना केली.
तेव्हा गणेशाने राक्षसाचा वध केला. लिंबासुराने मरताना ‘देवाने आपल्याला त्याच्या नावात आणि सानिध्यात स्थान द्यावे’ असा वर मागितला. गणेशाने तो वर दिल्याने गावाला ‘लिंबागणेश’ हे नाव प्राप्त झाले. लिंबासुराची समाधी भालचंद्र गणेशाच्या मंदिर परिसरात आहे. या मंदिराचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये सापडतात. हे मंदिर गावापासून जवळ आहे आणि मंदिरापर्यंत पक्का रस्ता आहे. मंदिरासमोरचा प्रशस्त वाहनतळ पेव्हर ब्लॉक आच्छादित आहे आणि येथे भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. मंदिराभोवती सुमारे दहा फूट उंच भक्कम तटबंदी असून त्यामध्ये दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला देवकोष्ठके व ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. प्रवेशद्वारातून आत येताच फरसबंदी प्रांगणात चौथरा व त्यावर तीन थरांची दीपमाळ नजरेस पडते. दीपमाळेचा खालील थर अष्टकोनी आहे आणि वरील दोन थर गोलाकार आहेत. दीपमाळ वर निमुळती होत गेलेली आहे.
दीपमाळेच्या पुढे मूषकमंडप आहे. चौथऱ्यावर असलेल्या मूषकमंडपाच्या चारही कोनांवर स्तंभ आहेत आणि त्यांवर छत आहे. मूषकमंडपात मध्यभागी वज्रपीठावर मूषक शिल्प आहे. मूषकमंडपाच्या बाजूला चौथऱ्यावरील मेघडंबरीत गणेशाची शेंदूरचर्चित प्राचीन मूर्ती आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. या सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला चौथरे व त्यावर गजराज शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस चौकोनी स्तंभ व त्यावर त्रिकोणी तोरणकमान आहे. या तोरणाच्या वर मध्यभागी गणेश शिल्प व दोन्ही बाजूला चक्र नक्षी आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आहे.
सभामंडपात प्रत्येकी चार चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. सर्व स्तंभ एकमेकांना अर्धचंद्राकार कमानींनी जोडलेले आहेत, तसेच प्रत्येक चार स्तंभांच्या मधील घुमटाकार वितानावर नक्षी आहे. सभामंडपात मध्यभागी जमिनीवर कासव शिल्प आहे. सभामंडपात अंतराळाच्या दोन्ही बाजूंना प्रदक्षिणा मार्गावर दोन दरवाजे आहेत. अंतराळात चारही कोपऱ्यांत चार चौकोनी स्तंभ, घुमटाकार छत व वितानावर नक्षी आहे. गर्भगृहाच्या पंचशाखीय प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर वेलबुट्टी, पर्णलता, पुष्पलता व स्तंभ नक्षी आहे आणि खालील बाजूस द्वारपाल शिल्पे आहेत. द्वारशाखांच्या खाली गजराज व पशू शिल्पे आहेत. ललाटबिंबावर गणपती, ललाटपट्टीवर पानाफुलांची नक्षी आणि तोरणात शिखरशिल्पे आहेत. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपालपीठावर चतुर्भुज गणद्वारपाल शिल्पे आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती विराजमान आहे. या मूर्तीच्या डोक्यावर फेटा आहे आणि मूर्तीच्या मागील प्रभावळीत वर कीर्तीमुख आहे. दोन्ही बाजूला पानफुलांची व पशू-पक्षांची नक्षी आहे. वज्रपीठाखाली पाटावर श्री गणेशाची उत्सवमूर्ती ठेवलेली आहे.
गर्भगृहाच्या बाह्य बाजूला गोमुखप्रणाल आहे. मंदिराच्या छतावर चारही बाजूंनी कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर चारही कोनांवर मूषक शिल्पे आहेत आणि मध्यभागी सुमारे पंचवीस फूट उंच, वर निमुळते होत गेलेले शिखर आहे. शिखराचा खालील भाग षटकोनी आहे तर वरील गोलाकार भागात सात कमळदळ रिंगणे आहेत. शिखराच्या वरील भागात स्तंभनक्षी आहे. शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक आणि त्यावर कळस व ध्वजपताका आहे. प्रांगणात होमकुंड आहे आणि मंदिरापासून जवळच कोरीव पाषाणात बांधलेली चंद्र पुष्करणी आहे. पुष्करणीच्या बाजूला लिंबासुराची समाधी आहे.
भाद्रपदातील गणेशोत्सव हा येथील मुख्य वार्षिक उत्सव होय. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होऊन ऋषीपंचमीस उत्सवाचा समारोप केला जातो. या चार दिवसांत चार दिशांना गावाच्या वेशीवरील देवतांची पूजा केली जाते. याची सुरुवात गावातील जहागीरदार कानिटकरांच्या वाड्यातील मयुरेश्वर गणेशापासून होते. पूर्वेला पद्मावती, पश्चिमेला नवरा-नवरी माळ, दक्षिणेस बोरजाई आदी देवतांचे पूजन करून आमंत्रणे दिली जातात. चार दिवसांच्या उत्सवकाळात देवाच्या प्रसादासाठी घराघरांतून आणलेली कडधान्यांची उसळ एकत्र करून देवास ‘सातळ’ नैवेद्य दाखवला जातो. पाचव्या दिवशी देवाची उत्सवमूर्ती पालखीत बसवून ग्रामप्रदक्षिणेला निघते. ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत रात्रभर पालखी नाचवली जाते. दुसऱ्या दिवशी पहाटे देव मंदिरात परत येतात. माघ शुद्ध चतुर्थी हा गणेश जयंतीचा उत्सव देखील येथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याशिवाय संकष्टी चतुर्थी, विनायकी चतुर्थी, मंगळवार आदी दिवशी मंदिरात भाविकांची विशेष गर्दी असते.